बास्केटबॉलचा उगवता तारा सिया देवधर!
   दिनांक :29-Mar-2019
 आठवड्यातली स्त्री 
 - महेंद्र आकांत
   9881717803
 
क काळ असा होता की, नागपूर-विदर्भाला आंतरराष्ट्रीय खेळाडूंची वानवा होती. मात्र, अलीकडच्या काळात ही वानवा दूर झाली आहे. पाहिजे तसे इन्फ्रास्टक्चर अजूनही नागपूर शहरात नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिथेंटिक ट्रॅक नाही, ॲस्टो टर्फ नाही, वूडकोर्टचे आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियम नाही. अशाही विपरीत परिस्थितीत नागपुरातील खेळाडू आपले परिश्रम आणि कौशल्याच्या भरवशावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहेत. नागपूर बास्केटबॉलच्या क्षितिजावरही अशाच एका तार्‍याचा उदय होत आहे आणि त्या तार्‍याचे नाव आहे सिया शिरीष देवधर!
 


वडील शिरीष देवधर साहसी क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षक आहेत आणि आत्या ऋतुजा देवधर-मुंजे ही स्वत: बास्केटबॉलची खेळाडू होती. त्या दोघांकडून सियाला खेळाचे बाळकडू मिळाले. त्याला खेळाची विशेष आवड असणार्‍या आई स्वातीची सुरेख साथ लाभली आणि सियाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या कामगिरीने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सार्‍यांचे म्हणजे बास्केटबॉल क्षेत्रात नावाजलेल्या आणि ज्या संस्थेत एकदा ना एकदा आपण सहभागी होऊन आपला खेळ सुधारण्याची आपल्याला संधी मिळावी असे स्वप्न पाहात असणार्‍या खेळाडूंसाठी एनबीए म्हणजे अमेरिकेतील नॅशनल बास्केटबॉल असोसिशन एक मोठी संस्था आहे. या संस्थेनेही सियामधील खेळातील कलागुण ओळखून आपल्या शिबिरासाठी तिची निवड केली आहे. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय नेमबाज, ऑलिम्पिक पदकविजेता व देशाचे क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जे ‘खेलो इंडिया’ अभियान हाती घेण्यात आले आहे, त्याच्याही राष्ट्रीय शिबिरासाठी सियाची निवड झाली आहे.
 
आज सिया, भारतीय विद्याभवन सिव्हिल लाइन्स शाळेत दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती जेव्हा दुसर्‍या वर्गात शिकत होती तेव्हा तिने आधी जलतरणाचा सराव करणे सुरू केले होते. मात्र, वडिलांची इच्छा तिने सांघिक खेळात सहभागी व्हावे, अशी होती. त्यामागे त्यांचे लॉजिकही होते. सांघिक खेळामुळे विविध गुणांचा खेळाडूंमध्ये विकास होतो, जसे की खिलाडूवृत्तीची भावना निर्माण होते, एकमेकांना घेऊन चालण्याचा गुण विकसित होतो, आपल्याला पटत नसलेल्या किंवा आपले ज्याच्याशी पटत नाही अशाही व्यक्तीला आपल्याला सोबत घेऊन चालावे लागते किंवा त्याच्यासोबत चालावे लागते.
  
 
अखेर त्यातून मार्ग निघाला, घराजवळच असलेल्या शिवाजीनगर जिमखानाची आईने निवड केली. तेथील लहान मुलांसाठी असलेले वातावरण आवडले. आई स्वत: तिला तेथे घेऊन जाऊ लागली. आत्यानेही बास्केटबॉल खेळासाठी प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक शत्रुघ्न गोखले, विनय चिकाटे आणि पंकज देशमुख यांनी सियामधील टॅलेण्ट हेरले आणि तिला योग्य ते मार्गदर्शन केले. अवघ्या सहा वर्षांच्या काळात सियाच्या खाती आज सहा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची प्रमाणपत्रे जमा आहेत. यात स्कूल नॅशनलचाही समावेश आहे. पाचवी ते दहावी अशा सलग सहाही वर्षे तिने विविध वयोगटांमधील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. पॉईंट गार्ड फॉरवर्ड पोझिशनवर खेळणार्‍या सियाने 2015 साली ऑस्ट्रेलियाच्या ॲडिलेड शहरात झालेल्या पॅसिफिक स्कूल गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय ती 14 वर्षांखालील गटात असताना तिची 16 वर्षे गटाच्या आधी 30 आणि नंतर 16 खेळाडूंच्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली होती. मात्र, वय कमी असल्यामुळे फिबाच्या आशिया ज्युनियर स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या अंतिम 12 खेळाडूंच्या संघात तिला संधी मिळाली नव्हती. ती यंदा म्हणजे 2019 साली तिला मिळण्याचा विश्वास आहे.
 
