पडणारच नाही, कारण लढणारच नाही!
   दिनांक :24-Mar-2019
 
 
आता पारा अन्‌ निवडणुकीचा माहोल दोन्हीपण गरम होत आहेत. पारा चढला की वातावरण गरम होते आणि तिकिटा जाहीर झाल्या की निवडणुकीचा माहोल गरम होतो. आतापर्यंत तिकिटा जाहीर होत नव्हत्या. हा त्याची वाट पाहत होता अन्‌ तो याची. मग हळूहळू तिकिट कुणाला हे जाहीर होऊ लागले. कधीकाळी एसटी पकडायची असेल तर आरक्षण करण्याची पद्धत नव्हती. गाडी आली की खिडकीतून रुमाल, उपरणे, छोटी बॅग, पर्स अन्‌ नाहीच काही जमले तर लहान मुल खिडकीतून टाकून दिले जाई. मग ज्या सीटवर रुमाल असेल ती आपली, असा दावा केला जाई. आता निवडणुकीला उभे राहाचये म्हणून अनेकांनी असे आपआपले दुपट्टे टाकून ठेवले होते. जागा एक अन्‌ दुपट्टे अनेक असे चित्र होते. बरं दुपट्टेही एकाच पक्षाचे अन्‌ हवेत ना, तर तसे नाही. एका जागेवर अनेक पक्षांचे दुपट्टे होते. त्यातही एका माणसाने किमान एकाच पक्षाकडून दावेदारी सांगायची तर तसेही नाही. एकच नेता अनेक पक्षांचे दुपट्टे सीटवर टाकून मोकळा झाला होता. म्हणजे या पक्षाकडून नाही मिळाली उमेदवारी तर दुसर्‍या पक्षाशी बोलूनच ठेवलेले असायचे. म्हणजे आता ज्या पक्षाशी आपण निष्ठावान आहोत त्या पक्षातच तिकिट मिळाले पाहिजे, असे काही नाही. सर्वपक्ष समभाव आहे. त्यामुळे निष्ठावंत पक्षाने तिकिट नाकारले तर स्पर्धक पक्षाच्या नेत्याच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन हा नेता त्या पक्षांत तातडीने प्रवेश करणार अन्‌ इतक्या निष्ठावान अन्‌ वैचारिक उंची गाठणार्‍या या नेत्याला हा नवा पक्ष तितक्याच तातडीने तिकिट देणार. त्याला रेल्वेच्या भाषेत तत्काल तिकिट असे म्हणतात. राजकारणातही निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांना तिकिट असे म्हणतात. तसे आता सगळे होत आले आहे. आता बाहेरच्याला असे शर्ट शिवण्याचा कार्यक्रम करत असताना घरच्याला देवा देवा म्हणण्याची पाळी येते अन्‌ मग तो बंडखोरी करतो. त्याला तशी संधी मिळूच नये अन्‌ मग त्याला नाईलाजाने निष्ठावानच रहावे लागेल अशाच वेळात तिकिटे देण्याची एकुणात राजकीय पद्धत आहे. त्याला कात्रजच्या घाटात गाठणे असे म्हणतात.
 

 
 
आता निवडून येणारे निवडून येणार्‍या पक्षांतच जाणार... तसे ते जात आहेत. ज्यांना तसे अजिबातच करता येत नाही असा एक गट आहे. त्याची दोन कारणे आहेत. एकतर तो पक्षच त्यांचा आहे आणि दुसरे म्हणजे त्यांना मार्केट व्ह्यॅल्यू, म्हणजे बाजार भाव नाही. असे विरोधी पक्ष खूप आहे. त्यांचे एकच ब्रीदवाक्य आहे. मोदी नको... म्हणजे एका हिंदी गाण्यासारखे आहे. ते सत्तेला म्हणतात, ‘तुम अगर मेरी नही तो पराई भी नही. बात तोडी भी नही तुमने...’ असेच काहीसे. म्हणजे सत्ता आम्हाला मिळणार नाही, हे खरेच आहे. ते त्यांना मान्य आहे; पण मग मोदींनाही ती देऊ नका, असे यांचे सांगणे. आता आपले (मराठी म्हणून आपले!) शरद आजोबा (आतावर ते काका होते, आता आजोबा झाले आहेत. पुतण्यासाठी पुण्याई खर्च केल्यावर आता नातवासाठी ते तसे करत आहेत.) तर आपले शरद आजोबा आधीच सांगते झाले आहेत की, यंदा मोदींना गेल्यावेळसारखे मताधिक्य मिळणार नाही. याचा अर्थ बहुमत मोदींनाच मिळणार, हे त्यांना ‘कुबुल है’. मग ‘मले नाही त त्यालेबी नाही’ असा त्यांचा पवित्रा आहे. त्यांना कुणीतरी विचारले पाहिजे की, ‘तुलेई नाही, त्यालेई नाही त कोनाले?’ कारण राहुल गांधी हे सत्तेच्या लायक नाही, हे त्यांनी आधीच सांगून टाकले आहे. शरद आजोबांचे म्हणणे असे की, मी विनाअट पािंठबा देईल सत्तेसाठी. (कारण मंत्रालयाच्या आगीत सारीच कागदपत्रे काही जळून गेलेली नाहीत. काही मजकूर आग प्रूफ आहे.) आता मोदी नको, असे म्हणताना शरद आजोबा स्वत: मात्र लढणार नाहीत. मोदींना पाडा; पण मीही पडणारच नाही, कारण मी लढणारच नाही, असा त्यांचा कावेबाजपणा. (ही असे करणारी सगळीच माणसे मोठी असल्याने आपण याला पळपुटेपणा म्हणणार नाही!) शरद आजोबांनी आता नातवासाठी माघार घेतली आहे. हे वरवरचे, दाखवायचे कारण. खरे हे की, आजोबा म्हणाले ‘माढा’ तर त्यांच्या पक्षातून आवाज उठला, ‘यावेळी आजोबांना पाडा.’ मग त्यांनी मावळ भूमिका घेतली.
 
