अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी फुलवली स्ट्रॉबेरी
   दिनांक :27-Mar-2019
यशोगाथा 
 
हेमंत निखाडे
दरदिवशी वेगाने विकसीत होणार्‍या तंत्रज्ञानामुळे आज सर्वांगीण विकासाच्या अपेक्षा नव्याने साकार होत आहे. प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्राची होत असलेली भरभराट क्रांतीकारक ठरत असली तरी कृषी क्षेत्राला मात्र अजूनही या तंत्रज्ञानाचा पाहिजे तसा उपयोग होत नसल्याची खंत आहे. कृषीप्रधान देशात शेतीचे स्वरूप पारंपारीक व निसर्गाच्या भरवश्यावर आहे. परिणामी निसर्गाच्या लहरीपणामुळे नापीकी, कर्जबाजारी आणि पर्यायाने शेतकरी आत्महत्या असे दुष्टचक्र शासन, प्रशासन व सामजासाठी चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीबाबत एक उदासिन ह्ष्टीकोण आहे. येथील तरूण शेती सोडून नोकरीच्या आशेने शहरात स्थलांतर होत आहे. या ह्ष्टीकोणाला आता छेद दिला तो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी. तंत्रज्ञानाची जादू आणि किमया काय असते याची जाणीव हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना करून देतानांचा कृषीक्षेत्राला एक नवह्ष्टीकोन दिला आहे.
 
 
 
उन्नत भारत अभियानांतर्गत हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालय अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांवर यशस्वी काम करीत आहे. तंत्रज्ञानातून वाळवंटातही नंदनवन साकारल्या जावू शकते याची जाणीव शेतकर्‍यांना करून देण्याकरीता बडनेरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या दाभा गावालगत स्ट्रॉबेरी शेती प्रकल्प महााविद्यालयाने साकारला. हव्याप्र मंडळाचे उपाध्यक्ष व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. श्रीकांत चेंडके यांचा पुढाकार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रॉबेरी प्रकल्प डिसेंबर-२०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता. प्रकल्प प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेश विभाग प्रमुख डॉ. उज्वला क्षीरसागर व प्रा. आशिष खराते यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन महिन्यात स्ट्रॉबेरी प्रकल्प साकारला.
 
विशेष म्हणजे, स्ट्रॉबेरी पिक ठराविक क्षेत्र आणि वातावरणामध्येच घेतले जाते. इतर कुठल्याही भागात असे नगदी पिक घेता येत नसल्याचा ठाम विश्र्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुठलेही पिक घेता येते याची सिद्धता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी करून दिली. त्याकरीता विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या शेतामध्ये ग्रिन हाऊन व स्ट्रॉबेरी पीकासाठी आवश्यक वातावरण निर्मीती आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत जानेवारी ते मार्च अवघ्या अडीच महिन्यात तब्बल 62 किलो असे विक्रमी स्ट्रॉबेरी पीक घेतले. अशा प्रकारचा प्रकल्प संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरावर प्रथम ठरला असून या यशस्वी प्रकल्पाची दखल शासन, प्रशासन व देशातील ख्यातनाम शास्त्रज्ञांनी सुद्धा घेतली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला शेतकर्‍यांना व तरूणांना स्वयंरोगजाराची दिशा देण्याकरीता हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालाचा प्रकल्प क्रांतीकारी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. या प्रकल्पाला शेती मालक नारायणराव वैद्य, वीज सेवा देणारे हॉटेल व्यवसायीक नामदेव टेंभुर्णे, पाणी सुविधा देणारे दालमिल संचालक पंकज लढ्ढा, खतांचा पुरवठा करणारे रवी वाठ यांचे सहकार्य लाभले. प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी शुभम किन्हीकर, ऋषीकेश सपकाळ, विशाल कुकडे, उदीत मिश्रा, प्रियंता चोरडे, प्रगती उमेकर, दिक्षीता बोरेकर, दिक्षा राऊत, रमेश गजबार, प्रतिक गावंडे, शाम नाले, शहीद शेख, मो. साद हुसैन या विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले.
 
 
 
यावेळी उन्नत भारत अभियानाच्या प्रादेशिक समन्वयक अर्चना बारब्दे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
  
प्रकल्पाला उद्योगाचे स्वरूप
हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने उन्नत भारत अभियानातर्ंगत यशस्वी राबविलेला स्ट्रॉबेरी शेती प्रकल्पाला आता स्टार्टअप मिळाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वीरित्या साकारलेली स्ट्रॉबेरी शेती प्रकल्पाची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून शासनाने आता या प्रकल्पाला उद्योग म्हणून मान्यता दिली आहे. या यशामुळे विद्यार्थांना स्वयंरोजगाराकरीता एक सक्षम व्यासपीठ मिळाले आहे.
 
शिक्षणाची व्याख्या बदलली : कुलगुरू
वर्तमान शिक्षण पद्धतीचा विचार करता ठराविक अभ्यासक्रमातून ठरविक क्षेत्रात करिअर करणे एवढाच मार्ग विद्यार्थ्यांसमोर शिल्लक राहत होता. त्याच बरोबर आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुर्ण करून आपली जबाबदारी पार पाडणे असाही ह्ष्टीकोण शिक्षकांचा असतो. एकुणच या पारंपारीक ह्ष्टीकोणामुळे शिक्षणाची नेमकी गरज कशासाठी? असाही प्रश्र्न चिंतनाचा विषय ठरला आहे. आता मात्र हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या स्त्युत आणि प्रेरणादायी स्ट्रॉबेरी शेती प्रकल्पातून शिक्षण क्षेत्राला एक नवी ह्ष्टी मिळाली आहे. या यशस्वी प्रकल्पाने शिक्षणाची व्याख्याच पुर्णपणे बदललेली आहे, असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी स्ट्रॉबेरी शेती प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.