पर्यटकांचा स्वर्ग : पॅरीस
   दिनांक :26-Mar-2019
 फिरारे इंटरनॅशनल
नीलेश जठार
९८२३२१८८३३
निव्वळ पर्यटनावर राज्यातील किंवा देशातील लोकं चांगले जीवन जगू शकतात, याचे उदाहरण स्वित्झर्लंड. त्यापाठोपाठ छोट्या-छोट्या देशांनीही आपल्याकडील पर्यटनाचे मार्केिंटग करून जगातील जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्याचा चंगच बांधला. त्यामुळे सिंगापूर, हॉंगकॉंग, थायलंड, मलेशिया आदी राष्ट्रांची अर्थव्यवस्था सुधारली, तर इजिप्त, तुर्कस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांतील अर्थकारणाला बर्‍यापैकी आधार लाभला. आपल्याकडे केरळ हे याचे उत्तम उदाहरण. काश्मीरने तर दहशवादाच्या वणव्यातही पर्यटनाचे रक्षण आणि संगोपन केले. राजस्थान हा परदेशी पर्यटकांसाठीचा आवडता प्रांत, पण त्या तुलनेत महाराष्ट्रात ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि कोणत्याही पर्यटकाला आवडतील अशी डझनावारी ठिकाणे आहेत; परंतु कोकण वगळता महाराष्ट्राच्या कोणत्याही क्षेत्राने पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत.
 
हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिला पॅरिस या शहराबद्दल एकदा पत्रकारांनी विचारले असता ती उत्तरली, ‘पॅरिस इज ऑलवेज अ गुड आयडिया!’ होय, तिलाच काय, जगातील कोणत्याही भटक्याला विचारा. तो पॅरिसला भेट देण्याच्या निव्वळ कल्पनेनेच सुखावलेला दिसेल. गेल्या दोन हजार वर्षांपासून सीन नदीच्या काठावर वसलेल्या या कलासक्त लोकांच्या कलात्मक शहराने जगाला अक्षरश: भुरळ घातली आहे. आजही पॅरिस या शहराला सर्वाधिक पर्यटक भेट देतात. आयफेल टॉवरचा मनोरा, लुव्रचे मनोहारी कलासंग्रहालय, सीन नदीचा किनारा, जिथे पाहावे तिथे देशविदेशातील पर्यटकांची गर्दी दिसते. त्यामुळेच असेल कदाचित नुकत्याच ट्रिप ॲडव्हायजर्स या पर्यटन संस्थेतर्फे जगभरातील पर्यटन स्थळांची जी स्पर्धा घेतली गेली, त्यातही पॅरिसनेच बाजी मारली. जगातील सर्वाधिक पसंतीचे शहर म्हणून पॅरिसचा गौरव करण्यात आला. पॅरिसच्या खालोखाल अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इंग्लंडच्या लंडनने दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
 
 
 
दुर्दैव! पर्यटकांच्या पसंतीच्या पहिल्या २५ शहरांत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही. नाही म्हणायला आशियाई देशातील पहिल्या २५ शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक आहे २४ वा, तर गोवा २२ व तर जयपूर २० व्या स्थानावर आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, दिल्लीने १६ वा क्रमांक पटकावून देशाची थोडीफार इज्जत राखलेली आहे. एकूण काय- तर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आम्ही कुठेच नाही. यामागील कारणे काय असतील? आपल्याकडे ज्याप्रमाणे बाहेरून आलेल्या पर्यटकांना बसमधून शहर दर्शन घडवतात, त्याप्रमाणे पॅरिसमध्येही उघड्या टपाच्या बसमधून शहराचे धावते दर्शन घडविले जाते, पण तो कार्यक्रम सुरू होण्याआधी पॅरिस शहराचा समग्र इतिहास सांगणारा माहितीपट दाखवण्यात येतो. त्या माहितीपटाच्या शेवटी एक वाक्य पडद्यावर झळकले..
 
‘पॅरिस तुमच्या श्वासात भरून घ्या आणि तुमच्या आत्म्याचे पोषण करा...’ थोर विचारवंत, भविष्याचा वेध घेणारा मानवतावादी लेखक ‘व्हिक्टर ह्युगो’ यांचे हे वाक्य. एका लेखकाने छान लिहिलंय्‌, तुम्हाला जर खरोखर पॅरिस पाहायचे असेल, तर रस्त्यावर या. होय! पॅरिसचे रस्ते म्हणजे या शहराची खरी ओळख. हे रस्ते दिवसा जितके सुंदर दिसतात, आखीव-रेखीव वाटतात, तेवढेच रात्रीही खुलतात. दिवसा मोटारी अंगाखांद्यावर खेळविणार्‍या या रस्त्यांच्या अंगणात रात्री कलाकार, चित्रकार, विविध वाद्य वाजविणारे, चमचमीत खाद्य पुरविणारे आणि या सगळ्या रंगीबेरंगी जत्रेत सामील होण्यासाठी प्रेमाने आलेले लोक गर्दी करतात. मध्येच एखादा बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा कलंदर पोरा-टोरांच्या घोळक्यात धम्माल प्रयोग करताना दिसतो. तर कुठे आयुष्याची संध्याकाळ आणखी सुरम्य करण्यासाठी छान-छान कपडे घालून आलेले आजी-आजोबा अवती-भवतीचे विश्व विसरून सुखसंवादात मग्न झालेले दिसतात.
 
