स्मृती इराणी : अभिनेत्री ते राजकीय नेत्या
   दिनांक :28-Mar-2019
 
 श्यामकांत जहागीरदार
9881717817 
 
 
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि कॉंग्रेसच्या महासचिव तसेच पूर्वी उत्तरप्रदेशच्या प्रभारी श्रीमती प्रियांका गांधी वढेरा यांच्यात शाब्दिक जुगलबंदी सुरू झाली आहे. दोघींनी एकदुसर्‍याचे नाव घेतले नसले तरी दोघींचाही रोख एकदुसर्‍याकडे असल्याचे जाणवते.
 

 
 
 
काही जण फक्त निवडणूक लढण्यासाठीच अमेठीत येतात, असे प्रियांका गांधी वढेरा यांनी म्हटले आहे, तर रामाचे अस्तित्व नाकारणारे आता रामभक्त बनण्याचे नाटक करत आहे, असा हल्ला स्मृती इराणी यांनी चढवला आहे.
2014 मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती, 2019 मध्येही अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात लढत होणार आहे. प्रियांका गांधी यांचा रोख याकडे होता. तर श्रीमती प्रियांका गांधी वढेरा अयोध्येचा दौरा करणार आहे, त्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांचा हा आरोप होता.
छोट्या पडद्यावर ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’ या मालिकेतून तुलसीच्या भूमिकेमुळे घराघऱात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये स्मृती इराणी यांनी भाजपात प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांची महाराष्ट्र भाजयुमोच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
लवकरच स्मृती इराणी राष्ट्रीय राजकारणात आल्या. 2004 मध्ये दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली, मात्र यात त्यांचा पराभव झाला. याचवर्षी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला.
 
2009 मध्ये स्मृती इराणी यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात विजय गोयल यांचा प्रचार करताना राजधानीत महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुध्द आवाज उठवला. बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली. 2010 मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि सोबतच भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
2011 मध्ये स्मृती इराणी गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आल्या. 2017 मध्ये मुदत संपल्यानंतर स्मृती इराणी पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्या. 2014 मध्ये भाजपाने स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघात उमेदवारी देत राहुल गांधी यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवले. या मतदारसंघात पराभूत झाल्यानंतरही त्यांची ताकद वाढली. मोदी यांच्या मंत्रिमंडळात आधी त्यांच्याकडे मानव संसाधन विकास खाते देण्यात आले. माहिती आणि प्रसारण, मंत्रालयाचीही जबाबादारी त्यांनी काही काळ सांभाळली.
 
स्मृती इराणी यांच्या उमेदवारीने आतापयर्र्त एकतर्फी होणारी अमेठी मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची तसेच देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरली. स्मृती इराणी माझी लहान बहीण आहे, तिला निवडून द्या, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केले. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या तोंडाला फेस आणला. राहुल गांधी यांनी निवडणूक जिंकली, मात्र त्याचे मताधिक्य कमी झाले.
2009 मध्ये राहुल गांधी यांना 4 लाख 64 हजार 195 मते मिळाली होती. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या बसपा उमेदवाराला 94 हजार मते मिळाली होती. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपाचे प्रदीपकुमार सिन्हा यांना फक्त 37570 मतांवर समाधान मानावे लागले. गांधी यांनी ही निवडणूक जवळपास 3 लाख 71 हजार मताधिक्याने िंजकली होती. 2014 मध्ये स्मृती इराणी यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील चित्रच बदलले. राहुल गांधी यांची 56 हजार मते कमी झाली. 1 लाख 8 हजाराने त्यांनी निवडणूक कशीबशी जिंकली. राहुल गांधी यांना 4 लाख 8 हजार 651 मते मिळाली. भाजपाच्या स्मृती इराणी यांना 3 लाखावर मते मिळाली. 2003 मध्ये तिसर्‍या क्रमांकाची 37 570 मते घेणार्‍या भाजपाला स्मृती इराणी यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकाची 3 लाखावर मते मिळाली. अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांच्याविरुद्ध स्मृती इराणी यांना उतरवण्याचा भाजपाचा निर्णय अचूक असल्याचे यातून सिद्ध झाले.
 
पराभूत झाल्यानंतरही इराणी यांनी अमेठी मतदारसंघाशी असलेला आपला संपर्क तुटू दिला नाही. दरमहिन्यात त्या अमेठीत जाऊन मतदारांशी संपर्क साधत होत्या. स्मृती इराणी तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला खासदार निधी अमेठी मतदारसंघात खर्च केला. अनेक मोठे प्रकल्प अमेठी मतदारसंघात आणले.
मध्यंतरी भदोही येथील एक़ सभा आटोपून वाराणसी विमानतळाकडे येत असतांना स्मृती इराणी यांनी आपला काफिला विमानतळाच्या आधी असलेल्या चहाच्या टपरीवर थांबवला. भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी टपरीवरील चहाचा आणि ब्रेडपकोड्याचा आस्वाद घेतला. या ब्रेडपकोड्याची चव इराणी यांना खूप आवडली. त्यांनी दुसर्‍यांदा ब्रेडपकोडा मागवत त्या दुकानदारालाच अमेठी मतदारसंघात आपले हॉटेल उघडण्याचे आमंत्रण देऊन टाकले. गुजरातमधून मी ब्रेडपकोडा शिकून आलो, आता वाराणसी येथे धंदा करत आहे, यातच मी समाधानी आहे, असे तो टपरीवाला म्हणाला.
यावेळी स्मृती इराणी यांच्या उमेदवारीने राहुल गांधी यांचे धाबे दणाणले आहे. अमेठी मतदारसंघातील निवडणूक आपल्याला जिंकता येईल की नाही, अशी शंका राहुल गांधी यांना भेडसावते आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी दुसर्‍या मतदारसंघाचा शोध सुरू झाला आहे. हा राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी घडवून आणलेला एकप्रकारचा नैतिक पराभवच म्हणावा लागेल.
स्मृती इराणी यांनी आपल्या आक्रमक प्रचार मोहिमेमुळे गांधी परिवाराच्या तोंडचे पाणी पळवले आहे, त्यामुळेच गांधी परिवार त्यांच्यावर तुटून पडत आहे. अमेठीत स्मृती इराणी यांची लोकप्रियता वाढल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.