छुपे हुये गद्दारों से...
   दिनांक :25-Mar-2019
 
पाकिस्तान हा दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे, ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य असलेल्या बहुतेक देशांनी मान्य केली आहे. आतापर्यंत भारतासह जगातील अनेक देशात ज्या दहशतवादी कारवाया झाल्या, त्याची पाळेमुळे ही पाकिस्तानातच असल्याचे सार्‍या जगाने कबूल केले आहे. अमेरिकेवरील ट्विन टॉवर्सवर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्ताननेच आपल्या भूमीत लपवून ठेवले होते, हे जगजाहीर आहे. पण, त्याने ओसामाला अमेरिकेच्या हवाली केले नाही. शेवटी अमेरिकेलाच आपले कमांडो पाठवून ओसामाचा खात्मा करावा लागला. ही बाबही जगजाहीर आहे. संपूर्ण जगाची ही खात्री आहे की, पाकिस्तान हा दहशतवाद्यांना हिंसक कृत्ये करण्याचे प्रशिक्षण देतो व अन्य देशांमध्ये हल्ले करवितो. त्याची झळ भारताला सर्वात अधिक पोहोचली आहे. हे वास्तव मात्र आपल्या देशातील काही गद्दार लोकांना मान्य नाही. त्यात कॉंग्रेस पक्षाचे नेते सर्वात आघाडीवर आहेत.
राष्ट्रकवी प्रदीप यांनी 50 वर्षांपूर्वी एक गीत लिहिले होते-
कहनी है इक बात मुझे इस देश के पहरेदारोंसे
संभल के रहना देशमे अपने छुपे हुये गद्दारोंसे...
 
 

 
 
 
आज त्या घटनेला 50 पेक्षा अधिक काळ लोटला. पण, ते गीत आजही किती प्रासंगिक आहे, याची साक्ष पटते. कवी प्रदीप यांना स्वातंत्र्यानंतर असे काय जाणवले असेल की, ‘संभल के रहना देशमे अपने छुपे हुये गद्दारोंसे’ असे आपल्या गीतातून देशाला, लष्कराला सांगावेसे वाटले. त्या गद्दारांची पिळावळ आता बरीच फोफावली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपासून तर बहुतेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा त्यात समावेश आहे. पुलवामा हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. त्याचा बदला म्हणून मोदी सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी एअर स्ट्राईक केला. विंग कमांडर अभिनंदन यांची अवघ्या 50 तासांत मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यास पाकिस्तानला भाग पाडण्यात आले. हे सर्व वास्तव भारतासमोर आहे तसेच ते जगापुढेही आहे.
 
पण, गद्दारांची जात, धर्म, पंथ, संप्रदाय नसतो. त्यांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे गद्दारी. या सर्व गद्दारांच्या पिलावळींनी अशी मागणी केली की, एअर स्ट्राईकचे पुरावे द्या. किती अतिरेकी मारले त्याचा आकडा सांगा. एखादा गद्दारच अशी मागणी करू शकतो. दुसर्‍या देशात जर अशी मागणी केली असती, तर त्याला मरेपर्यंत तुरुंगयातना भोगाव्या लागल्या असत्या. पण, भारतात लोकशाही आहे आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार आहे म्हणून त्याच्या आवरणाखाली हे गद्दार लष्कराला त्यांच्या कारवाईचे पुरावे मागत आहेत. पहिल्या वेळी जेव्हा उरीवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता, त्याचा बदला म्हणून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. त्याचाही पुरावा याच गद्दारांनी मागितला होता. आपल्या देशाच्या लष्करावर ज्याचा विश्वास नाही, जे लष्कराच्या विरोधात बोलतात त्यांच्यासाठी अनेक देशांत मृत्युदंडाचीही शिक्षा आहे. पण, भारतात तशा शिक्षेची तरतूद नाही. मतदार मात्र शिक्षा देऊ शकतात.
 
