मसूदला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेने आणला ठराव
   दिनांक :28-Mar-2019
- चीनचा पुन्हा जळफळाट
संयुक्त राष्ट्रसंघ,
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या पाकधार्जिण्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढविताना, अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसुदा ठराव सादर केला आहे. फ्रान्स आणि ब्रिटनने या ठरावाचे समर्थन केले असून, यामुळे चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे.
 
 
 
फ्रान्सने दोन आठवड्यांपूर्वी मसूदला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी सुरक्षा परिषदेत ठराव आणला होता, पण चीनने नकाराधिकार वापरल्याने हा ठराव फेटाळल्या गेला होता. यामुळे चीनविरोधात जगभरातील देश एकत्र आले असतानाच आता स्वत: अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे, त्याच्या प्रवासावर बंदी घातली जावी आणि त्याची सर्व संपत्ती जप्त केली जावी, असे बुधवारी सुरक्षा परिषदेत सादर करण्यात आलेल्या ठरावात अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
 
अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने एकत्रित येऊन मसूदविरोधात अशा प्रकारचा ठराव आणण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍याने दिली. दरम्यान, मसूदचा बचाव करण्यासाठी धडपड करीत असलेल्या चीनने अमेरिकेच्या या ठरावावर आक्षेप घेतला असून, या मुद्यावर हे दोन्ही देश समोरासमोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. या मसुदा ठरावात भारतातील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. या ठरावावर लवकरच मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.