घरच्यांचे प्रोत्साहन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळा व शाळेतील शिक्षकांकडून मिळणारे सहकार्य यामुळेच आपल्याला ही प्रगती साधता येत आहे, असे सिया आवर्जून सांगते. येत्या 1 एप्रिलपासून फ्लोरिडा येथे होणार्‍या एनबीएच्या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी तिची निवड करण्यात आली आहे. एनबीए म्हणजे एक प्रकारे आपल्या देशात होणार्‍या आयपीएलसारखी बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करणारी संघटना आहे. ही संघटना गेल्या काही वर्षांपासून भारतात येऊन विविध माध्यमाद्वारे कौशल्य असलेल्या खेळाडूंची निवड करते. यंदा या संस्थेने प्रथमच शालेय मुलींचीही निवड केली असून देशातील निवडण्यात आलेल्या चार खेळाडूंमध्ये सियाचाही समावेश आहे, ही नागपूरकरांसाठी गौरवाची बाब ठरली आहे. तिथे तिला आधुनिक प्रशिक्षणासह काही आंतरराष्ट्रीय सामने दाखविले जाणार आहेत, त्यातील खेळाडूंच्या कौशल्याचे विश्लेषण करून सांगितले जाणार आहे आणि काही सामन्यांचा सरावाही तिला करता येणार आहे.
 
नुकत्याच पुण्यात झालेल्या खेलो इंडियाच्या स्पर्धेच्या माध्यमातूनही काही उदयोन्मुख खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तीन आणि राष्ट्रीय स्तरावर शालेय खेळाचे संचालन करणार्‍या एसजेएफआय या संस्थेमार्फतही राष्ट्रीय पातळीवर तीन अशा एकूण सहा मुलींची राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे आणि त्यातही सियाची निवड झालेली आहे. भविष्यातील ऑलिम्पिकपटू तयार करणे, ही या खेलो इंडिया अभियानाची योजना आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंच्या शिबिराचा आणि शिक्षणाचा भार भारत सरकार उचलणार आहे, शिवाय खेळाडूंना शिष्यवृत्तीच्या रूपात आर्थिक सहकार्यही करणार आहे.
 
सिया रोज सकाळी दोन तास आपल्या वडिलांसह शारीरिक तंदुरुस्तीसाठी धावणे आणि इतर सराव करीत असते. तसेच सायंकाळी दोन तास बास्केटबॉल खेळाचा सराव करते. आहार असा विशेष काही घेत नाही, मात्र प्रोटीन्स जास्तीत जास्त देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच सामान्यत: घरी जे नियमित खाद्यान्न तयार होते, त्यावरच तिचा भर असतो, असे तिच्या आईने सांगितले. गेल्या वर्षी मे महिन्यात ग्रेटर नोएडा येथे झालेल्या एनबीए  ॲकॅडमी इंडियाच्या पहिल्या एनबीए ॲकॅडमी वुमेन्स कॅम्पमध्ये सहभागी होत सियाने मोस्ट इम्प्रुव्हड्‌ प्लेअरचा मान मिळविला होता. या शिबिरासाठी देशभरातून 18 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या शिबिरात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती जेनिफर अझ्झी व डब्ल्यूएनबीए चॅम्पियन रुथ रिले यांचे मार्गदर्शन लाभले होते. या दोघींनी सियाच्या खेळाचे कौतुक केले होते.
अशी ही आमची सिया उत्तरोत्तर प्रगती करो आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला तिला पाहता यावे, यासाठी आपण सारे तिला शुभेच्छा देऊ या! किप इट अप सिया...!