 
 
लुव्र संग्रहालयात प्रवेश करताना एक भले मोठे काचेचे पिरॅमिड दिसते. १९८४ मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँस्वा मितरॉं यांच्या कल्पनेतून या पिरॅमिडची निर्मिती सुरू झाली. आयएमपी या विश्वविख्यात तज्ज्ञाने त्याचा आराखडा तयार केला. लुव्र संग्रहालयाला भेट देणार्‍या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे त्याच्या, लुव्र राजवाड्याच्या मुख्य आवारात, ज्याला नेपोलियन बोनापार्टेचे नाव दिले आहे, तेथे खूप गर्दी होत होती. त्या गर्दीला सुनियोजितपणे आवरण्यासाठी आणि वाट देण्यासाठी या पिरॅमिडची उभारणी झाली; पण डॅन ब्राऊनच्या ‘दा विंची कोड’मधील फ्रँस्वा मितरॉं यांच्या संदर्भातील गूढता वाढवणारा उल्लेख आणि ६६६ या सैतान संकल्पनेशी संबंधित आकड्याचा (जो खोटा आहे) या पिरॅमिडशी जोडलेला संबंध, यामुळे फ्रान्समध्ये जोरदार वादळ उठले होते. काहींनी तर राष्ट्राध्यक्ष मितरॉं यांची इजिप्तमधील फॅरोह यांच्याशीही तुलना केली.
 
पेई यांच्या या लोकविलक्षण शिल्पाकडे आता प्राचीन कला आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचा सुरेख संगम म्हणून पाहिले जाते. तुम्ही या मुख्य पिरॅमिडच्या मधोमध उभे राहिल्यास अवती-भवतीची गर्दी आणि डोक्यावरील अवकाशाला लाभलेले काचेचे बहुमितीय छप्पर या दोन्हींच्या पोकळीतून लुव्र संग्रहालय तुम्हाला साद घालत असल्याचा आभास होतो.
 
हे संग्रहालय फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी राजाचा राजवाडा होते. विविध राजांनी त्यांच्या व्यक्तिगत संग्रहासाठी जगभरातील कलात्मक वस्तू गोळा केल्या होत्या. क्रांतीच्या नेत्यांनी नेत्यांनी राजवाड्याचे कलासंग्रहालयात रूपांतर करण्याचे ठरवले आणि त्यानुसार १७९३ पासून हा कलासाठा लोकांना पाहण्यासाठी खुला झाला. नंतरच्या काळात फ्रान्समधील सगळ्याच समर्थ नेत्यांनी, त्यात नेपोलियन बोनापार्टेचाही समावेश होतो, भल्या-बुर्‍या सगळ्या मार्गानी जगातील कलात्मक वस्तू लुव्र संग्रहालयात आणण्याचा सपाटा लावला. त्यामुळे सध्या काही मैल लांबी असलेल्या, तीन इमारतीत पसरलेल्या या संग्रहालयात आज ३० लाख कलात्मक वस्तू आहेत. त्यात सहा हजार मौल्यवान चीजवस्तूंचा आणि पाच हजारांहून अधिक महत्त्वपूर्ण शिल्पांचा समावेश आहे. रोमन, ग्रीक आणि प्राचीन इजिप्तमधील पुरातन चित्र-शिल्पांपासून १९ व्या शकतातील मॉनेट, देगा, रेनॉयर आदींच्या कलाकृतींपर्यंत एकाहून एक सरस गोष्टी या संग्रहालयात पाहायला मिळतात. त्यामुळे देशोदेशीचे पर्यटक, चित्रकार आणि कलेचे अभ्यासक येथे येतात आणि कलाविश्वात हरवून जातात.. संध्याकाळची सोनकिरणे अवघ्या आसमंतावर पसरते आणि अचानक दिवसा बर्‍यापैकी रुक्ष भासणारा आयफेल टॉवर, दिव्यांच्या तेज:पुंज प्रकाशात न्हाऊन निघालेला दिसतो त्याच्या सौंदर्याचा दीपत्कार जणू पॅरिसच्या ऐश्वर्याचा साक्षात्कार होता...