पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी इव्हीएम वाटप पूर्ण
   दिनांक :28-Mar-2019
 
 
लोकसभा निवडणुकीसाठी शहरासह जिल्ह्यात वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होिंटग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रांचे पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही मतदारसंघांमध्ये वाटप करण्यात आले.
 

 
 
 
पहिल्या टप्प्यातील वाटप पूर्ण करण्यात आले असून, यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी दुसर्‍या टप्प्यात मतदान केंद्रनिहाय यंत्रांचे वाटप करणार आहेत. सकाळी 11 वाजता भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात यंत्रांची वाटप प्रक्रिया पार पाडण्यात आली. 31 जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार मतदारांची संख्या 73 लाख 69 हजार 141 झाली आहे. त्यानंतर राबवण्यात आलेल्या खास मोहिमांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन असे एकूण 68 हजार अर्ज निवडणूक शाखेकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सात हजार 666 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये 237 केंद्रांची वाढ होऊन यंदा पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चार लोकसभा मतदारसंघांत मिळून एकूण सात हजार 903 मतदान केंद्रे झाली आहेत.
 
या मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम (बॅलेट युनिट आणि कण्ट्रोल युनिट) नऊ हजार 484 आणि 10 हजार 590 व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, नायब तहसीलदार पी. डी. काशिकर यांच्यासह इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे विधानसभा मतदारसंघ आहेत. बारामतीमध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी  हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर असे विधानसभा मतदारसंघ आहेत.