अबब! निजामाबादमध्ये 185 मतदार रिंगणात!
   दिनांक :29-Mar-2019
 
तेलंगणातील निझामाबाद लोकसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या कालावधीनंतर तब्बल 185 उमेदवार रिंगणात उरल्याने निवडणूक आयोगापुढे मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण, त्यातून मार्ग काढत येेथे आता कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात येत आहे. येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे.
 
 
 
आता निझामाबाद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोगाने तातडीने दहा लाख मतपत्रिका छापण्याची ऑर्डर दिली आहे. तसेच मतपेट्या लगतच्या व अन्य राज्यांमधून मागविण्यात येत आहेत. या मतदारसंघाने मात्र संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
या मतदारसंघात यापेक्षाही अधिक लोकांनी अर्ज भरले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 185 अर्ज कायम राहिले. यात 178 असे अर्ज आहेत, जे तेलंगणातील शेतकर्‍यांनी दाखल केले आहेत. हळद शेतमालाला योग्य भाव मिळावा या मुद्यावर त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. हळदीला योग्य भाव द्या, अशा घोषणा देत त्यांनी घोळक्याने येऊन आपापले अर्ज सादर केले. यावेळी त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
 
केवळ निझामाबादच नव्हे, तर 17 मतदारसंघात 443 उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यात मेडकमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे दहा उमेदवार आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये फक्त 64 उमेदवारांचीच नावे नमूद केली जाऊ शकतात. पण, निझामाबाद येथे 185 उमेदवार रिंगणात असल्याने शेवटी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निझामाबाद मतदारसंघातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता या टीआरएसच्या उमेदवार आहेत, तर कॉंग्रेसने येथे मधु यशकी गौड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने येथे धर्मपुरी अरविंद यांना मैदानात उतरवले आहे.
 
के. कविता यांनी असा आरोप केला आहे की, भाजपा आणि कॉंग्रेस यांनी मिळून या हळद उत्पादक शेतकर्‍यांना भडकावले आहे. आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयारही होतो. पण, त्यांनी ऐकले नाही. निझामाबाद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते.