पाकने हिंदूंवरील अत्याचार थांबवावे...
   दिनांक :25-Mar-2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात दोन हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतरण आणि जबरदस्तीने निकाह लावण्याच्या घटनेमुळे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होण्याच्या आधी पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानमधील दक्षिण सिंधच्या दहारकी शहराजवळ हाफीज सलमान गावातील रीना आणि रविना या दोन सख्ख्या बहिणींचे, 20 मार्चला घरात घुसून अपहरण करण्यात आले, नंतर या दोन बहिणींचे धर्मांतरण करून जबरदस्तीने निकाहही लावण्यात आल्याची घटना, पाकिस्तानात अल्पसंख्यक म्हणवणार्‍या हिंदूचे जीवन सुरक्षित नाही, हे दर्शवणारी आणि म्हणूनच भारताची चिंता वाढवणारी आहे. कोहबर आणि मलिक जातीच्या लोकांनी आपल्या मुलींचे अपहरण केल्याची मुलींच्या पित्याची तक्रार आहे. ही तक्रार पााकिस्तानातील पोलिसांनी सुरुवातीला नोंदवली नाही. याबाबतचे वृत्त भारतीय दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यतत्पर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी याची गंभीरपणे नोंद घेत, पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोगाकडून याबाबतचा अहवाल तातडीने मागवला. एवढेच नाही, तर आपल्या सरकारने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक पत्र पाठवून पाकिस्तानातील अल्पसंख्यक लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
 

 
 
 
पाकिस्तानात अल्पसंख्यकांवर अन्याय-अत्याचार होण्याची ही पहिलीच घटना नाही, याआधीही असे अनेक प्रकार घडले आहेत. भारताने वेळोवेळी अधिकारिक पातळीवर अशा अत्याचारांकडे पाकिस्तानचे लक्ष वेधत, दोषींवर कारवाई करण्याची तसेच पीडित हिंदूंना न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे. मात्र, यावेळी थेट परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील घटनेची दखल घेतल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला.
 
पाकिस्तानातील वाहिन्यांनी, हा पाकिस्तानातील अंतर्गत कारभारात भारताचा हस्तक्षेप असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे दळणवळण मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी वाहिन्यांचीच री ओढली आहे. ही पाकिस्तानातील अंतर्गत बाब आहे, असा दावा करत फवाद हुसेन यांनी या निमित्ताने, मोदींच्या भारतातही अल्पसंख्यकांवर अत्याचार होत असल्याची ओरड केली आहे. यालाही सुषमा स्वराज यांनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. सुषमा स्वराज यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश पंजाब आणि सिंध प्रांतातील सरकारांना दिले. गंमत म्हणजे मोदी सरकारवर आगपाखड करण्याच्या नादात चौधरी फवाद हुसेन यांनी या घटनेची अप्रत्यक्ष कबुली देऊन टाकली आहे. ही पाकिस्तानातील अंतर्गत बाब आहे, असे म्हणत फवाद हुसेन यांनी या दोन हिंदू मुलींचे अपहरण, धर्मांतरण तसेच निकाह झाल्याचे एकप्रकारे मान्य केले आहे. पाकिस्तानात राहणारे हिंदू हे पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्यामुळे पाकिस्तानात राहणार्‍या हिंदूंचे रक्षण करण्याची जबाबदारीही पाकिस्तानच्या सरकारचीच आहे. पाकिस्तान सरकार ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नसल्यामुळे सुषमा स्वराज यांना त्याची दखल घ्यावी लागली.
 
