निवडणूक काळात नऊ दिवस राहणार 'ड्राय डे'
   दिनांक :26-Mar-2019
 
 
देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी मोठ्या जोरात सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्यापरीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामे आणि आश्र्वासनांचा पाऊस पाडताना दिसत आहेत.
असं असतानाच निवडणूक आयोगाने निवडणुकींची घोषणा केल्यापासून आचारसंहिता लागू झाली असल्याने अनेक निर्बंधही राजकीय पक्षांवर घालण्यात आले आहेत. सात टप्प्यांमध्ये देशभरात निवडणूक आचारसंहितेच्या नियमांनुसार वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दारू विक्रीची दुकाने असणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक संबंधित शहरामध्ये दोन दिवस आधीच ड्राय डे असल्याने दारूविक्रीवर बंदी असेल.
 

 
 
नियमानुसार मतदाना संपण्याच्या वेळेच्या आधीचे ४८ तास ड्राय डे म्हणून पाळले जातात. म्हणजेच ज्या शहरामध्ये सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असेल तर शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासूनच शहरात दारूबंदीचा नियम लागू होईल. म्हणजेच राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असेल तर ८ दिवस ड्राय डे आणि मतमोजणीचा एक दिवस असे एकूण ९ दिवस दारूबंदी लागू असेल.
११ एप्रिल ते २१ मे दरम्यान सात टप्प्यात मतदान होणार असल्याने या दोन महिन्यांमध्ये देशातील सर्वच शहरांमध्ये मतदानाच्या तारखांनुसार ड्राय डे पाळण्यात येईल. तसेच २३ मे रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी देशभरात ड्राय डे पाळला जाईल. याशिवाय मे आणि एप्रिल महिन्यामध्ये रामनवमी, आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्राय डे आणि बुद्ध पौर्णिमा हे दिवसही ड्राय डे म्हणून पाळले जातील. सर्व मोठ्या शहरांमध्ये जवळजवळ २ ते १० ड्राय डे एप्रिल आणि मे महिन्यात असतील.
 
 
ड्राय डे चे वेळापत्रक
14 एप्रिल, रविवार - संपूर्ण दिवस (रामनवमी/आंबेडकर जयंती)
17 एप्रिल, बुधवार - संपूर्ण दिवस (महावीर जयंती)
19 एप्रिल, शुक्रवार - संपूर्ण दिवस (गुड फ्राय डे)
27 एप्रिल, शनिवार - संध्याकाळी 6 वाजल्यापासून (अंदाजे)
28 एप्रिल, रविवार - संपूर्ण दिवस
29 एप्रिल, सोमवार - संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (मतदानाचा दिवस) (अंदाजे)
1 मे, बुधवार - संपूर्ण दिवस (महाराष्ट्र दिन)
18 मे, शनिवार - संपूर्ण दिवस (बुद्ध पौर्णिमा)
23 मे, गुरुवार - संपूर्ण दिवस (मतमोजणीचा दिवस)