हेमिस उत्सव... बोऽऽअर!
   दिनांक :26-Mar-2019
घुमू संगतीनं
 अमान रेड्डी
सकाळी आवरून समोर गेलो, तर तेव्हा पण ‘खोली १० पर्यंत खाली करा’, असं सांगितल गेल. मग परत जाऊन खोळ भरली. येऊन नाष्टा केला. आज आम्ही तिघेही बाईक काढायला तयार नव्हतो. त्यामुळे आधीच आम्ही दुरुस्ती वाहनात बसून जाणार असे ठरले होते. त्या प्रमाणे हेमिसकडे कूच केले. हेमिस उत्सव १० ला सुरू होतो, तेव्हा जागा पकडायला ९ वाजताच तिथे पोहोचा... वगैरे ऐकून होतो. त्यामुळे आज पहाटेच उठून साडेआठला हॉटेल सोडलेे. रस्ता सिंधू नदीच्या काठाने जात होता. आता समोर टेकडीवर हेमिस दिसू लागले. सिंधू ओलांडून टेकडी चढली. ३ किलोमीटरवर गुहा राहिली असताना तिथल्या रक्षकांनी गाडी अडवली आणि ‘‘आता पायी जा’’ सांगितले. वर ऊन वाढले होते. इथे दिवसा सावली नसेल तर ऊन फार लागते. अगदी घाम येतो. सावलीत मात्र हवा थंड असल्याने त्रास होत नाही. सिंधू नंतर वाटेत ४, ५ लडाखी भिख्खूंना गाडीत घेतले होते.
 
 
 
आम्ही जरा हुज्जत घालत होतो. ‘‘बाकीच्या गाड्या जाताहेत मग आम्ही का नाही?’’ तर म्हणे-‘‘ ५ आसनी आणि लहान, अशा गाड्यांना परवानगी आहे.’’ आमची १६ आसनी बस होती. तेवढ्यात आमचे २ दुचाकीस्वार आले. चला, एका मागे अतुल आणि एका मागे मी आणि अक्षय असे वर पोहोचलो. वर पोचेस्तो आधीच ठरल्या वेळेपेक्षा उशीर झाला होता. म्हणून आम्ही झटपट तिकीट काढायला गेलो तर इकडे अतुल लगेच खरेदीच्या मागे लागला होता. मग मी आणि अक्षय तिकीट काढून आत गेलो. तिथे आमची प्रवासी मंडळी बसलेली होती जागा धरून. त्यात आम्हालाही जागा होती. बसलो आणि २ मिनिटातच कशाला आलो, असं वाटू लागलं. वरून सूर्य आग ओकत होता. मग चक्क नेलेले टोपीवाले जाकीट घालून बसलो. त्यात वेगळी टोपीपण अडकवली. तरी पायाला भाजत होते. १० वाजले होते तरी कुठेच काहीही तयारी दिसत नव्हती. तासभर अस शिजल्यावर शेवटी ११ वाजता आता ‘‘निघून जाऊ’’ म्हणून उठलो तर ५ मिनिटात पहिला नाच सुरू होत आहे, अशी घोषणा झाली. मग परत बसलो. नाच कसले, भगवान दादा जसे हळू हळू हालचाली करत नाचल्यासारखे करायचे, तसा प्रकार ते लोक करत होते. तरी आलोच आहोत म्हणून ४ नाच बघितले. मग आम्ही तिथून सटकलो. अनेक फिरंग्यांनी ४००- ५०० रु.ची महागडी तिकिटे घेऊन मोठे मोठे कमेरे घेऊन फिल्डिंग लावली होती. त्यांच्यापण चेहर्‍यावर भ्रमनिरास दिसत होता.
 
