बिहार : मतदारसंघ वाटप होऊनही कॉंग्रेसमध्ये असंतोष कायम
   दिनांक :29-Mar-2019
 
 
देशात तर महागठबंधन झाले नाही. पण, बिहारमध्ये झाले. या महागठबंधनात कॉंग्रेसच्या वाट्याला फक्त नऊ जागा मिळाल्याने आणि वरिष्ठ नेत्यांनी त्या मान्य केल्यामुळे कॉंग्रेस पक्षात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. हा असंतोष थांबविण्यासाठी शुक्रवारी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदारसंघांची घोषणा केली. पण, या पत्रपरिषदेला कॉंग्रेसचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता. ज्या पाच जागांवरून वाद होता, तो तसाच कायम राहिला आहे. यामुळे बंडखोर उभे राहतीलच, अशी स्थिती सध्या आहे.
 
 

 
 
 
नालंदाची जागा जीनत राम मांझी यांच्या हिंदुस्थान अवामी मोर्चाला दिल्यामुळे नालंदा कॉंग्रेस कमिटी आणि कार्यकर्त्यांनी बिहार प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. नालंदात जीतन राम मांझी यांचे कोणतेही अस्तित्व नसताना, त्यांना ती जागा का सोडली, असा कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. आम्हाला ती जागा मिळाली असती तर आम्ही नक्कीच जिंकून आलो असतो, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारच्या जागावाटपात ज्या नालंदा जागेवरून प्रचंड वाद होता, त्यात कोणताही बदल झालेला नाही. ही जागा कॉंग्रेसला मिळाली नाही.
 
हा असंतोष केवळ नालंदातच नाही तर संपूर्ण बिहार कॉंग्रेसमध्ये आहे. बिहारचे नेतेही या जागावाटपामुळे अस्वस्थ झाले आहेत. अनेक जण बंडखोरीची भाषा वापरीत असल्याने वरिष्ठ नेत्यांनीही दिल्लीतील नेत्यांना इथल्या भावना कळविल्या आहेत.
भाजपातून कॉंग्रेसमध्ये गेलेले क्रिकेटर कीर्ती आझाद यांनी म्हटले आहे की, श्रेष्ठींनी बिहारमधील कॉंग्रेसजनांच्या भावनांची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. आता निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. केवळ 9 जागा मिळाल्यामुळे संपूर्ण बिहारमध्ये निराशेसह असंतोष उफाळून येत आहे. आमच्या हमखास निवडून येणार्‍या जागा दिल्लीश्वरांनी सोडून दिल्यामुळे कार्यकर्ते संतापले आहेत. आझाद हे दरभंगाचे खासदार असून, स्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच दिल्लीतील नेत्यांनी तातडीने निर्णायक भूमिका घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. दरभंगा जागेवरून इतका वाद पेटला आहे की, सर्वांचे मत दूर सारून लालूंच्या राजदने दरभंगात अब्दुल बशीर सिद्दीकी यांनाच उतरविण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते संतप्त झाले आहेत. शुक्रवारच्या पत्रपरिषदेत त्यावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे आता कीर्ती आझाद कुठून निवडणूक लढविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुपौल मतदारसंघातही अशीच मारामारी आहे. तेथील विद्यमान कॉंग्रेस खासदार रंजीत रंजन यांच्यासाठी पप्पू यादव यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पण, येथेही राजदलाच आपला उमेदवार उभा करायचा आहे. बाहुबली पप्पू यादव हे 2014 मध्ये मधेपुरातून राजदच्या तिकिटावर निवडून आले होते. नंतर मात्र लालूंशी वाद झाल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. नंतर त्यांनी जन अधिकार पक्ष स्थापित केला होता. तिकडे सुपौलचे राजद जिल्हा प्रमुख आणि आमदार यदुवंश कुमार यांनी धमकी देऊन टाकली आहे की, आम्ही रंजीत रंजन यांचा प्रचार करणार नाही, पािंठबाही देणार नाही.
 
ही जागा आम्हाला मिळाली नाही, तर आम्ही आमचा वेगळा उमेदवार उभा करू. त्यासाठी आमच्यावर पक्षाने कारवाई केली तरी चालेल. शेवटी सुपौलची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली असली तरी राजदमध्ये वाद कायम आहे.
औरंगाबादची जागाही जीतन राम मांझी यांना दिल्याने थेट प्रदेश कार्याध्यक्षच भडकले आहेत. कौकाब कादरी म्हणाले, जागावाटपात कॉंग्रेसवर घोर अन्याय करण्यात आला आहे. कार्यकर्ते युती करण्याच्या मानसिकतेत नाहीत. अशीच प्रतिक्रिया कॉंग्रेसचे आमदार अजित शर्मा, धीरज कुमार सिंह टुना आणि रामदेव राय यांनीही व्यक्त केली आहे. औरंगाबादची जागा जीतन राम मांझी यांच्याकडेच ठेवण्यात आल्यामुळे येथेही बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. मधेपुरामध्ये राजदने ज्येष्ठ नेते शरद यादव यांना सीट दिली आहे. तेथेही धुसफूस सुरूच आहे. एवढ्या मोठ्या जागांवर असमाधान पाहून राजद प्रमुख तेजस्वी यादव यांना जमुई, बांका आणि कटिहार येथील प्रचार सभा रद्द करून पाटणा गाठावे लागले. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की होते, त्यांची तब्येत बरी नाही. पण, त्यांचा आजार राजकीय असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. एकूणच बिहारमध्ये मोठा गाजावाजा करून जागांचे वाटप तर झाले, पण कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघांमधून लढेल हे आधीच न ठरल्याने जागांसाठी प्रचंड चढाओढ सुरू होती. बिहारमध्ये आता राजद 19, कॉंग्रेस 9, राष्ट्रीय लोक समता पार्टी 5, विकासशील इन्सान पार्टी व जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाला प्रत्येकी तीन आणि भाकपास एक व भाकपा (माओवादी-लेनिनवादी) या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे.