अजहरचा काळ्या यादीत समावेश करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव
   दिनांक :28-Mar-2019
नवी दिल्ली:
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्सनं पाठिंबा दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्याबद्दलचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात आणण्यात आला होता. मात्र चीननं नकाराधिकार वापरुन तो हाणून पाडला.
 
 
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरचा काळ्या यादीत समावेश करण्यासाठी अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेकडे हा प्रस्ताव सोपवण्यात आला आहे. मात्र यावर नेमकं मतदान कधी होणार, याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मसूद अजहरवर बंदी येऊ शकते. याशिवाय त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होऊ शकते. मसूदच्या परदेश यात्रांवरदेखील निर्बंध आणले जाऊ शकतात.