सात दशकांपासून कॉंग्रेसकडून गरिबांची थट्‌टाच!
   दिनांक :27-Mar-2019
 
 
लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2014 साली होती, त्यापेक्षा जास्त लोकप्रियता आज आहे, राफेलचा मुद्दा सपशेल अपयशी ठरला, मोदींविरुद्ध आता बोलायचे तरी काय, असा प्रश्न पडलेल्या कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या आजीप्रमाणेच आता गरिबी हटावचा नारा दिला आहे. आजी इंदिरा गांधी यासुद्धा पंतप्रधान होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत टिकाव लागणार नाही, असे लक्षात येताच त्यांनीही गरिबी हटावचा नारा दिला होता. अनेकांची वतनं रद्द केली होती. श्रीमंतांवर जादा कर लावला होता. गरिबांना वाटलं की, आता आपली गरिबी खरोखरच हटणार, आपले जीवन सुसह्य होणार. पण, त्यांची गरिबी दूर न होता इंदिरा गांधींना सत्ता मिळाली आणि गरीब आणखी गरीब झाले.
 

 
 
नुसतेच गरीब झाले नाहीत, तर दुर्लक्षितही झाले. त्यांची शुद्ध फसवणूक करण्यात आली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती करायला त्यांचा नातू निघाला आहे. नातवाने परवा दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि कॉंग्रेसची सत्ता आल्यास देशभरातल्या वीस टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले. देश स्वतंत्र होऊन सात दशकं उलटली आहेत. यापैकी पाच दशकांपेक्षा जास्त काळ या देशात कॉंग्रेसची सत्ता होती. राहुल गांधी यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी हे पंतप्रधान होते. कॉंग्रेसचे नरिंसह राव पाच वर्षे आणि डॉ. मनमोहनिंसग (डमी) दहा वर्षे पंतप्रधान होते. मनमोहनिंसग हे नावालाच पंतप्रधान होते. सगळे निर्णय तर राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधीच घेत होत्या. सगळे निर्णय रिमोट कंट्रोलने होत होते, हे देशाने अनुभवले आहे. मनमोहनिंसग हे डमी पंतप्रधान नसते, तर त्यांच्या सरकारने काढलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी सार्वजनिक ठिकाणी फाडला नसता. जवळपास पन्नास वर्षे कॉंग्रेसची सत्ता असताना या देशातल्या गरिबांचे दारिद्र्य दूर का केले नाही, याचे उत्तर आधी राहुल गांधी यांनी दिले पाहिजे.
 
त्यासाठी देशवासीयांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि नंतरच गरिबी दूर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून कॉंग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळावे एवढ्याही जागा कॉंग्रेसला मिळाल्या नव्हत्या. देशातल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षावर अशी नामुष्की ओढवली होती. त्या पक्षाचे नेतृत्व आज राहुल गांधी करताहेत. राहुल गांधी यांनी देशातल्या एकूणच परिस्थितीचा कुठलाही अभ्यास केलेला नाही. कोणत्या राज्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय काय स्थिती आहे, याचे आकलन करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. सोबत राहणारी चौकडी जे काही सांगेल ते ऐकून पोपटपंची करण्यातच ते वेळ वाया घालवत आहेत. ज्यांनी सात दशकं जनतेला केवळ मूर्ख बनविले ते आणखी मूर्ख बनवू पाहात आहेत. जनता आता आधीसारखी राहिलेली नाही. आपले हित कशात आहे, कोण खोटी आश्वासनं देत आहे, कोण भूलथापा देत आहे, याची जाण जनतेला आहे. त्यामुळे आपण वर्षाला 72 हजार रुपये देऊ, असे सांगितल्याने जनता आपल्याच पक्षाला मतं देईल, या भ्रमात राहुल गांधी यांनी राहू नये.
 
याउलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत देशातील गरिबांसाठी अनेक योजना लागू केल्या. जनधन खाते सुरू केल्याने कोट्यवधी गरिबांची बँक खाती उघडण्यात आली. ज्यांनी कधी बँकेचे तोंडही पाहिले नव्हते, अशा कोट्यवधी गरीब बांधवांची बँक खाती उघडली गेल्याने त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुरक्षितता आली आहे. सात कोटी महिलांना गॅसचे मोफत कनेक्शन देऊन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारने आपल्या आयाबहिणींना मोठाच दिलासा दिला आहे. लाकडं आणि गोवर्‍यांचा धूर डोळ्यांत जाऊन ग्रामीण भागातील महिलांचे डोळे खराब होत होते. ही बाब लक्षात घेत मोदींनी मोफत गॅस जोडणी देणारी उज्ज्वला योजना प्रारंभ केली आणि ती यशस्वी रीत्या अंमलातही आणली. पंतप्रधान किसान निधी योजना सुरू केली.
 
