'तिथे' दहशतवादी तळच नाहीत; पाकचा दावा
   दिनांक :28-Mar-2019
इस्लामाबाद :
पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने घेतलेली असताना पाकिस्तानातील इम्रान खान सरकार मात्र हे मानायला तयार नसून भारताने दिलेले पुरावेही पाकने नाकारले आहेत.

 
 
पुलवामा हल्ल्यात पाकमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचे भक्कम पुरावे भारताने दिले आहेत. त्यात पाकमधील २२ दहशतवादी तळांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र, पाकने दहशतवादी तळांबाबतच्या माहितीत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. भारताने सांगितलेल्या २२ ठिकाणांची पडताळणी करण्यात आली असता तिथे कोणताही दहशतवादी तळ अस्तित्वातच नसल्याचे आढळून आल्याचे पाकचे म्हणणे आहे. याबाबत काही शंका असल्यास भारतीय तपास यंत्रणांना या ठिकाणांचा दौरा करण्याची परवानगी देण्यास तयार आहोत, असेही पाकने नमूद केले आहे.
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकमध्ये ५४ जणांची चौकशी सुरू असून प्राथमिक चौकशीत यापैकी कुणाचाही पुलवामा हल्ल्याशी संबंध असल्याचे आढळून आलेले नाही, असा दावाही पाकने केला आहे.