लकी बांबू
   दिनांक :27-Mar-2019
 घ्या काळजी
आजकाल वास्तुशास्त्राला बरंच महत्त्व प्राप्त झालं आहे. या शास्त्रानुसार विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. त्यात लकी बांबूच्या वापराचाही समावेश होतो. याला आशियाई संस्कृतीत चार हजार वर्षांपासून उज्ज्वल भविष्याचं प्रतीक समजलं जातं. चिनी भाषेत याला फू ग्वे झू म्हणजे संपत्ती-सत्ता किंवा मानमरातब बांबू म्हणतात. सध्या घर आणि कार्यालयाची सजावट करण्यासाठी विविध प्रकारची शोभेची फुलझाडे उपलब्ध आहेत. त्यात लकी बांबूला पसंती मिळत आहे. घराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या लकी बांबूला उन्नती आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. ते घर किंवा कार्यालयात वातावरण निर्मिती करते. त्यामुळे काम करताना येणारा तणाव दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या बांबूचे रोपटे ड्रेसीना जातीतील असून त्याचं शास्त्रीय नाव ड्रेसीना सेंडेरियाना आहे. याची बर्‍याच प्रमाणात बँकॉक येथून आयात केली जाते. तैवान, मलेशिया, थायलंड येथूनही लकी बांबूची जगभर निर्यात केली जाते.
  
लकी बांबूूला मातीचा उपयोग न करता केवळ पाण्यावर जगवता येतं. पारदर्शी काचेच्या भांड्यात ठेवलेलं आणि बांबूच्या बारीक काड्या एकत्र बांधून बंडलच्या स्वरूपात असलेलं लकी बाबूंचं रोपटं विविध आकारात उपलब्ध आहे. या रोपट्याला नंतर छानशी पालवी फुटते. त्रिकोणी, पिरॅमिड, ड्रेगनच्या आकारात लकी बांबूची रोपं उपलब्ध आहेत. कधी हा बांबू विचित्र पद्धतीने म्हणजे मुरडलेला, बाक दिलेला, स्प्रिंगप्रमाणे इतकंच नव्हे तर जाळीप्रमाणे विणलेला दिसतो. रोपट्याचा आकार आणि त्याचे आयुष्य यावरून त्याची किंमत ठरते. बांबूचं मूळ म्हणजे त्याच्या गाठीवरून रोपटे किती जुनं, हे ठरवता येतं. केवळ पाण्यावर वाढत असलं तरी लकी बांबूची खास काळजी घ्यावी. दर आठवड्याला ताजं पाणी द्यावं. नळाचं क्लोरिनेटेड पाणी रोपट्याला बाधक असतं. पर्याय नसल्यास हेच क्लोरिनेटेड पाणी एक दिवस उघडे ठेवून रोपट्याला द्यावं. लकी बांबूच्या पानात अल्प प्रमाणात विषारी द्रव्य असते. याच्या रोपांना वेगळा आकार दिल्यास अधिक किंमत मिळते. परंतु यांना विशिष्ट आकार देण्याचं काम वेळखाऊ, खर्चिक असतं. मात्र, तंत्र आत्मसात केल्यास या व्यवसायातून लाखो रूपये कमवता येतात.