दहशतवाद्यांना चीनकडून संरक्षण- माइक पोम्पिओ
   दिनांक :28-Mar-2019
चीनमध्ये लाखो मुस्लिमांवर अत्याचार होतात. मात्र, संयुक्त राष्ट्रांमध्ये शिक्षेसाठी प्रस्ताव असलेल्या हिंसक इस्लामी दहशतवादी गटांना चीनकडून संरक्षण देण्यात येत आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनला खडसावले आहे.
 
 
या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनने पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद आझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास विरोध दर्शवला होता. याचा संदर्भ देताना पोम्पओ यांनी बुधवारी ट्विटद्वारे हे विधान केले आहे. पोम्पिओ म्हणतात, मुस्लिमांबाबतची चीनची लाजीरवाणी दांभिकता जगाला परवडणारी नाही. एकीकडे चीनमध्ये लाखो मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रस्तावित असलेल्या इस्लामिक दहशतवादी गटांना चीन संरक्षण देत आहे. मात्र, यामध्ये त्यांनी थेटपणे जैशचा आणि मसूदचा उल्लेख टाळला.
चीनवर आरोप करताना पोम्पिओ म्हणतात, चीनकडून मुस्लिम धर्माचे पालन करणाऱ्या लाखो उइघुर समुदयावर आणि कझाकिस्तानच्या सीमेवर राहणाऱ्या कजाख समुदयावर अत्याचार सुरु आहेत. एप्रिल २०१७ पासून त्यांच्या शिनजिंग प्रांतातील छावण्यांमध्ये स्थानबद्ध केलेल्या मुस्लिम अल्पसंख्यांकांवरही अत्याचार होत आहेत. मात्र, अमेरिका या मुस्लिमांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. चीनने अनधिकृतरित्या ताब्यात घेतलेल्या या लोकांना सोडले पाहिजे. तसेच ही दडपशाही संपवली पाहिजे. बुधवारी पोम्पिओ चीनकडून सुरु असलेल्या अत्याचारित मुस्लिम कुटुंबियांना भेट घेतली, त्यानंतर त्यांनी त्यांना अश्वस्त केले.