ऑनलाईन शॉपिंगचे फॅड...
   दिनांक :28-Mar-2019
- डॉ. रिता विवेक सोनटके
 
 
शॉपिंग हा तसाच बायकांचाच सोस असतो असे अजिबातच नाही. पुरुषांनाही शॉिंपग करायला आवडतं, मात्र चर्चा स्त्रियांचीच अधिक होते. एक मात्र खरं की स्त्रियांना व्यवहार चातुर्य नाही, असा समज आहे. मात्र तोही समज चुकीचाच आहे. कुठलाही व्यवहार करताना स्त्रिया जास्त जागरुक असतात. शॉपिंगच्या बाबत त्या जास्त चिकित्सक असतात. विशेत: कपड्यांची खरेदी करताना त्या जास्तच चौकस असतात. एकतर स्त्रियांचे रंगाचे भान अधिक चांगले असते. पुरुषांचे ठरलेले रंग आहेत. त्या पलिकडे ते जात नाहीत. त्या तुलनेत स्त्रियांच्या कपड्यांचे रंग उठावदार असतातच अन्‌ त्यात विविधताही असते.
शॉपिंग ही मानसिक प्रक्रिया आहे. आपण जे काय देतो आहे त्या किमतीच्या तुलनेत आपल्याला काय मिळणार आहे, याचे भान स्त्रियांना जास्त असते. नैराश्य, ताण टाळायचा असेल किंवा आला असेल तर त्यातून मुक्तीसाठी, रीलॅक्स होण्यासाठी शॉपिंग करा, असे सांगितले जाते.
 
दुकानात जाणे, आपल्याला हवी असलेली वस्तू, तिचा ब्रँड, तिची किंमत, आपल्याला असलेला उपयोग या सार्‍याच गोष्टींची नीट जुळणी असली पाहिजे. ती तुमच्याही नकळत तुमच्या सबकॉंशस माइंडवर होत असते. असे म्हणतात की भूक लागली असली की माणसं जास्त खरेदी करतात... आपल्याला हव्या असलेल्या वस्तूसाठी चांगले दुकान कुठले, आपल्या शहरात त्या कुठे मिळतात, हेही माहिती असले पाहिजे. ज्यांची खरेदीची मानसिकता असते, म्हणजे जे जात्याच चांगले खरेदीदार असतात त्यांना हे माहितीच असते. तुमच्या सहवासात अशी एखादी व्यक्ती नक्कीच असते की तिला हे सारेच माहिती असते. पुलंचा नारायण याच गटातला. त्याला मंगळसुत्रापासून तर खणापर्यंत आणि पत्रिकांपासून वस्त्रांपर्यंत काय नि कोठे घेतले पाहिजे, हे माहिती होते. चांगला सेल्समन त्याच्या वस्तू नीट विकतो. त्याची गरज निर्माण करतो. त्याला शॉपिंग करणार्‍यांची मानसिकता माहिती असते. दुकानात पाऊल टाकताच, ‘‘आओ भाभीजी...’’ असे म्हणत स्वागत करून लगेच पाण्याचा ग्लास समोर आला की मग तो दुकानदार आपला वाटू लागतो. खेरदी करणार्‍याचा आपला एक इगोही असतो. त्यालाही ही मंडळी कुरवाळत असतात. स्त्रिया या सार्‍यांना बळी पडत नाहीत.
 
आता मात्र आधीसारखी शॉपिंगची मजा राहिली नाही. दुकानात जायचे. वस्तू नीट हातळून बघायची. हा रंग नको, हा अकार नको, या या सोयी नाहीत का, असे करायचे नि मग भावठाव करून वस्तू खरेदी करायची. त्यावर आणखी काही मिळते का, हेही बघायचे. तो काय सर्व्हीस देतो, हेही बघता यायचे. आता सारेच कसे ऑनलाईन झाले आहे. अगदी शुभेच्छाही ऑनलाईन अन्‌ निमंत्रणही ऑनलाईन... त्यामुळे खरेदीही ऑनलाईन झाली आहे. त्यासाठी विदेशी कंपन्या आल्यात. या ऑनलाईन खरेदीचे काही फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. जग हेच आपली बाजारपेठ असते, पण त्याला पर्सनल टच नावाचा प्रकार नसतो. वस्तू घरी येतपर्यंत नेमकी आपल्याला हवी तीच आणि तशीच आहे का याची खात्री नसते. चौकशा करता येत नाहीत... ह्युमन नाही वाटत ही खरेदी. आभासी जगाशी संपर्क असतो...
 
दिवाळीच्या दिवसात वृत्तपत्रात बातमी वाचली होती की, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या नावाजलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांना बनावट वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. भारतीय औषध नियंत्रक मंडळाने देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधने कंपन्यांच्या उत्पादनाच्या नावाखाली बनावट व भेसळयुक्त वस्तूंच्या विक्रीसाठी ॲमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस पाठवली आहे. याच नव्हे, तर अनेक विदेशी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. ज्यात प्रमुख कंपन्या म्हणजे कोका कोला, नेस्ले, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, कोलगेट इ. आहेत. बहुतांश लोकांचा कल ऑनलाईन मार्केटिंगकडे वळला आहे, नव्हे, ती एक फॅशनच झालेली आहे. म्हणजे टिव्ही, संगणकापासून तर रोजच्या वापरातल्या अनेक वस्तूंपर्यंत ऑनलाईन खरेदी करता येते.
 
