'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :27-Mar-2019
मुंबई:
 एका मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबातील लग्नसोहळा आणि त्यावेळी घडणारी गंमत जंमत दाखवणाऱ्या डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
 
लग्न म्हटल्यावर त्यासोबत तयारी, घरातील लगीन घाई, नातेवाईकांमधील रूसवे-फुगवे या सगळ्या गोष्टी आल्याच म्हणून समजाव्यात. त्यात आता भर पडलीय ती प्री-वेडिंग फोटोशूट आणि व्हिडिओची... या सगळ्या बदलांशी जुळवून घेताना कुटुंबाची उडणारी धांदल, सगळं कुटुंब एकत्र आल्यावर घरात उडणारा गोंधळ हा सगळा 'सोहळा' ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो आहे.
मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही एक नवी जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले असून हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.