उत्सव लोकतंत्राचा!
   दिनांक :28-Mar-2019
खास बात 
-सर्वेश फडणवीस  
 
विज्ञानभवनातून, येणार्‍या लोकतंत्र उत्सवाचा शंखनाद झाला. सूर्यास्तसमयी झालेला शंखनाद येणार्‍या सूर्योदयाच्या विजयीपर्वासाठी सज्ज होतो आहे. लोकतंत्राचा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्याला अधिक सजग आणि जागृत राहायला हवे.
 
 
 
आपल्या संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आपला मतदानाचा अधिकार हक्काचा अधिकार आहे. प्रत्येक सुजाण नागरिकाने मतदानाच्या दिवशी मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
 
आपल्या संविधानाने जी लोकशाही मान्य केलेली आहे त्याचा उत्सव साजरा करण्याचा हा काळ आहे. आपण आपल्या अमूल्य मताद्वारे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीद्वारे देशाचा राज्यकारभार चालणार आहे. देशहिताचे निर्णय आपण निवडून दिलेल्या सरकारला घ्यायचे आहेत आणि याचसाठी एक सशक्त सरकार निवडण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. राष्ट्रहित सर्वतोपरी, हाच भाव जागृत ठेवत हा उत्सव अधिक आनंदाने आणि सजग राहून साजरा करू या, कारण हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. इतक्या मोठ्या समृद्ध अशा भारताचा नवसृजनाचा उत्सव आहे. आज युवा देश म्हणून भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे आणि आज प्रत्येक १८ वर्षावरील युवकाने मतदान करत, सगळ्यात मोठ्या लोकतंत्र असलेल्या भारत देशात आपली जबाबदारी यथार्थपणे पार पाडणे गरजेचे आहे.
 
NOTA' (None of the above) पर्याय वापरताना अत्यंत सावधान असणे गरजेचे आहे. 'NOTA' मुळे काय झाले आहे आणि पुढे काय घडू शकते, याचा अनुभव आपल्या गाठीशी आहे.
 
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाही आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे आणि लोकशाहीचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. चला तर, अधिकाधिक टक्के मतदान करत स्थिर सरकार निवडून आणण्यासाठी तयार असू या... कर्तव्य मतदानाचे!