राज, गोटे अन्‌ तोटे, दे ढील...
   दिनांक :24-Mar-2019
कल्पेश जोशी 
 
राग, द्वेष, संताप आणि प्रतिशोध माणसाला कुठल्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकतो, याचे उत्तर आजपर्यंत शब्दशः कोणत्याही महान तत्त्ववेत्त्याला माहीत झाले नव्हते. पण आज असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर बारामती असे आपण देऊ शकतो!
राग, द्वेष किंवा प्रतिशोध घ्यायचा असेल आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला चीतपट करायचं असेल तर बारामतीला जा. बारामतीचे काका त्या बाबतीत सगळ्यांना आशादायी ठरू लागले आहेत (?).
 
याबाबतीत अलीकडील अगदी दोन नवीन उदाहरणे देता येतील. एक म्हणजे महान व्यंगचित्रकार व मनसे निर्माते राज ठाकरे तर धुळ्याचे राजकीय सम्राट अनिल गोटे. बारामतीच्या काकांचे वरदहस्त राज ठाकरेंच्या डोक्यावर असल्यामुळे त्यांची किती प्रसिद्धी (की बदनामी?) होऊ लागली, हे लक्षात येताच अनिल गोटेंनीही बारामतीकडे धाव घेतली. राजभाऊंप्रमाणे आपणही पोपट ट्रेिंनग सेंटरला ऍडमिशन घ्यावी, असे त्यांना वाटले असावे. पण ही धाव काही युतीसाठी नाही किंवा पक्षांतरासाठी नाही. दोघे जण स्वपक्षनिष्ठ. राज साहेब तर स्वतः इंजीन निर्माते आहेत. त्यामुळे इंजीन सोडणं अशक्यच! पण म्हणून ज्या ठिकाणी रेल्वेमार्ग नाहीत, त्या ठिकाणी आपण बारामतीच्या काकांच्या बसमध्ये बसून आपल्या विरोधकांना चारी खांदे चीत करू शकतो, असा गनिमी कावा त्यांनी मोदींवर टाकण्यासाठी बारामतीच्या काकांची मदत घेतली असावी. मी लोकसभा लढवणार नाही, पण जुमले करणार्‍या मोदींना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा विडा त्यांनी बारामतीच्या दरबारी उचलला; तो बहुतेक तो त्याच कारणासाठी.
  
धुळ्याचे राजकीय सम्राट त्या दिवशी असाच काहीसा विचार करत असावे. डॉ. सुभाष भामरे पुन्हा खासदारकीला उभे राहणार म्हटल्यावर अनिलरावांचा महासंताप झाला. अनिलराव तसे भाजपचे खंदे कार्यकर्ते. पक्षनिष्ठावन. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब करणार्‍या सुभाष भामरेंवर त्यांचा राग असल्याचे ते (प्रामाणिकपणे?) सांगतात. भ्रष्टाचार व अनागोंदी माजवणार्‍या सुभाष भामरेंना येत्या निवडणुकीत हरवणे आपले एकमेव उद्दिष्ट असल्याचे ते त्यामुळेच सांगतात आणि त्यासाठीच त्यांनी बारामतीच्या काकांचे दर्शन घेतले. काकांनीही त्यांना तूर्तास तथास्तू म्हणून आशीर्वाद देऊन वेळ मारून नेली आहे. प्रसाद व भंडारा घेण्यासाठी त्यांना पुन्हा दर्शनाला बोलावले आहे. (पुन्हा जातील तेव्हा पोपट ट्रेिंनग सेंटरला बळी पडतील, हे निश्चित!)
पण खरी गंमत तर ही आहे की, ज्या काकांचे बोट धरून मोदी पंतप्रधान झाले आहेत, त्या मोदींविरोधात राजसाहेब आपले इंजीन दौडू पाहत आहेत.
 
अनिलराव तर बारामतीच्या आशीर्वादाच्या जोरावर सुभाष भामरेंना पराजित करण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण सुभाष भामरेंना जामनेरकरांचे अभय आहे, याचा त्यांना विसर पडला असावा. विशेष म्हणजे जामनेरकरांची धास्ती खुद्द बारामतीकरांनी घेतलेली आहे. त्यामुळे गोटेभाऊंच्या विटेला सुभाषराव दगडाने उत्तर देतील, यात शंका नाही. मग पुन्हा जामनेरकर वाय-फायने ईव्हीएम हॅक करतात म्हणून निवडणूक जिंकू शकतात, असे हास्यास्पद विधान करून कोल्ह्याला द्राक्ष आंबट झाल्याचे सिद्ध करतील. म्हणून बारामतीकरांच्या आशीर्वादाने (किंवा पोपट ट्रेिंनग सेंटरने) केवळ मनोरंजन होऊ शकते, असे राजभाऊंकडे पाहून गोटेभाऊंनी आपले विडे उचलावे एवढेच. नाही तर बारामतीच्या पोपट ट्रेिंनग सेंटरमध्ये अडकल्यावर त्यांचा खर्‍या अर्थाने पोपट झाल्याशिवाय राहणार नाही .