तैत्तिरीयोपनिषदातील-‘‘आनंदवल्ली’’
   दिनांक :26-Mar-2019
 
 
प्राचार्य डॉ. माणिक पाटील
मो. 0721 2661410
 
 
 
उपनिषद ग्रंथाचे एक अनन्य साधारण वैशिष्ट्य आहे. या ग्रंथातील तत्त्वांमध्ये मृत्युनंतर काय होते या प्रश्नांना महत्त्व नाही. यात अभिप्रेत असलेली मुक्ती ही मरणोत्तर नसून आपण जगत असलेल्या जीवनातील आहे. तैत्तिरीयोपनिषदात ‘‘आनंदवल्लीत’’ मुक्ती कशी मिळू शकेल याची सविस्तर चर्चा आहे. आनंद म्हणजेच ब्रह्म व आनंदाची प्राप्ती म्हणजेच ब्रह्म प्राप्ती व हिच मुक्ती हा या आनंदवल्लीचा निष्कर्ष आहे.
 
 
 
आनंद मिळावा ही इच्छा प्रत्येक व्यक्तीची असते, कारण आनंद हीच मानवाची प्रकृती आहे. सहजावस्था आहे. आनंद म्हणजे सुख नव्हे. सर्व भौतिक सुखे मिळाली तरी काहीतरी मिळवायचं राहून गेलं असं वाटत राहतं. प्रथम सुखासाठी धडपड व नंतर ते तसेच कायम रहावे यासाठी आटोकाट प्रयत्न. मात्र या सुखाचा अंत दु:खातच होतो. सुख व दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख हे आनंदाचे प्रतििंबब आहे. प्रतििंबब हे नेहमी  बिंबाच्या विरुद्ध असते. आपण आरशासमोर उभे राहिलो तर आपण प्रत्यक्षात जसे उभे आहोत त्याच्या उलट आपलं प्रतििंबब असते. सुख हे बाह्य जगात व आनंद हा अंतर्यामी असतो. सुखाची दिशा ही स्वत:कडून जगाकडे जाणारी आणि आनंदाची जगाकडून स्वत:कडे येणारी असते. मानव वगळला तर संपूर्ण चराचर सृष्टी, निसर्ग हा आनंदी आहे. दु:ख निर्माण करण्याचे कौशल्य फक्त मानवातच आहे. प्रेमात आनंद आहे. पण या प्रेमाच्या गुलाबाला असलेले मत्सराचे काटे प्रेम नष्ट करतात. बाह्यजग हे नाशवंत आहे त्यातील वस्तुमात्रांचा हव्यास क्षणिक सुख व अंती दु:ख निर्मितीला कारणीभूत होतो.
 
म्हणूनच शास्वत आनंद कोणता? व तो कसा मिळवायचा? हाच आनंदवल्लीचा वर्ण्य विषय आहे. वरुण ऋषींचा मुलगा भृगू आपल्या पित्याला प्रश्न विचारतो की, भगवन मला ब्रह्म शिकवा. वरुण व भृगू यांच्या संवादातून आनंद प्राप्तीचे रहस्य उलगडले आहे. भृगू याचे वारुणी (वरुणाचे अपत्य) नाव आहे. आणि या संवाद माध्यमाने केेलेला उपदेश हा ‘भार्गवी’ किंवा ‘वारुणी’ विद्या नावाने प्रख्यात आहे.
 
भृगूच्या प्रश्नाचे उत्तर देतांना पित्याने ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी ज्या दारातून जायचे त्याची नावे प्रारंभी सांगितली, ती म्हणजे शरीरातले पंचकोष अन्नमय, प्राणमय, मनोमय, विनाशमय आणि आनंदमय. आणि त्याच वेळी तटस्थ ब्रह्माचे लक्षण सांगितले. उत्पत्ती स्थिती लय समयी सर्व भूतमात्र ज्याला सोडत नाही ते ब्रह्म असे ओळख. ही लक्षणे लक्षात ठेवून ब्रह्म - साक्षात्काराचे साधन म्हणून गुरूंच्या सांगण्याप्रमाणे तप सुरू केले. प्रथम अन्न नंतर प्राण याप्रमाणे तो एकएका कोषाचे चिंतन  करू लागला. अन्नाशिवाय, प्राणाशिवाय मनूष्य जगू शकत नाही जीवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आद्यघटक अन्न हेच ब्रह्म आहे असे त्याला वाटले. पण सूक्ष्म चिंतनानंतर आपल्याला झालेले ज्ञान चुकीचे आहे हे त्याच्या लक्षात आले. आनंदमय कोषावर लक्ष केंद्रित केल्यावर खरे ज्ञान झाले की, आनंद हेच ब्रह्म आहे.
 