राहुल गांधी यांचा निवडणूक मार्गदर्शक आणि कॉंग्रेसच्या जाहीरनामा समितीचा सदस्य सॅम पित्रोदा नावाचा एक माणूस परवा बरळला- ‘‘पुलवामा हल्ला ही तर मामुली घटना आहे. अशा घटना होतच राहणार. मुंबईवर कसाबसह आठ-दहा लोकांनी हल्ला केला म्हणून संपूर्ण पाकिस्तानला कसे काय दोषी धरता येईल?’’ असा प्रश्न या दिवट्याने उपस्थित केला आहे. सॅम हा कॉंग्रेस आणि राहुलच्या गळ्यातील ताईत आहे. राहुल गांधी जेव्हा विदेशात जातात, त्याला सोबत घेऊन जातात आणि राहुल त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. या सॅमचे पुढे म्हणणे आहे की, एअर स्ट्राईक केल्याचे पुरावे सरकारने दिले पाहिजेत. त्याने आवर्जून न्यू यॉर्क टाईम्सचा हवाला दिला आहे. सॅम म्हणतो, जगातील अनेक वृत्तपत्रांनी असे म्हटले आहे की, तेथे एअर स्ट्राईक वगैरे झालाच नाही. सरकारने याचा खुलासा केला पाहिजे. खुलासा मागण्याचा या गद्दाराला हक्क कुणी दिला? न्यू यॉर्क टाईम्स हे महत्त्वाचे वृत्तपत्र आहे, असा एक समज भारतात आहे. तो चूक आहे. मुळात हे माध्यम भारतविरोधी आणि आता मोदीविरोधी आहे. सध्या तर त्याने कॉंग्रेस पक्षाची सुपारी घेतली आहे. न्यू यॉर्क टाईम्स हा एकेकाळी भारताची चार ओळीची बातमी छापत नव्हता. आता तो भारतविरोधी बातम्या प्रकाशित करीत आहे. एअर स्ट्राईकच्या घटनेवर या माध्यमाने 11 मार्चच्या अंकात म्हटले आहे की, असा स्ट्राईकच झाला नाही. भारतीय वायुसेनेने लॉक केलेले टागरेट चुकले. अभिनंदनला पाकिस्तानने सोडणे हे त्याने चांगले काम केले. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी पाकिस्तानवर आक्रमण करण्याची परिस्थिती निर्माण केली, ज्यावर टीका झाली वगैरे. मोदी सरकारच्या विरोधात जेवढे काही वाईट आणि खोटेनाटे सांगता येईल, तेवढे कर्म न्यू यॉर्क टाईम्स इमानेइतबारे करीत आहे. सॅम पित्रोदा याचा आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास नाही, न्यू यॉर्क टाईम्सवर आहे.
 
लष्कराची गळचेपी करणे, जवानांचे नाहक बळी देणे, अपमान करणे हा जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून प्रत्येक गांधी परिवाराचा डीएनए राहिला आहे. 1962 च्या युद्धात आपल्या शेकडो सैनिकांचे नाहक प्राण गेले ते केवळ नेहरूंमुळे. आपण आपली हजारो मैल भूमी गमावली ती नेहरूंमुळे. हे वास्तव आहे. सॅम पित्रोदा याच्या निवेदनातून एक बाब मात्र स्पष्ट झाली. मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्णय यासाठी घेतला गेला नव्हता, कारण त्यात पाकिस्तानचा हात नव्हता, असे सॅम बोलून गेला. पुलवामातही पाकिस्तानचा हात नाही, हेच त्याचे सांगणे आहे आणि मोदींनी एअर स्ट्राईक का केला ते त्याचे आणि कॉंग्रेसचे दुखणे आहे. भारताला बदनाम करून पाकिस्तानची बाजू घेणारा हा केवळ गद्दारच असू शकतो. सॅम पित्रोदा हा आणखी एक गद्दार. आपले एक जवान हेमराज याचे शिर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कापले होते. तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग संसदेत म्हणाले होते, ‘‘त्यात पाकिस्तानचा हात नाही. ते अतिरेकी होते.’’ हे विधान त्यांनी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरूनच केले होते, यात शंका असण्याचे कारण नाही. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा कुपुत्र संदीप दीक्षित याने, आपल्या लष्करप्रमुखांना गुंडा म्हटले होते. दुसर्‍या देशात असे विधान केले असते तर भर चौकात गोळ्या घालून ठार मारले असते. कॉंग्रेस पक्षात एवढ्या भारतविरोधी लोकांचा समावेश झाला आहे की, कॉंग्रेस हा भारतविरोधी राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची शंका गडद होते. केवळ मोदींना पराभूत करण्याच्या नादात आपण देशाशी गद्दारी करीत आहोत, याचेही भान राहुल गांधी यांना राहिलेले नाही. त्याचा प्रारंभ त्यांनी मणिशंकर अय्यरपासून केला होता. तो पाकिस्तानात जाऊन बरळला होता- ‘‘ये मोदी को पहले हटाना है...’’ प्रारंभ तेथून झाला होता. त्यानंतरच्या कॉंग्रेसकडून पाकला बळ देण्याचेच काम सातत्याने झाले आहे. पाकिस्ताबाबत मोदींचे कठोर धोरण, काश्मीर खोर्‍यातील अतिरेक्यांचा खात्मा हे कॉंग्रेसला नको आहे. पुन्हा मोदीच पंतप्रधान म्हणून आले तर मग आपली खैर नाही, हे राहुलला चांगले माहीत आहे. अशा लोकांना वठणीवर आणण्याचे काम फक्त मतदारच करू शकतात!