बुलढाण्यात ‘वंचित’मुळे दुसर्‍या नंबरसाठी ‘काटे की टक्कर’!
   दिनांक :24-Mar-2019

नंदू कुलकर्णी
लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याअगोदर वंचित आघाडीने आपला उमेदवार घोषित केल्यामुळे  दुसर्‍या  नंबरसाठी कांटे की टक्कर होणार अशीच चर्चा  आहे.
महाराष्ट्रातून सर्वात प्रथम वंचिताचा उमेदवार संतनगरी शेगावमधून जाहीर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. खुद्द भारिपचे पदाधिकारी सुद्धा या वंचित घोषित उमेदवारांमुळे अचंबित राहिले होते. काहींचा तर या वंचित घोषित उमेदवारामुळे पुढचे राजकीय भवितव्य धोक्यात येते की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. या वंचित धक्का तंत्रामुळे  ॲड. आंबेडकर एकदम आक्रमकपणे पुढे आले आणि बुलढाणा जिल्ह्यात तरी राजकीय गणिताची दिशा बदलली. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस/कॉंग्रेस विरूद्ध युतीची सरळ लढत झाली होती आणि सहज मात करत सेनेचे जाधव निवडून आले. त्यावेळी सुद्धा इतर बरेच उमेदवार रिंगणात होते. परंतु, त्यांची एक मत घेण्याची सीमा होती. 

 
 
परंतु, यंदा जे गणित घेऊन शेगावमधून ॲड. आंबेडकरांनी एमआयएम सोबत युती करून वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे, हळूहळू त्यांचा तो प्रयोग यशस्वी होताना दिसत गेला. तसेतसे त्यांनी कॉंग्रेसला अधिक वेठीस धरले आणि त्यांच्यासोबत जायचेच नाही, असे हळूहळू ठरवत गेले. आता शेगावमधून पकड घेतलेल्या वंचितांच्या आघाडीला बुलढाणा जिल्ह्यातील जाणकार कॉंग्रेस-राष्ट्रवादी पेक्षा वरचढ मानत आहेत. परत शरद पवारांनी आग्रहाने डॉ. शिंगणे यांनाच उमेदवारी देऊन मैदानात उतरवले. परंतु, शिंगणेंची काही मनापासून तयारी दिसत नाही. त्यांनी तयारी होईस्तोवर ॲड. तुपकरांचे नाव पुढे केले. तुपकरांची खूपच तीव्र इच्छा होती आघाडीतून स्वाभिमानीला जागा मिळवून बुलढाण्यातून लढायची. परंतु, कॉंग्रेसने ती सीट राष्ट्रवादीला दिली आणि पवारांनी शिंगणेंना. त्यामुळे शिंगणेंना आता लढावेच लागेल. ॲड. तुपकर आताच रुसले असण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. डॉ. शिंगणेंना त्यांना सोबत घ्यायचे आहे.
 
त्याकरिता शिंगणे थेट तुपकरांच्या घरी मनधरणी करायला गेल्याचे समजते. यंदा जवळपास तुपकरांचा पत्ता कटच झालेला दिसत आहे. सहकारी बँकेविरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधात रान उठवायला स्वाभिमानी बुलढाणा जिल्ह्यात सर्वात पुढे होती, हे मान्य केलं तरी निवडून येण्यासाठीची रचना त्यांच्याजवळ नाही िंकवा त्यांना वरचढ होऊ द्यायचे नाही असे कॉंग्रेस-राष्ट्रवादीने ठरवल्याचे दिसते. त्यामुळे जसे वंचितांनी शेगावमधून म्हणजेच बुलढाण्यातून उमेदवार जाहीर करून महाराष्ट्रात नवी चर्चा घडवली, तसेच स्वाभिमानीने तीन पैकी एक जागा बुलढाणा मागून बुलढाण्याला चर्चेत ठेवले. पुढे काय, असा प्रश्र्न असला तरी येणारा काळच हे ठरवेल की कोण कोणासोबत ईमानदारीने राहणार आहे. कारण मोदींची हवा युतीला एकत्र ठेवण्यात यशस्वी झालेली दिसत आहे. पण विरोधी मतात फूट पडलीच आहे. संभ्रम दूर होणे कठीण आहे. कारण वंचितांनी माळी, मुसलमान आणि बौद्ध या मतावर हक्क सांगितला आहे आणि खरंच ही मत त्यांना मिळाली तर ही भाजपा विरोधातील मतांची मोठी फूट होऊन राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडू शकते. कॉंग्रेस/राष्ट्रवादीची पारंपारिक मतेही आता कमी झालेली दिसतात. राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषदेत ते भाजपसोबत आहेत. एकही मोठी सत्ता त्यांच्याजवळ नाही. त्यांचे शक्तीकेंद्र सहकार होते. ते खिळखिळे झालेले आहे. अशा परिस्थितीत वंचितांना मात देऊन पुढे जाणे राष्ट्रवादीसाठी कठीण होईल, अशी चर्चा असून, दोन नंबरवर कोण, या प्रश्र्नाचे उत्तर लवकरच मिळेल.