प्रथम दर्शनी झालेले ज्ञान बरोबर आहे असे त्याला का वाटले? अन्न हाच घटक प्रथम विचारात घेतला तर आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेला हा घटक आहे. पण अन्नरसाने बनलेल्या या भौतिक देहाच्या आतल्या स्तरात प्राणांचे चैतन्य आहे. प्राणाच्या सहाय्याने सर्व इंद्रिये कार्यान्वित होतात. प्राणमय कोषाच्या आत मनोमय कोष वेदमंत्र शब्द हे नुसते कोरडे आहे. पण त्यातील अशक्य अर्थ समजणे आवश्यक आहे. शब्दाचं शब्दातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण, संश्लेषण, चिंतन , संकल्पन हे मनात होते. शब्द हे प्रतिक व त्याचे भावविश्व मनात असते. पण या मनावर अंकुश ठेवण्याचे कार्य बुद्धी म्हणजे विज्ञान करते. चिंतन हे मनाचे कार्य पण विवेकाने सत्यान्वेषणाने यौग्य निर्णय घेण्याचे कार्य विज्ञानमय कोष करतो. हे पाच कोष परस्परांवर अवलंबून आहेत. याचा कार्यकारण संबंध भृगूच्या लक्षात आला व त्याला चूक समजली. अन्नाचे उदाहरण घेतल्यास अन्न हे कार्य आहे जे उत्पन्न होते ते कार्य आणि कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. अन्नाचे मूळ घटक पाण्यावर पोसले जातात म्हणून पाण्याला अन्न म्हटले. प्रथम शरीर अन्न खाते म्हणून शरीर अन्न खाणारे व अन्न खाद्य, अन्न पाण्यावर अवलंबून म्हणून अन्न खाणारे व पाणी खाद्य, अन्नाच्या पचनासाठी उष्णता आवश्यक म्हणून अग्नी अन्न भक्षक अशा प्रमाणे खाणारा व खाद्य या द्वैताचा उहापोह केला. पण पुढची गंमत अशी की जो खाणारा आहे तोच खाद्य आहे व जे खाद्य आहे तेच खाणारे आहेत. या अद्वैताचाही उलगडा केला आहे. पृथ्वी व आकाश ही जोडी घेतली तर पृथ्वीतून अन्न निर्माण होते. पण ही पृथ्वी विशाल अवकाशाच्या पोटात आहे. म्हणून पृथ्वीला अन्न व आकाशाला अन्न भक्षक म्हटले. पुढे पृथ्वीमध्ये आकाश स्थित आहे म्हणजे पृथ्वी अन्न भक्षक व आकाश अन्न आहे. पृथ्वी ज्या वस्तूमात्राची बनलेली आहे त्याचे मूळ घटक म्हणजे सूक्ष्म अणू हे बहुतांशी पोकळ म्हणजे अवकाशाने व्याप्त आहे. म्हणून पृथ्वीत आकाश आहे. अशा प्रकारे अन्नाद: म्हणजे अन्न भक्षक व अन्न यातील परस्परावलंबीत्व अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
 
वरील सर्व विवेचन यासाठी की, भृगू जेव्हा िंचतन करून एकेका कोषावर लक्ष केंद्रित करू लागला तेव्हा त्याला कळले हे सर्व कोष परप्रकाशित आहेत. स्वयंभू नाहीत त्यांच्यात कार्यकारण भाव आहे. ब्रह्म तर अनादि आहे, स्वयंभू आहे परमतत्त्वाचा शोध तिथे संपतो व पंचकोषांना पार केल्यावरच त्याची प्राप्ती होऊ शकते. हा साक्षात्कार झाल्यावर त्याला या पलीकडे काही शोधायचे राहिले नाही. ब्रह्मानंद हीच आनंदाची परमसीमा आहे हे कळले.
आनंदाचे अनेक स्तर दिलेले आहेत. मानुषानंद म्हणजे लौकिक आनंद जो आपण दैनंदिन जीवनात छोट्या मोठ्या गोष्टींनी अनुभवतो. या आनंदाच्या शतपट देवगंधर्वाचा, त्याच्या शतपट निष्काम श्रौतियाचा, आजानज देवांचा, इंद्राचा, बृहस्पतीचा, प्रजापतीचा, ब्रह्माचा असे आनंदाचा उत्कर्ष दाखविणार्‍या अकरा स्तरांची चर्चा आहे. ही जी आनंदाची मीमांसा आहे ती फक्त शाश्वत आनंदाशी समरसता दाखविणारी आहे. आनंद कोषाच्याही पलीकडे जाऊन स्वत:चा विसर पडणे व वास्तवतेत विरून जाणारी अवस्था आहे ही समरसता झाल्यनंतर भृगूला आनंद हेच ब्रह्म आहे. हा साक्षात्कार झाला. आपलं अस्तित्त्व हा त्या परब्रह्माचा अंश आहे. त्या चैतन्याचा आर्विभाव आहे. सर्व विश्वाला उर्जा देणारा उर्जेचा महास्त्रोत तो हिरण्यगर्भ आहे. सर्व विश्वच ह्यात विलीन होते, उरते फक्त एक वास्तव, चैतन्य, आनंद. म्हणूनच आनंद ही प्रकृती अन्य विकृती आहेत. सामान्य माणसाला हे तत्त्वज्ञान आचरणात आणणे कठीण असले तरी अशक्य नाही. साधनेच्या एक एक पायर्‍या चढत जाण्यापूर्वी आपल्या भोवती जे काही चांगलं आह ते बघणे त्यावर चिंतन करणे हे तर आपल्या हातात आहे. चांगले म्हणून जे जे आहे ते ऐकणे आणि वाचेने चांगल्या मधून वाणीचा उच्चार करणे. यामुळे जो आनंद होतो तो लौकिक स्तरावरचा असला तरी निरुपाधिक ब्रह्मनंदाचा तो अंशच आहे. दु:ख, निराशा हे आपल्य जीवनाचेच भाग आहेत. पण एक दार बंद झाले की, दुसरं उघडतच हा विश्वास ठेवला तर अनंदवल्लीतील खालील विधानाची सत्यता पटेल.
आनंदात्‌ एवं खलु इमानि भूतानि जायन्ते।
आनन्देन जातानि जीवन्ति,
आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्तीति।।
-
.......................................