 मोदींना पाडा, असे थेट शरद आजोबा म्हणू शकत नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. आजवर त्यांनी दुसर्‍याच्याच काठ्या वापरल्या आहेत. मग त्यांनी (ना)राज पकडले. मागच्या निवडणुकीत न मागता पािंठबा देणार्‍या राज ठाकरेंना गेल्या पाच वर्षांत काहीच मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. टोलचे प्रकरण त्यांनी करून पाहिले अन्‌ त्या निमित्ताने आपली नाराजी सांगून पाहिली; पण टोल प्रकरणी नुसती टोलवाटोलवीच करण्यात आली. काही निधीसंकलन झाले नाही. मग मधल्या काळांत ते वक्ता दशसहस्त्रेशु झाले. म्हणजे तितके मानधन घेणारे वक्ते झाले. मुलाखतीही घेतल्या. ज्याला मैदानात क्रिकेट खेळता येत नाही तो मग समालोचक होतो. तसेच हेही. पवार आजोबांनी नाराजच्या आतात माईक दिला. ते म्हणतात, मोदींना पाडा. ते स्वत: मात्र निवडणूक लढणार नाहीत. कारण हेच की त्यांना तिकिटच नाही. ते दुसर्‍याला कुणाला तिकिट देऊ शकत नाहीत, कारण मागायलाच कुणी आले नाही. स्वत: ते लढणार नाही. कारण त्यांना पडायचे नाही.
 
पडणारच नाही कारण लढणारच नाही, या उक्तीला जागणार्‍या तिसर्‍या बड्या नेत्या म्हणजे मायावतीताई. त्याही देस को मोदीसे धोका है, असे म्हणतात. मोदींना पाडा म्हणतात. त्या मात्र निवडणूक लढणार नाहीत. कुणी मदत मागितली तर त्यांच्या पक्षाचे कुणीतरी त्या मतदार संघात लढते... आता अशाच मोदी पाडा पण मला नाही लढण्याचा ओढा, असे म्हणणार्‍या आहेत आपल्या ममता बॅनर्जी. त्यांनाही त्यांच्या पश्चिम बंगालात त्यांच्या सत्तेचा सूर्य मावळू द्यायचा नाही. पूर्वोत्तरात त्यासाठी त्यांना मोदींचा झालेला उदय नको आहे. त्यासाठी मग त्या मोदी नको, म्हणतात. देशांत मोदी असे म्हणजे धोकाच आहे, असे त्यांचे सांगणे. आणखी मोदी आल्यास त्यांच्या अडचणी वाढणार आहे. अनेक धंद्यांवर बॅन येणार अन्‌ चौकशीची ॲलर्जी होणार त्यामुळे त्यांना मोदी नको. त्यात त्यांचा शहाजोगपणा असा की शहादेखील नकोत. तरीही त्या मात्र लढणार नाहीत. तसेच आपल्या केजरीभाऊंचे. त्यांनाही मोदी नकोच आहेत. सारा देश मोदी फिरसे म्हणत आहे अन्‌ हे मात्र स्वच्छता शिरोमणी, ‘न खाल्लं नि ना कुणाला खाऊ दिलं’ असे मोदी नको म्हणतात. देशात लोकपाल हवा, ही यांचे सामाजिक गुरू (जे यांना नालायक शिष्य म्हणतात) अण्णा हजारे यांची मागणी पूर्ण करणारे मोदी या स्वच्छता शिरोमणीला नको आहेत. मात्र हे सारे देशाच्या जनतेने करायचे. त्यासाठी निवडणुकीत लढण्याची तयारी यांची नाही. कारण मागच्यावेळी लढले अन्‌ दणक्यात पडले. अजूनही ठणकते आहे. त्यामुळे आता यांना लढायचे नाही, पडायचे नाही अन्‌ तरीही मोदींना पाडायचे आहे. न लढता कसेकाय जिंकता येणार? तरीही या पाचही जणांना न लढता मोदीमुक्त भारत करायचा आहे. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अशी एक म्हण आहे. असे असताना हे मरणार नाही अन्‌ तरीही यांना फुकटात स्वर्ग हवा आहे. या निवडणुकीत बाकीचे सारे पडतील. हे त्याचे भाकीत करतील, हा पडेल, त्याला बुहमत मिळणार नाही, भाजपाच मोठा पक्ष असेल; पण बहुमत नसेल अन्‌ मोदी पंतप्रधान होणार नाहीत... वगैरे, वगैरे! हे मात्र निवडणुकीत पडणार नाहीत, कारण हे लढणारच नाहीत!