अळींबीची लागवड
   दिनांक :27-Mar-2019
अळींबी ही बुरशी वर्गातील विशिष्ट प्रकारच्या बुरशीचं फळ आहे. निसर्गात विशेषत: पावसाळ्यात अशी फळं पहावयास मिळतात. त्यास अळींबी, भूछत्र किंवा मशरूम असं म्हणतात. निसर्गात अळींबीचे विषारी आणि बिनविषारी तसेच विविध आकार, रंगानुसार असंख्य प्रकार आहेत. जगभरात अळींबीचे खाण्यास उपयुक्त असे २००० प्रकार असून त्यापैकी भारतात २०० प्रकारांची नोंद करण्यात आली आहे. वेगवेगळ्या देशात मिळून १० ते १२ प्रकारांच्या अळींबीची व्यावसायिक स्तरावर लागवड करण्यात येते. त्यापैकी भारतात तीन प्रकारच्या अळींबीची लागवड होते.
  
 
अळींबीच्या उपयुक्त जाती : १) बटण अळींबी, युरोपियन अळींबी (ॲग्रेरीकस बायस्पारेस), २) धिंगरी, ओयस्टर अळींबी (प्लुरोटस स्पेसीस), ३) भाताच्या पेंड्यावरील अळींबी (व्होल्वरीएला स्पेसीस) इत्यादी.
 
अळींबीची उपयुक्तता : अळींबीमध्ये साधारणपणे ३४ ते ४० टक्क्यांपर्यंत प्रथिनं असतात. तसंच यातून खनिजद्रव्यं आणि जिवनसत्त्वं विपुल प्रमाणात मिळतात. यात प्रामुख्याने ब, क आणि ड ही जीवनसत्त्वं असतात. त्यामुळे बेरीबेरी, मुडदूस आदी रोगांवर अळींबी गुणकारी ठरते. विशेष म्हणजे यात पिष्टमय पदार्थांचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मधुमेहासारख्या रूग्णांसाठी हे उत्कृष्ट अन्न आहे. अळींबीमध्ये फोलिक ॲसिड, पेन्टोथेनिक ॲसिड अशी उपयुक्त आम्लंही आढळतात. अळींबीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भरपूर मागणी असते. तसंच निर्यातीसाठीही मोठा वाव असतो.
 
अळींबीची प्रतवारी : लहान-मोठ्या आकारानुसार अळींबीची प्रतवारी करावी लागते. त्यातल्या त्यात उमललेल्या अळींबीला बाजारात मागणी नसल्यामुळे छत्रीप्रमाणे उमलण्यापूर्वीच बटण अळींबी काढावी लागते. त्याच प्रमाणे कॅिंनगसाठी लहान आकाराची अळींबी काढावी लागते.
 
अळींबीवर प्रक्रिया : ताजी अळींबी रेफ्रीजरेटरमध्ये चार-पाच दिवस टिकते. त्यादृष्टीने अळींबीची योग्य प्रकारे साठवणूक करावी.विक्रीस पाठवताना ताजी अळींबी भोकं असलेल्या पॉलीथीनच्या पिशव्यांमधून विक्रीस पाठवली जाते. धिंगरी अळींबी दिर्घकाळ टिकवण्यासाठी वाळवली जाते. कडक उन्हामध्ये ठेवून किंवा ४५ संश से. तापमानास ओव्हनमध्ये ठेवून पूर्णपणे वाळवली जाते. अशी अिंळबी पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये सील करून ठेवल्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकते. एक किलो ओल्या अळींबीपासून १०० ग्रॅम वाळलेली अळींबी मिळते. असं असलं तरी बटण अळींबी वाळवता येत नाही. सायट्रीक आम्ल, मिठाचं द्रावण यामध्ये ही अळींबी ठेवून पोटॅशियम मेटाबायसल्फेट सारखी जंतुनाशके वापरून हवाबंद डब्यात भरून प्रक्रिया करता येते. अशा प्रकारे केलेली अळींबी दीर्घकाळ टिकत असल्याने परदेशी बाजारात पाठवता येणं शक्य होतं. थोडक्यात या अळींबीच्या निर्यातीस उत्तम वाव असतो.
 
विक्री : अळींबीस मुख्यत्वे पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमधून जास्त मागणी असते. विशेषत: पंचतारांकित हॉटेल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्समधून अळींबीला मोठ्या प्रमाणावर मागणी प्राप्त होत असल्याचं पहायला मिळतं.