विजयाची खात्री नसल्याने रामटेक मधून वासनिकांची माघार?
   दिनांक :26-Mar-2019
 
 विश्वंभर वाघमारे 
 ९४२२२१०५०६
 
 
कॉंग्रेस पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस असलेले मुकुल वासनिक यांनी रामटेक या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघातून यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय का घेतला? त्यांनी घेतलेले या माघारी बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यावर बरेच तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.
 

 
 
 
वस्तुतः लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रामटेक मधून मुकुल वासनिकांचे नाव चर्चेत होते. उमेदवारी त्यांनाच मिळणार याबद्दल दुमत नव्हते. केवळ निवडणूक लढवावी किं वा नाही याचा निर्णय कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर सोडला होता.
मुकुल वासनिकांच्या अंतस्थ गोटात यावर बराच खल झाला, अशी माहिती समोर आली आहे. तिकीट खिशात असले तरी रामटेक मधून विजय मिळेलच याची खात्री देता येत नाही. यावर त्यांच्या विश्वासू मित्रांचे एकमत झाले. त्यामुळे पराभवापेक्षा यावेळी थांबलेेले बरे असा निर्णय झाला.
१९८४ ते २००४ या वीस वर्षांत मुकुल वासनिक बुलढाणा या राखीव मतदार संघातून लोकसभेच्या सात निवडणुका लढलेत. त्यातल्या तीन निवडणुका जिंकून ते संसदेत पोहचले. प्रारंभी केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला.
 
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघांची पुर्नरचना झाली. बुलढाणा मतदार संघ खुला झाला. त्याचवेळी विदर्भातील रामटेक हा मतदार संघ राखीव झाला. वासनिकांनी २००९ची निवडणूक रामटेक मधून जिंकली. मात्र २०१४ च्या निवडणुकीत ते मोदी लाटेत पराभुत झाले.
२०१९ ची लोकसभा निवडणूक ते रामटेक मधून लढतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी नकार दिल्याने तेथे पक्षाने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे.
आतापावेतो नऊ वेळा लोकसभा निवडणुका लढणार्‍या मुकुल वासनिकांनी दहाव्या निवडणुकीतून माघार का घेतली असावी त्या मागच्या कारणांचा शोध घेतला असता सांगितले जाते की, मुकुल वासनिकांचा रामटेक मधील संपर्क तुटला होता. कोणताही उमेदवार विजयी होवो की पराभूत, त्यांचा संपर्क मतदारसंघात असावा लागतो. त्यात ते कमी पडले. पक्षात राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक कामामुळे ते अन्यत्र व्यस्त राहिले. मोदी लाट यावेळी दिसत नसली तरी ती सुप्त प्रमाणात आहे. तसेच गेल्या दहा वर्षात नवीन मतदारांचा मोठ्या प्रमाणावर भरणा झाला आहे आणि त्यांचा कौल कॉंग्रेसला अनुकूल नाही. नागपूर व पूर्व विदर्भातल्या मतदार संघावर नितीन गडकरी यांचे पूर्ण वर्चस्व आहे. रामटेक हा मतदार संघ नागपूरलाच लागून आहे. या कारणामुळे विजयाची खात्री नाही. निवडणूक लढवून पराभूत होण्यापेक्षा पक्षाच्या सरचिटणीस पदावर पूर्ण वेळ काम करणे तसेच काही राज्यांचा प्रभार सांभाळणे, या कामांना प्राधान्य द्यावे असाही विचार करण्यात आला अशी माहिती समजली आहे.
 
आयुष्यभर पक्षसंघटनेला वाहून घेतलेल्या या अनुभवी पदाधिकार्‍याचा आता वयोमानानेही जेष्ठांमध्ये समावेश झाला आहे. कदाचित पुढच्या काळात राज्यसभेसाठी वासनिकांचा विचार कॉंग्रेस पक्षात होऊ शकतो, असे सकारात्मक िंचतन त्यांचे हितिंचतक करीत असतील तर त्यांचे काय चुकलेे?