भाजपाशासित राज्यांनी ती लागू केली. पण, कॉंग्रेसशासित राज्यांनी ती लागूच केली नाही. गरिबांना लाभ मिळवून देणे हे कॉंग्रेसच्या डीएनएतच नाही. त्यामुळे कॉंग्रेसने गरिबी हटावच्या कितीही बाता मारल्या, तरी त्यावर आता कुणी विश्वास ठेवणार नाही. देशातल्या जनतेला जेवढे मूर्ख बनवायचे होते, ते कॉंग्रेसने गेल्या सात दशकांत बनविले आहे. आता परिस्थिती बदलली आहे. लोक हुशार झाले आहेत. ज्यांनी केवळ घराणेशाही केली, त्यांच्यावर लोक आता विश्वास ठेवणार नाहीत.
 
मध्यप्रदेश आणि राजस्थानात कॉंग्रेसची सत्ता आली ती कॉंग्रेसच्या विजयामुळे नव्हे, तर भाजपाच्या पराभवामुळे, हे कॉंग्रेसने लक्षात घ्यायला हवे. अतिशय काठावरचे बहुमत कॉंग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने हुरळून जाण्याचे कारण नाही. ज्यांचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना आम्ही सत्तेत आल्यास त्यांचे उत्पन्न 12 हजार कसे होईल, हे बघू. जी रक्कम कमी पडत असेल ती आम्ही देऊ. ही शुद्ध धूळफेक आहे. कॉंग्रेसने गरिबी कधी हटवलीच नाही. उलट, गरिबांना उद्‌ध्वस्त करण्याचे पाप कॉंग्रेसने केले आहे आणि त्याच पापाची भरपाई कॉंग्रेसला आता करावी लागत आहे. कॉंग्रेसने या देशातील मुस्लिम आणि दलितांना आर्थिकदृष्ट्या मागास ठेवण्याचे पाप केले आहे. मुस्लिम बांधव शिकलेसवरले असते, तर कॉंग्रेसच्या भूलथापांना बळी पडले नसते, हे ओळखूनच कॉंग्रेसच्या धुरीणांनी मुस्लिमांना कायम दारिद्र्यातच ठेवले. पण, आता मुस्लिमही हुशार झाले आहेत. कॉंग्रेसचे राज्यातले माजी मंत्री अनीस अहमद यांनीही कॉंग्रेसला कालपरवाच घरचा अहेर दिला आहे. औरंगाबादमधून अब्दुल सत्तार यांना लोकसभेची उमेदवारी हवी असतानाही दिली नाही. अकोला वगळता राज्यात एकाही मतदारसंघात कॉंग्रेसने मुस्लिम उमेदवाराला उभे केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
 
दलितांच्या बाबतीतही कॉंग्रेस कायम उदासीन राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मतं मागणार्‍या कॉंग्रेसने मुबंईतली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यास टाळाटाळ केली, लंडन येथील घर विकत घेण्यासही टाळाटाळ केली. पण, मोदींच्या सरकारने हे काम सत्तेत येताच केले. बाबासाहेबांवर खरी श्रद्धा जर कुणाची आहे तर ती मोदी सरकारची आहे. कॉंग्रेसने तर आंबेडकरी अनुयायांच्या डोळ्यांत धूळफेकच केली. सातत्याने गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या आणि राजधानी दिल्लीतील वातानुकूलित कक्षात बसून निर्णय घेणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांना गरिबी काय असते, हे तरी माहिती आहे काय? गरिबांचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या काय, त्यांना काय हवे, काय नको, याची जाण तरी राहुल गांधी यांना आहे काय? निवडणुकीवर डोळा ठेवून गरिबांची थट्‌टा करण्याचे पाप कॉंग्रेस करीत आहे. या पापाची फळं कॉंग्रेसला इथेच भोगावी लागणार आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासूनच कॉंग्रेसने देशातल्या गरिबांची फसवणूक अन्‌ छळवणूक केली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या कॉंग्रेसने आणखी फसवणूक करण्याच्या भानगडीत न पडलेलेच बरे!