गद्दारी न केल्यानेच कुणाला घाबरत नाही...
   दिनांक :28-Mar-2019
 
 
 
चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं प्रत्युत्तर माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिलं आहे. संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं.
आपण कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही असे शिंदे म्हणाले. संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. रणजितिंसह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संजय शिंदे राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते.
 

 
 
संजय शिंदे  यांनी पक्षाशी गद्दारी केली असून त्यांना किंमत मोजावी लागेल, असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता. संजय शिंदे  हे गेली साडेचार वर्षे भाजपच्या सोबत होते. त्यांनी भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदही मिळवलं होतं. मात्र राष्ट्रवादीने माढा लोकसभेची उमेदवारी देताच शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिंदे यांच्याकडून दगाफटका झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या जिव्हारी लागल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी संजय शिंदेंना सुनावलं.
 
तुमच्याकडे येणारे नेते कोणत्या तरी भानगडीत अडकलेले असतील, पण मी अशा कोणत्याही स्कॅम किंवा आर्थिक घोटाळ्यात अडकलेलो नाही. त्यामुळे मी कोणाच्या धमक्यांना भीत नाही. माझ्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात भाजप ग्रामीण भागात पोहचायला सुरुवात झाली होती, असा टोलाही संजय शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.