 
 
बाहेर आलो तर आमचा चालक शोधण्यात थोडा वेळ गेला. तेवढ्यात अतुलने खरेदी केली. मग तो ‘‘भूक लागली’’ असं ओरडू लागला. त्याला एकदा भूक लागली की दम निघत नाही. म्हटलं ते मोमो विकत आहेत खा. तिथे गेलो तर मोमो संपले होते. फक्त थुक्पा होता. मग त्याने विचार सोडला. आता ३ किलोमीटर खाली चालून गाडी गाठली आणि तडक हॉटेल गाठले. आलो आणि पहिल्यांदा खोली ताब्यात घेऊन अतुलने त्याचे थर्मल्स वाळत टाकले. सकाळपासून त्याला त्याचीच चिंता होती. मग लगेच सैनिकी संग्रहालय बघायला पळालो कारण ते ५ वाजता बंद होते. अजय आत्ता सैनिकी क्षुधागृहात होता. १५ मिनिटांत संग्रहालयात गेलो. पहिल्याच दालनात मोठी प्रतिकृती आहे, लेह आणि परिसराची. अगदी पार पाकव्याप्त काश्मीरपासून ते मनालीपर्यंतची! त्याची माहिती एक सैनिक देत होता ते ऐकत होतो. मग आम्ही इतर दालने हिंडू लागलो. हे संग्रहालय फार अप्रतीम आहे. एका सैनिकाने आम्हाला हमारे साथ आइये असे फर्मावले. थोडे धास्तावलोच की आपण काय गडबड केली की काय म्हणून आता कोर्ट मार्शल! पण तो आम्हाला दुसर्‍या एका दालनात घेऊन गेला व अस्खलित मराठीत बोलत बरीच माहिती देऊ लागला. मग काय, सहसा न ऐकायला मिळणारे किस्से त्याच्याकडून ऐकले. खूपच मजा आली. तिथली सगळीच दालने भारी आहेत.
 
 
 
आम्हाला सगळ्यात आवडले ते सियाचेनमधे कसे रहातात आणि पाकिस्तानची पकडलेली शस्त्रास्त्रे! तिथून बाहेर पडेस्तो आमचे प्रवासी मंडळ आले होते. आता भूक जोरदारच लागली होती. बाजूलाच असलेल्या कॉफीच्या दुकानात शिरून मस्त बर्गर, बटाटा काप आणि कॉफी हाणली. आत्मा तृप्त झाला. मग सैनिकी क्षुधागृहाकडे गेलो. ते बंद झाले होते पण बाजूचे सैनिकी दुकान चालू होते. मग काय, अतुलला पर्वणीच! अतुल आणि अक्षयने जोरदार खरेदी केली. नेमकी पावसाळी विजार मात्र तिथे नव्हती.
 
आज काय ती खरेदी करून टाकायची होती. पण मुख्य म्हणजे अतुलला त्याच्या कॅमेराचा चार्जर मिळाला. या अभावी त्याच्या कमेरा बंद पडला होता कारगिल नंतर. परत येताना टी-शर्टच्या दुकानात शिरलो. आम्हा चौघांसाठी मुद्दाम नाव घातलेले टिशर्टस्‌ करायला टाकले. मी या प्रवासात दारू प्यायची नाही आणि मांसाहार पण नाही असं ठरवलं होतं. कारण तसंच नेटवर पण वाचलं होतं. अतुल आणि अक्षय तर पीतच नाहीत. इथे एक उत्तम गोष्ट आहे- ती म्हणजे लेहमधे प्लास्टिकची पिशवी देत नाहीत. नाही म्हणजे अजिबात नाही. त्यामुळेच बहुतेक पंगोंग, नुब्रा इथे कुठेच प्लास्टिक असे दिसले नाही फेकून दिलेले. आम्ही मात्र नेहमीप्रमाणे लहान लहान कचरासुद्धा खिशात घालून घेऊन आलो आणि फक्त लेहच्याच हॉटेलमधील कचराकुंडीत टाकला आणि लेह नंतर एकदम मनालीमधे!
१२ वाजले. मग जर्दाळूची बाटली उघडून ३ पेग भरले आणि चिअर्स केले. आता झोपायला हवे.