कॉंग्रेस अर्धी लढाई आताच हारली
   दिनांक :26-Mar-2019
 आघाडी करण्यात राहुल अपयशी
 - राजकीय निरीक्षकांचे विश्लेषण
 
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी आपापले दंड थोपटले आहेत. पण, या सर्व घडामोडीत कॉंग्रेस कुठे आहे? असा प्रश्न आता कॉंग्रेसमधूनच उपस्थित होऊ लागला आहे. तर, राजकीय भाष्यकारांनीही आलेली संधी राहुल गांधी यांनी गमावली, अशी टीका केली आहे.
 
राजकीय निरीक्षकांनी असे विश्लेषण केले आहे की, कर्नाटकमध्ये जदएससोबत युती करून तेथे सत्तेत सहभागी झाल्यानंतर सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आले होते. ती संधी एकवटून राहुल गांधी यांनी एक पाऊल तेव्हाच पुढे टाकले असते, तर आज कॉंग्रेसचे चित्र काही वेगळे दिसले असते. पण, नेमकी येथेच चूक झाली. राहुल गांधी यांनी प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्यात प्रचंड विलंब केला. त्यानंतर एक संधी आणखी चालून आली. हिंदीबहुल पट्ट्यातील मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली. कदाचित त्याने राहुल हुरळून गेले असावेत. पण, विधानसभेच्या निवडणुका या राज्यापुरत्या मर्यादित असतात आणि लोकसभा निवडणूक ही केंद्रातील सत्तेसाठी असते, यातील फरक राहुलच्या लक्षात आला नाही. त्यांना वाटले की, आपलीच लाट आहे. सारे प्रादेशिक पक्ष आपल्यासोबत युती करण्यास तयार होतील. पण, त्यांचा अंदाज चुकीचा ठरला.
 
 
 
गेल्या चार महिन्यांतील घडामोडी बघितल्या तर कॉंग्रेस जवळजवळ एकटी पडल्यासारखी झाली आहे. त्याला कारणीभूत राहुल गांधी यांचेच धोरण आहे. प्रत्येकच प्रादेशिक पक्षाला आपली अस्मिता प्यारी असते, हे राहुल विसरले आणि आता तर अशी स्थिती आहे की, कॉंग्रेसला तीन चतुर्थांश जागावर एकटे लढावे लागणार आहे. जे प्रादेशिक पक्षाचे नेते कर्नाटकमध्ये एका व्यासपीठावर आले होते, त्यांच्या विरोधातच लढण्याची पाळी कॉंग्रेसवर आली आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे उदाहरण देता येईल. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असताना, तेथे बसपा आणि सपासोबत आघाडी होण्यासाठी राहुलने प्रयत्न करण्याची गरज होती. त्यासाठी त्यांनी सोनिया गांधींची मदत घ्यायला हवी होती. कारण, एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला मायावती आणि अखिलेशही उपस्थित होते. पण, राहुलने ती संधीही गमावली. एककल्ली विचार केला आणि सर्वकाही मीच अशी भूमिका घेतली. ती त्यांच्या अंगलट आली. तेव्हाच जर पुढाकार घेतला असता आणि योग्य व्यूहरचना आखली असती, तर आज उत्तरप्रदेशात बसपा-सपा-कॉंग्रेस अशी आघाडी झाली असती आणि भाजपासमोर मोठे आव्हान उभे करता आले असते. पण, ती संधी राहुलने गमावली आणि जागांच्या घोळामध्येच वेळ दवडला. सकारात्मक भूमिका घेण्यात राहुल सर्वच राज्यात अपयशी ठरले.
 
आता त्यांनी प्रियांकाला निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करून एक मोठा जुगार खेळला आहे. जे त्यांनी करायला नको होते. जर उत्तरप्रदेशात अपेक्षेनुसार जागा मिळाल्या नाहीत, तर जनतेच्या मनातून प्रियांका उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि राजकीय वर्तुळातही चुकीचा संदेश गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे बसपा-सपाला न विचारता एकतर्फी सात जागा बसपा-सपाला सोडण्याचा निर्णय जाहीर करणे. असे करण्याआधी मायावती आणि अखिलेश यांच्यासोबत चर्चा करता आली असती. पण, तसे झाले नाही. यामुळे मायावती आणखीनच खवळल्या. त्यांनी तर अमेठी आणि रायबरेलीमधूनही उमेदवार उतरविण्याचा इशारा देऊन टाकला. मायावती हे काय रसायन आहे, हे कदाचित कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले नसावे. किंवा  सांगूनही राहुलने त्याकडे दुर्लक्ष केले असावे. आता तर अशी स्थिती आहे की, राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघच धोक्यात आला आहे. तेथे भाजपाने स्मृती इराणी यांच्यामागे मोठी शक्ती उभी केली आहे. 2017 च्या निवडणुकीतही अमेठी मतदारसंघातील विधानसभेच्या चार जागा भाजपाने पटकावल्या आहेत. अशा स्थितीत राहुलने अतिशय सावधपणे पावले उचलण्याची गरज होती. पण, तसे झालेले दिसले नाही.
 
