महाराष्ट्रात 48 पैकी 37 जागा युतीला
   दिनांक :28-Mar-2019
 
देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील मतदारांचा मूड आणि कौल यात केंद्रातील सत्ता स्थापनेत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघ प्रत्येक पक्षासाठी महत्वाचे आहेत. एबीपी न्यूज-नेल्सनने हा निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त केला आहे.
 

 
 
 
विदर्भातही अन्य भागांसारखीच स्थिती आहे. इथे 10 पैकी नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाच्या विजयाची शक्यता आहे. विदर्भात भाजपाला सहा तर शिवसेनेला तीन जागा मिळू शकतात. एकूण राज्यातील 48 मतदारसंघांपैकी 37 ठिकाणी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे.
मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागांपैकी पाच शिवसेना-भाजपाला तर तीन जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळू शकतात. हिंगोली, नांदेडमध्ये कॉंग्रेस तर परभणीत राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकू शकतो. जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर येथे शिवसेना-भाजपा युतीचा विजय होण्याचा अंदाज आहे.
 
मुंबईसह कोकणात लोकसभेच्या एकूण 12 जागा असून भाजपा- शिवसेना आघाडीला सर्वाधिक दहा तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. रायगड आणि भिवंडी या दोनच मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. मुंबईत सर्वच जागा शिवसेना-भाजपा युती जिंकेल असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई-कोकणात शिवसेनेला सात तर भाजपाला तीन जागा मिळू शकतात.
 
पश्र्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 12 जागा आहेत. शिवसेना-भाजपा युतीला आठ, राष्ट्रवादीला तीन आणि स्वाभिमान एका जागेवर जिंकण्याची शक्यता आहे. बारामती, माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असे बोलले जात आहे. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळची लढाई खडतर ठरणार आहे. या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्र्चिम महाराष्ट्रात भाजपाला चार आणि शिवसेनेला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी पाच जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. अपवाद फक्त नंदुरबारच्या जागेचा. इथे कॉंग्रेसला विजय मिळण्याची शक्यता आहे.