'ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरी'मध्ये नवीन 650 शब्दांची भर
   दिनांक :28-Mar-2019
लंडन,
'ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरी'मध्ये नवीन 650 शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 'चड्डी' या शब्दाचाही समावेश करण्यात आला आहे. या शब्दासह इंग्लंडमध्ये 'चट्टी' या शब्दाला ब्रिटीश भारतीय अभिनेत्री मीरा स्याल आणि संजीव भास्कर यांच्या 'गुडनेस ग्रेशियस मी' या कॉमेडी शोमुळे लोकप्रियता मिळाली आहे.
 
'चड्डी' या शब्दाचं शॉर्ट ट्राऊझर, शॉर्ट्स असं भाषांतर करण्यात आलं आहे. ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीचे वरिष्ठ साहाय्यक संपादक जे. डेंट यांनी म्हटलं की, प्रत्येक नवीन शब्दाचं संशोधन केलं जातं. त्यामागे मोठी मेहनत असते. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये जगभरातील विविध भाषांमधील प्रसिद्ध शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
याआधीही अनेक लोकप्रिय भारतीय शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अच्छा, अन्ना, गुलाब जामून, मिर्च मसाला, गोश्त, कीमा या शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. लोकप्रिय झालेल्या मात्र भाषांतर करण्यासाठी कठीण बनलेल्या शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश केला जातो. एखाद्या भाषेत जितके अधिक शब्द असतील तेवढी ती भाषा समृद्ध समजली जाते. त्यामुळे जास्तीत शब्दांचा शोध घेतला जातो.