फिरोज गांधींना नाकारण्याचा कॉंग्रेसी रोग!
   दिनांक :26-Mar-2019
तिसरा डोळा  
 
 चारुदत्त कहू 
 
राष्ट्रपुरुषांच्या, महापुरुषांच्या, संत-महंतांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजर्‍या करण्याची प्रथा भारतातच नव्हे तर विदेशांमध्येही पूर्वापार चालत आली आहे. या मंडळींचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे आणि नव्या पिढीला त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करण्यास प्रवृत्त करणे, हा महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आयोजित करण्यामागचा मूळ उद्देश असतो. बहुतांशी तो सफलही होतो. त्यासाठीच महापुरुष, संत-महंत ज्या गावी जन्म घेतात अथवा जिथे त्यांचा मृत्यू होतो, त्या पवित्रस्थळी त्यांच्या समाध्या उभारल्या जातात आणि त्यांच्या दर्शनासाठी दूरदुरून लोक श्रद्धेपोटी दर्शनाला येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. केशव बळिराम हेडगेवार, योगी अरिंवद, स्वामी विवेकानंद... अशी कितीतरी नावे उद्धृत करता येतील.
 

 
 
बहुतांशी लोकांना आपले गुरू, महापुरुष, संत-महंत यांच्याशी असलेले त्यांचे नाते, त्यांची श्रद्धा, त्यांना आलेले अनुभव, प्रचीती याबाबत बोलावेसे वाटते, सांगावेसे वाटते, क्वचित त्याबाबत लिहून लोकांच्या मनातील शंका दूर कराव्याशा वाटतात. पण, असेही अनेक महाभाग असतात की अशा व्यक्ती आपल्या परिवारातील असूनही त्यांना त्यांच्याशी असलेले नाते लपवावेसे वाटते.
 
भारत स्वतंत्र झाल्यापासून देशात गांंधी आणि नेहरू घराण्याची सर्वाधिक सत्ता राहिलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, नरिंसह राव, चंद्रशेखर, मोरारजी देसाई, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चरणिंसह या कॉंग्रेसेतर पंतप्रधानांचा कार्यकाळ वजा जाता देशात बहुतांश वर्षे नेहरू, गांधी परिवाराचे आणि कॉंग्रेसचेच राज्य चालत आलेले आहे. गांधी परिवारातील मंडळी आणि कॉंग्रेस पक्षाचे लोक आजही जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावावर मते मागत फिरताना दिसतात. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या राजकीय हत्या झाल्यामुळे, त्याचा फायदा कॉंग्रेसला आजवर मिळतही आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा ही कॉंग्रेसची नवी पिढी आज राजकारणात उतरली असून, बहुतांश जुन्याच मुद्यांवर स्वार होऊन देशातील सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंदिरा गांधींची लोकप्रियता प्रचंड होती. त्यांच्याच लोकप्रियतेचा फायदा घेत कॉंग्रेसी मंडळी प्रियांका इंदिराजींसारखीच दिसते, असे सांगत मतदारांची सहानुभूती घेण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच जेव्हापासून प्रियांका वढेरा सक्रिय राजकारणात आल्या आहेत, त्यांचे नाव इंदिरा गांधींसोबत जोडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे.
 
एकीकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींशी जोडलेले नाते फायद्याचे ठरत असल्याने कॉंग्रेसचे समर्थक त्या नावाचा पुरेपूर फायदा घेत असताना, त्यांचे पती फिरोज गांधी यांच्या नावाचा उल्लेख करणेही ही मंडळी टाळत आहेत. गांधी परिवाराला मिळालेल्या गांधी या आडनावासाठी दस्तुरखुद्द फिरोज गांधीच कारणीभूत ठरले आहेत. त्यांचे आडनाव गँडी होते. ते नंतर महात्मा गांधींच्या आडनावाशी साधर्म्य साधण्यासाठी गांधी असे बदलविण्यात आले. राहुल, प्रियांका आणि सोनियांना गांधी आडनावाचे वावडे नाही, पण फिरोज यांच्या नावाचे वावडे का आहे, हे कळायला मार्ग नाही.
 
प्रयागराजमधील आबकारी चौकाजवळील मंफोर्जगंज येथे पारशी समुदायाचे कब्रस्तान आहे. तेथे इंदिरा गांधींचे पती, सोनिया गांधींचे सासरे व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका वढेरा यांचे आजोबा फिरोज जहांगीर गांधी यांची मजार (कबर) आहे. इंदिरा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी जेवढ्या व्यापक प्रमाणात साजरी केली जाते, त्या प्रमाणात फिरोज गांधींची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. वर्षातून एकदाही गांधी परिवारातील सदस्य फिरोज यांच्या समाधीच्या दर्शनाला येत नाहीत. फिरोज गांधी पारशी होते आणि पारशांची स्वतःची व्होट बँक नाही, त्यामुळे त्यांची मजार गांधी परिवाराकडून दुर्लक्षित राहते, असा एक मतप्रवाह आहे. इंदिरा गांधी आणि फिरोज यांनी लंडनमधील एका मशिदीत निकाह केला आणि त्यानंतर इंदिरा गांधींना मुसलमान धर्म स्वीकारावा लागला.
 