मुळात, पाकिस्तानात राहणार्‍या हिंदूंवर कोणत्याही प्रकारचे अन्याय आणि अत्याचार होणार नाही, याची काळजी पाकिस्तान सरकारने घ्यायची आहे. जेव्हा पाकिस्तान आपल्या देशातील अल्पसंख्यक हिंदूंची पूर्ण काळजी घेईल, त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचे अन्याय आणि अत्याचार होऊ देणार नाही, तेव्हाच पाकिस्तानला भारतातील अल्पसंख्यकांवर होणार्‍या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवता येईल. जेव्हा आपण एक बोट दुसर्‍यावर रोखतो, तेव्हा उर्वरित चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात. काचेच्या घरात राहणारे दुसर्‍याच्या घरावर दगडफेक करू शकत नाहीत, याची जाणीव पाकिस्तानने ठेवली पाहिजे.
या घटनेच्या पाठोपाठ पाकिस्तानच्या मुल्तान प्रांतातही आणखी काही हिंदू तरुणींचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात दरवर्षी हजारावर हिंदू मुलींचे अपहरण केले जाते तसेच त्यांचे धर्मांतरण करून जबरदस्तीने निकाह लावण्यात येतो. आम्ही स्वेच्छेने धर्मांतरण तसेच निकाह केल्याचे अशा तरुणींकडून धमकावून वदवून घेतले जाते. ताज्या घटनेतील मुलींचाही असाच व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. मात्र, ही पाकिस्तानची नेहमीचीच खेळी आहे. मुल्तान प्रांतातून अपहृत करण्यात आलेल्या दोन तरुणींचा व्हिडीओ पाकिस्तानातील वाहिन्यांवरून दाखवण्यात येत आहे, ज्यात त्या आपल्यावर होणार्‍या अत्याचाराचा पाढा वाचत आपल्या सुटकेची मागणी सरकारकडे करताना दिसतात.भारतात मुस्लिम तर पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यक आहेत.
 
भारतात मुस्लिम जेवढे सुरक्षित आहेत, त्याच्या दहा टक्केही पाकिस्तानातील हिंदू सुरक्षित नाहीत. भारतात स्वत:ला अल्पसंख्यक म्हणवणार्‍या मुस्लिमांची संख्या 20 कोटींच्या घरात आहे, तर पाकिस्तानात अल्पसंख्यक असलेल्या हिंदूची संख्या 75 ते 90 लाख आहे. भारतात काही कोटींच्या घरात असलेला मुस्लिम समुदाय स्वत:ला अल्पसंख्यक म्हणवत, त्याला लोकशाहीने मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करत आहे. याला देशात आतापर्यंत सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या सरकारांचे अल्पसंख्यकांच्या लांगूलचालनाचे धोरणही जबाबदार आहे. त्यामुळेच आपल्या देशात स्वत:ला अल्पसंख्यक समजणारे मुस्लिम बहुसंख्यकांवर दादागिरी करू शकतात; तर पाकिस्तानात बहुसंख्यक असणारे मुस्लिम तेथील अल्पसंख्यकांवर अन्याय-अत्याचार करत असतात. म्हणजे भारतात बहुसंख्यक असल्यामुळे, तर पाकिस्तानात अल्पसंख्यक असल्यामुळे हिंदूवर अत्याचार होत आहेत. याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न हिंदूंनी केला तर त्याला धर्मांध ठरवले जाते. भारतात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या राजकीय पक्षांचे नेते जसे मुस्लिमांची बाजू घेतात तसेच पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदूंची बाजू घेणारे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष तसेच संघटना नाहीत, हे तेथील हिंदूंचे दुर्दैव म्हणावे लागेल. हरयाणातील गुरुग्राम येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका अल्पसंख्यक कुटुंबावर घरात घुसून हल्ला करण्यात आला. मुळात अन्याय आणि अत्याचार कुणावरही होवो, तो वाईट आणि निषेधार्हच असतो. त्याकडे अल्पसंख्यक वा बहुसंख्यकाचा चष्मा लावून पाहणे योग्य नाही. अन्याय आणि अत्याचार कुणावरही होत असेल, तर तो थांबवला पाहिजे, संबंधिताला न्याय दिला पाहिजे. मात्र, आपल्या देशात अल्पसंख्यकांवर अन्याय झाला तर स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष नेते जेवढे अस्वस्थ होतात, तेवढे पाकिस्तानात तेथील अल्पसंख्यकावर अन्याय-अत्याचार झाला तर अस्वस्थ का होत नाहीत, पाकिस्तानातील अल्पसंख्यक हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत, हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे. बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान गोंधळलेला आहे. भारताचा लष्करी पातळीवर मुकाबला करण्याची ताकद नसल्यामुळे, भारतात घातपाती कारवाया घडवून आणत, पाकिस्तानात असलेल्या अल्पसंख्यक हिंदूंचे जीवन जगणे पाकिस्तान कठीण करत आहे. पण, हा प्रकार आता भारत कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही, याची जाणीव पाकिस्तानने ठेवली पाहिजे. भारतातील अल्पसंख्यकांसाठी जशा वागणुकीची अपेक्षा पाकिस्तान करतो, तशीच वागणूक पाकिस्तानातील हिंदूंनाही मिळाली पाहिजे.