इस्त्रायलवर पुन्हा मिसाईल हल्ला
   दिनांक :26-Mar-2019
- पाच जखमी
मिशमेरेत,
इस्त्रायलच्या तेल अव्हीव शहरापासून उत्तरेकडील नागरी वस्तीवर सोमवारी पुन्हा एक मिसाईल हल्ला करण्यात आला. त्यात पाच इस्त्रायली नागरीक जखमी झाले आहेत. हे मिसाईल गाझा पट्टीतून डागण्यात आल्याची माहिती इस्त्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने दिली आहे. हे मिसाईल ज्या घरावर पडले तेथे नंतर मोठी आगही लागली. त्यात जखमी झालेल्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहे त्यातील एक जण गंभीर आहे असे संबंधीत सूत्रांनी सांगितले. रॉकेट हल्ला झालेले ठिकाण गाझापट्टीपासून ८० किमी अंतरावर आहे.
 

 
या प्रकाराला इस्त्रायलकडूनही लवकरच प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्‍यता असल्याने पुन्हा त्या भागात तणावाची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतानयाहू हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तसेच देशात येत्या 9 एप्रिलला सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल इस्त्रायलने घेतली आहे.