एकीकडे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांसाठी कोट्यवधींच्या जाहिराती देणारा गांधी परिवार, फिरोज गांधी यांच्या मजारीवर काहीच खर्च का करीत नाही, हे न उलगडलेले कोडेच आहे. इंदिरा गांधींची समाधी दिल्लीत 45 एकर जागेत बांधली गेली आहे. पण, त्याच वेळेस त्यांचे पती फिरोज यांची प्रयागराज येथील मजार दुर्लक्षित असून, तेथे कायम कुत्रे-बकर्‍यांचे वास्तव्य असते. देशाच्या सत्ताधारी परिवारातील सदस्याच्या मजारीकडे होणारे दुर्लक्ष काय दर्शविते?
 
प्रियांका गांधी यापूर्वी लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत रायबरेली आणि अमेठीत प्रचारासाठी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रचार अथवा राजकारण नवे नाही. यावेळी वेगळे काही झाले असेल, तर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर अधिकृतपणे पूर्व उत्तर प्रदेशातील 40 मतदारसंघांची जबाबदारी सोपवून त्यांना पक्षाच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. आपला भाऊ राहुल याला विजयी करण्यासाठी त्यांनी निवडणूक प्रचार अभियानाचा प्रारंभ प्रयागराज येथील झोपलेल्या हनुमानाच्या दर्शनाने केला. त्या संगमावरही गेल्या आणि जलमार्गाने वाराणशीला रवाना झाल्या. हिंदूंच्या मंदिरांचे दर्शन आणि गंगेतून प्रवास करून, त्यांनी हिंदू मतांचा जोगवा मागण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, प्रयागराजमध्ये हाकेच्या अंतरावर असलेल्या आजोबांच्या मजारीवर पुष्पचक्र अर्पण करण्याची वा मजारीवर चादर चढवण्याची साधी तसदी त्यांनी घेतली नाही.
 
फिरोज गांधींची मजार ज्या कब्रस्थानात आहे, तेथून आनंदभवन केवळ 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पण तरीदेखील गांधी परिवारातील सदस्य या मजारीकडे जाण्यास कानाडोळा करतात. राजकीय पंडितांच्या मते राहुल, प्रियांका अथवा सोनियांनी वारंवार त्या मजारीला भेट दिली, तर कॉंग्रेसचे हिंदू हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचा संदेश जाण्याची भीती त्यांना वाटत आहे. कारण यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हिंदू मतांकडे दुर्लक्ष केल्याने आपला मोठा पराभव झाल्याची बाब कॉंग्रेस श्रेष्ठींच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळेच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून राहुल गांधींनी देशातील निरनिराळ्या मंदिरांना भेटी देऊन तेथील देवी-देवतांचे आशीर्वाद घेण्याचा सपाटा लावला आहे. आपण स्वतः जनेवूधारी असल्याचेही सिद्ध करण्याच्या मागे राहुल गांधी लागले आहेत. पण, फिरोजचा नातू आणि ऍन्टोनिया मायनोचा (सोनियांचा) मुलगा राहुल स्वतःला जनेवूधारी आणि शिवभक्त कसा सिद्ध करू शकतो, हे न उलगडलेले कोडे आहे.
 
फिरोज गांधी यांची कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळख होती. तत्कालीन पंतप्रधान आणि सासरे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांना जीप घोटाळा प्रकरणात फिरोज गांधी यांच्यामुळेच राजीनामा द्यावा लागला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा पहिला घोटाळा होता. फिरोज यांच्या वडिलांचे नाव जहांगीर, तर आईचे नाव रतिमाई होते. जहांगीर धर्माने मुसलमान आणि रतिमार्ई पारशी होती. रायबरेलीचे खासदार असलेले फिरोज यांची संघर्षशील नेता म्हणूनही ओळख होती. त्यांचा विवाह 1942 मध्ये इंदिरा गांधींशी मुस्लिम रीतिरिवाजानुसार पार पडला. इंदिरा गांधींचे दुसरे पुत्र संजय गांधी यांचा तर फिरोज गांधी यांच्या नावालाच विरोध होता. आपल्याच सासर्‍यांच्या मंत्रिमंडळातील सदस्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करून तो सिद्ध करण्यासाठी केलेली उठाठेव तर फिरोज गांधींच्या अंगलट आली नसावी? अखेर फिरोज गांधींना नाकारण्याचा रोग कॉंग्रेसींना का झाला? हा शोधाचाच मुद्दा आहे...
9922946774