केतकी चितळेने केलेला 'हा' आरोप दिग्दर्शकाने फेटाळला !
   दिनांक :29-Mar-2019
 ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेतून आजारपणामुळे आपल्याला काढून टाकल्याचा आरोप अभिनेत्री केतकी चितळेन हिने  केला आहे. या संदर्भात तिने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला  आणि निर्मात्यांवर हे आरोप केले. तर दुसरीकडे केतकीच्या भूमिकेमुळे मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडत नसल्यामुळे तिला काढून टाकल्याचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी स्पष्ट केले. 

 
 
या बाबत केतकी म्हणते की, ‘मला epilepsy हा आजार आहे. या आजारात रुग्णाला कधीकधी अचानक झटका येतो. हा एक मेंदूशी निगडीत आजार आहे. माझ्या भूमिकेला टीआरपी मिळत नसल्याचे कारण देत अचानक दुसऱ्या अभिनेत्रीला मालिकेत आणण्यात आले आहे. माझ्या आजारामुळे मला या शोमधून बाहेर काढले आहे. मी याविरोधात आवाज उठवला कारण, हा माझ्या एकटीवरचा अन्याय नाही तर माझ्यासारख्या या आजारामुळे ग्रस्त असलेल्यांवरचा अन्याय आहे,’
 
"> 
 
 
 केतकीने हा व्हिडीओ पोस्ट केल्या नंतर दिग्दर्शक राकेश सारंग यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे. केतकीच्या आजाराविषयी आम्हाला कल्पना होती. म्हणून तिला जेव्हा कधी तिची तब्येत बरी नसायची तेव्हा सेटवर आम्ही तिला आराम करायला वेळ देत होतो. तिच्या भूमिकेमुळे मालिकेला विशेष टीआरपी मिळत नव्हता. तिच्या भूमिकेबाबत आणि सर्व्हे करून लोकांचे मतसुद्धा घेतले. त्यानंतरच आम्ही अभिनेत्री बदलण्याचा निर्णय घेतला,’ असे  ते म्हणाले.