कंगना साकारणार जयललिता
   दिनांक :24-Mar-2019
 
 सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.  अश्यात नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका' चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत आता जयललिता यांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कंगनाने काल तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं याबाबत घोषणा केली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट तामिळमध्ये 'थलाइवी' तर हिंदीत 'जया' नावानं प्रदर्शित होणार आहे. याबाबत सांगताना विजय म्हणतात, 'जयललिता या आपल्या देशाला लाभलेलं मोठं नेतृत्व होतं. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणं ही माझ्यावर असलेली फार मोठी जबाबदारी आहे. आता कंगनाचं नाव आमच्या टीमसोबत जोडलं गेल्यानं आम्हाला आनंद वाटतोय. कंगना मला जयललिता यांच्या भूमिकेसाठी योग्य निवड वाटली. कंगना तिच्या आयुष्यात ज्यापद्धतीनं ठाम निर्णय घेते तसेच निर्णय जयललितादेखील घेत. त्यामुळे कंगनाच ही भूमिका उत्तमरित्या साकारेल असा मला विश्वास आहे.'