 
 
जी चूक उत्तरप्रदेशात केली गेली, तीच चूक पुन्हा पश्चिम बंगालमध्येही केली गेली. ममतांशी स्वत: राहुल गांधी यांनी जागेविषयी बोलणी करायला हवी होती. पण, राहुलने कोणताही पुढाकार न घेता ज्यांच्याकडे बोलणी करण्याची शक्तीच नव्हती, अशा नेत्यांना बोलणीसाठी पुढे केले. राहुल गांधी यांना ममता बॅनर्जी हे काय रसायन आहे, हेही समजले नाही. शेवटी जे अपेक्षित होते तेच झाले. राहुल गांधी यांना ममताविरुद्ध उभे ठाकावे लागले आणि मालदात नुकत्याच झालेल्या सभेत ममता या सुद्धा अत्याचारी आहेत, अशा शब्दात ममतांवर टीका करावी लागली. राहुलच्या मालदाच्या सभेला मोठी गर्दी होती. पण, एका सभेचे निकष संपूर्ण राज्यासाठी लागू पडत नाहीत. प्रचंड गर्दी तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही प्रत्येक सभेला झाली होती. पश्चिम बंगालमध्ये सध्या जनतेला पर्याय हवा आहे. तो भाजपाच्या रूपात दिसत आहे, कॉंग्रेसच्या नाही. राहुलने ममतांवर टीका केल्यामुळे ज्या राज्यात आघाडी होऊ शकली नाही, त्या राज्यांमध्येही चुकीचा संदेश गेला.
 
आज अशी स्थिती आहे की, कॉंग्रेसची बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीर या राज्यांखेरीज युती नाही. बिहारमध्ये तर अवघ्या 9 जागाच मिळाल्या. तामिळनाडूतही द्रमुकसोबत युती करताना 9 जागा पदरी पडल्या. हे चित्र आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससाठी आशादायी नाही. केवळ मोदींचा विरोध करून, मोदी सरकार हटविण्याचा नारा देऊन कॉंग्रेस अपेक्षित यश प्राप्त करू शकत नाही. उद्या जर कॉंग्रेसला 44 वरून 80 जागा जरी मिळाल्या तरी त्याला काहीही अर्थ उरणार नाही. कॉंग्रेसने आणखी एक बाब डोक्यातून काढली पाहिजे. विधानसभेत सत्ता मिळाली म्हणून लोकसभेच्या सर्व जागा आपल्याच पदरात पडतील, हा समज काढून टाकला पाहिजे. भाजपाही या राज्यात मजबूत आहे. मध्यप्रदेशात तर कॉंग्रेसचे काठावर सरकार आहे.
 
त्या तुलनेत भाजपाने प्रारंभापासूनच आघाडी घेतली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपाचे मनोबल काहीसे हलले होते. पण, भाजपाने असे कित्येक पराभव पचवले आहेत आणि त्यांना त्याची सवय आहे. भाजपाने पुन्हा तेवढ्याच ताकदीने मुसंडी मारली आणि आपली व्यूहरचना आखली. सर्व लहान पक्षांसोबत युती करण्यासाठी स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आघाडी घेतली. तामिळनाडूपासून तर पूर्वोत्तरातील राज्यांपर्यंत अगदी लहानसहान पक्षांसोबत युती करून भाजपाने कॉंग्रेसवर मात केली आहे. काही ठिकाणी नमते घेऊन कमी जागा मिळविल्या असल्या तरी त्यांच्यातील जोश हा दिल्लीचे तख्त पुन्हा काबीज कसे करता येईल, याकडे केंद्रित होता. आजच्या घडीला भाजपाने 24 लहान पक्षांसोबत युती केली आहे. भाजपासाठी एकेक जागा महत्त्वाची आहे, हीच बाब केंद्रस्थानी ठेवून त्यांनी व्यूहरचना आखली आहे. याचा प्रारंभ तीन राज्यांच्या पराभवाच्या मंथन बैठकीपासूनच झाला होता. त्याची चांगली फळे भाजपाला निश्चितच मिळणार आहेत. त्या तुलनेत कॉंग्रेस सपशेल अयशस्वी ठरली. आज जरी कॉंग्रेसजवळ स्वबळावर चार राज्ये असली तरी भाजपाजवळ त्या तुलनेत 15 राज्ये आहेत. भाजपाजवळ कार्यकर्त्यांची फौज आहे. कॉंग्रेसजवळ ती फौज नाही. केवळ आनुषंगिक कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी गोळा होत असतात, हेही एक चित्र आहे. निवडणूक ही पूर्ण जोमानेच लढवावी, हा भाजपाचा मंत्र आहे. तर कॉंग्रेसची ही स्थिती दिसली की, पुढे पाहू अशाच थाटात सर्व नेते वागत होते. यामुळे नुकसान कॉंग्रेसचेच होणार आहे. भाजपाने या निवडणुकीत जर पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर मित्रपक्षांकडून किती जागा सोबत येऊ शकतात याचाही अंदाज आतापासूनच बांधला आहे. भाजपा अजून मैदानात उतरलेली नाही. ती जेव्हा उतरेल, त्यानंतर काय चित्र असेल हे दिसणार आहे. तरीही भाजपाच आगामी निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करणार, यात कुणाचेही दुमत नाही.