ज्येष्ठांचा आरोग्य विमा
   दिनांक :25-Mar-2019
विमाजगत 
वाढता वैद्यकीय खर्च पाहता आरोग्य विमा ही काळाची गरज आहे. त्यातच हा विमा तरुण वयात घेतल्याने बरेच लाभ होतात. पण काही कारणांमुळे कमी वयात आरोग्य विमा घेतला जात नाही आणि साठी उलटल्यानंतर त्याची गरज भासते. उतारवयात व्याधी जडण्याची शक्यता लक्षात घेऊन विमा कंपन्याही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यासोबत नियम व अटी लागू करतात. म्हणूनच साठीनंतर आरोग्य विमा घेताना बर्‍याच अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. काही आजारांसाठी विमा संरक्षण मिळतही नाही.
 
 
 
आरोग्य विमा घेताना ज्येष्ठांना आपल्या आजाराची माहिती द्यावी लागते. तसंच आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यामुळे विमा पॉलिसी जारी करण्यातले धोके लक्षात घेऊ कंपनी काही अटी लागू करते. तसंच त्यानुसार हप्त्याची रक्कम ठरवते. ज्येष्ठांच्या आरोग्य विम्याचा हप्ता सर्वसामान्य आरोग्य विमा पॉलिसीच्या तुलनेत बराच जास्त असतो. त्यांना कमी रकमेचं विमा संरक्षण मिळतं. साठीनंतर कंपन्या तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देतात. यासोबतच ‘को-पेमेंट’ची अट असते. म्हणजे रुग्णालयाच्या बिलातली ठराविक रक्कम ज्येष्ठांना आपल्या खिशातून भरावी लागते. ही रक्कम जेवढी जास्त तेवढा हप्ता कमी होतो. तसंच उतारवयातल्या विविध प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी दिल्या जाणार्‍या विमा संरक्षणावरही मर्यादा येतात. या कारणांमुळे उतारवयात आरोग्य विमा घेण्याचे फार लाभ मिळत नाहीत.