प्रत्यक्ष खरेदी करण्यात जी गंमत व मजा असते, ती ऑनलाईन शॉपिंगमध्ये मिळत नाही. तसेच आपल्या भारतात इतक्या सुप्रसिद्ध कंपन्या असताना आपण का बरे या कंपन्यांचे उत्पादन खरेदी करतो, हा एक यक्षप्रश्नच आहे.
५-६ वर्षांपूर्वी आम्ही सिंगापूर, मलेशिया, थायलंडला गेलो होतो, तेव्हा मला असे आढळून आले की, तेथे भारतीय वस्तूंचे अतिशय आकर्षण आहे. सिंगापूरला ‘लिटिल इंडिया’ नावाचे वेगळेच मार्केट आहे. तेथे फक्त भारतीय वस्तूंची रेलचेल आहे व तेथे प्रचंड गर्दी असते. या उन्हाळ्यात अमेरिकेत लेकीकडे जवळपस महिनाभर आम्ही होतो, तेव्हा मला हे लक्षात आले की, तेथील बाजारपेठेत भारतीय वस्तू सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत. वॉलमार्टमध्ये ९० टक्के वस्तू या भारतीय कंपनीच्या आहेत, ज्यात हल्दीराम, बेडेकर, पतंजली, टाटा इ. कंपन्यांचा समावेश आहे. इतकेच काय, आपल्या नागपूरची बापट शॉपची हळदसुद्धा तेथे बर्‍याच प्रमाणात आहे. असो.
 
जेथे विदेशी लोक आपल्या भारतीय वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर शुद्धतेमुळे वापर करत आहेत, तेथे आपण भारतीय निव्वळ फॅशन म्हणून विदेशातील वस्तूंचा वापर करीत आहोत व त्यामुळे आपल्याला करोडो रुपयांचं नुकसान होत आहे. मध्यंतरी गंमत म्हणून मीपण ऑनलाईन दोन साड्या मागवल्या व त्या लगेच परतपण केल्यात. कारण वस्तू दिसते एक व प्रत्यक्षात मात्र अगदीच वेगळी असते. म्हणजे मुलगी दाखवायची एक अन्‌ पसंती आल्यावर लग्नांत मात्र दुसरीच उभी करायची...
 
रंगामध्ये, गुणवत्तेमध्येपण बरीच तफावत आढळून येते. मध्यंतरी असे वाचण्यात आले की, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर वापरल्यामुळे एका स्त्रीला त्वचेचा कॅन्सर झाला व तिने कोट्यवधीचा दावा कंपनीवर दाखल केला. नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण बरेच आढळले आणि मग त्यावरून देशभरांत जे काय वादळ उठले होते, ते सर्वांना माहिती आहे. आता तेही शमले आहे आणि पुन्हा टू मिनिटस्‌ म्हणत मॅगी बाजारात दाखल झाली आहे. अशा अनेक पॅकड्‌ खाद्य पदार्थांत आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे, पण तरीही आपण फॅशन म्हणून त्या खातोच, याला काय म्हणावे? असो.
 
काही पालक आपल्या लहान मुलांना फॅशन म्हणून कोका कोला व त्यासारखे कोल्ड ड्रिंक्स जबरदस्ती प्यायला लावतात. निव्वळ फॅशन व स्टेटस्‌ म्हणून. याला काय म्हणावे? ऑनलाईन शॉपिंगचा अजून एक दुष्परिणाम म्हणजे ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी आपण मोबाईलचा अतिरेकी वापर करतो, ज्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतच आहेत. तसेच गंमत म्हणून वा निव्वळ टाईमपास म्हणून उगाचच अनावश्यक शॉपिंग केली जाते व पालक त्याचे फाजील कौतुकपण करतात.
आपण ऑनलाईन शॉपिंग व मॉलमध्ये जाऊन वाटेल तेवढे पैसे निमूटपणे देतो, पण गरिबांशी, भाजीवाल्यांशी १०-२० रु.साठी भांडतो. हे योग्य आहे काय, हे आपणच ठरवायचं आहे. ८० रु. डझनच्या पणत्या आपण ६० रु. मागतो. २० रु.नी आपल्याला खरेच काही फरक पडतो का? पण, या २० रु.तून गरिबांची दिवाळी साजरी होते. असो.
 
विदेशी कंपन्यांकडून नकली माल खरेदी करण्यापेक्षा आपण जर फॅशन व अंधानुकरण बाजूला सारले, तर आपण फसवले जाणार नाही व आपल्या भारतीय वस्तूंचापण खप होईल आणि गरिबांनाही फायदा होईल. जवळपास ६५ ते ७० टक्के बाजारपेठ विदेशी कंपन्यांनी काबीज केलेली आहे. या विळख्यातून आपण सुटलेच पाहिजे. तेव्हा माझी सगळ्यांना नम्र व कळकळीची विनंती आहे की, चायना मेड वस्तू व विदेशी वस्तू खरेदी करण्यापेक्षा भारतीय वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा. ‘विदेशी भगाओ, स्वदेशी बचाव’ याचा आपण प्रचार केला पाहिजे. तेव्हा आपण एकजुटीने दृढ निश्चय करू या की, आपण ऑनलाईन शॉपिंग व विदेशी वस्तू वापरण्याऐवजी स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा तसेच प्रत्यक्ष शॉपिंगचा पुरेपूर आनंद घ्यावा व गरिबांशी भाव करू नये.
ऑनलाईन खरेदीमुळे आपल्या देशातील किरकोळ व्यापार्‍यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता सरकारने त्याचीही एक आचारसंहिता तयार केली आहे. कायदेही केले आहेत; पण सारेच कसे सरकारनेच केले पाहिजे, असे नाही. आपणही सावध असले पाहिजे. जागो ग्राहक, अशी सावधतेची हाक दिली जातच असते. आपण ती एकेली पाहिजे आणि ऑनलाईन शॉपिंग करताना सावध असले पाहिजे!