यांच्या अटकेची ती संध्याकाळ...
   दिनांक :29-Mar-2019
 वृन्दा पाचपोर
 
 
गे
ली दीड वर्षे आणिबाणीतील संघर्षनायिकांचे हे सदर मी नियमित वाचते आहे. वाटलं, आपणही काही सांगावं. आजवर ही संधीच कुणी दिली नव्हती. त्या काळांत सोसलेले सारे कढ मनांतल्या मनात दबून होते. आता ती संधी मिळाली आहे...  
आणिबाणीचा काळ हा माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा होता. जणूकाही देवाने माझी सत्त्वपरीक्षाच घेतली होती. १९७५ साली आणिबाणी लागली. आमचे घर रघुजीनगर (सक्करदरा) येथे आहे. ज्या दिवशी आणिबाणी लागली त्या दिवशी मी माझे पती रामकृष्ण उर्फ प्रकाश पाचपोर व माझा ६ महिन्यांचा मुलगा पराग, आम्ही बाहेर फिरायला जाण्याचा विचार केला होता. आणिबाणी काय आहे आणि ती कशासाठी लागली, याचे मला ज्ञान नव्हते. कारण माझ्या माहेरी मी संघ बघितला नव्हता. यांचा संघाशी संबंध होता म्हणण्यापेक्षा ते स्वयंसेवक होतेच. सासर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवाहातले. तरीही आणिबाणी लागली म्हणजे केवळ संघाशी संबंध आहे म्हणून यांना अटक करतील, याची जाणीव नव्हती.
आम्ही खूप आनंदी होतो त्या दिवशी. छान संख्याकाळ पडली होती आणि आम्ही कधी नव्हे ते बाहेर जाणार होतो फिरायला. कुटुंबासोबत असा निवांत वेळ... फारच सुखद होती ती संख्याकाळ; पण दुःख हे सांगून येत नसतं. एकाएकी आमच्याकडे एक इन्स्पेक्टर, चार-पाच पोलिस व पोलिसव्हॅन दाराशी येऊन उभी राहिली. रामकृष्ण पाचपोर कोण म्हणून त्यांनी विचारले. यांंनी सांगितले, मी आहे. तेव्हा ते म्हणाले, आम्ही तुम्हाला मिसामध्ये पकडण्यासाठी वॉरंट आणला आहे. चला...
 
काही क्षण तर काही सूचतच नव्हते. आपल्या सरळमार्गी नवर्‍याला असे पोलिस कधी अटक करायला येतील, याचा दूरदूरपर्यंत विचारही मनात डोकावण्याचे तसे काही कारण नव्हते. माझा हंबरडाच फुटला. सहा महिन्यांचं मूल घेऊन मी कसे दिवस काढणार, याचा मला विचार पडला. मला सासूबाईंनी समजावून सांगितलं. धीर दिला. मला काही पटेना. यांचा दोष काय? यांचाच कशाला ज्यांनाही अटक केली जात होती, हिटलरी धरपकड सुरू होती ते काही गुन्हेगार नव्हते.
 
माझी आई घाबरून गेली होती. माझ्या डोळ्यांतील पाणी सरेना. पण, नियमात जे बसतं तेच घडत असतं. जेल म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर, सिनेमात दाखवितात तसे लोखंडी साखळदंडांनी बांधून आरोपीला ओढत नेतात तेच दृश्य तरळले. यांंना घेऊन गेल्यावर आम्ही दुसर्‍या दिवशी जेलमध्ये गेलो, पण आम्हाला भेटू दिले नाही. असं करत करत मी एक महिना काढला. पुढे मात्र आम्हाला भेटायला जाण्यास परवानगी देण्यात आली. त्या दरम्यान आमच्याशी घरी आजूबाजूला कुणी संपर्क ठेवीत नसे. आमची लोकांना, शेजार्‍यांना भीती वाटायची. नंतर संघबंधू व अन्य लोकांनी सत्याग्रह केला. त्यात माझ्या सासूबाई लीलाताई व नणंद सौ. मीनाक्षी पुराणिक (कु. नंदा पाचपोर) या दोघी होत्या. भावोजी प्रमोद पाचपोर भूमिगत होते. मला तर असे वाटायचे की, इथून पळून जावे. कुणी म्हणायचे, माहेरी जाऊन राहा; पण ते मला पटले नाही. कारण घरी माझे सासरे (दादाजी पाचपोर) एकटेच होते. माझे भासरे (बाळासाहेब पाचपोर, यवतमाळ) जेलमध्ये असल्यामुळे आमच्या वहिनी अधूनमधून जाऊन येत असत. या सर्वांना सोडून मी कुठेच जाऊ शकत नव्हते. काही दिवसांनी ऑफिसचा अर्धा मिळणारा पगारही बंद झाला. आमचे खायचे वांधे व्हायला लागले. बरे झाले, माझा मुलगा बिस्किटाविना काही खात नसेे. असे करत करत एका बालमंदिरामध्ये मी नोकरी केली. हेसुद्धा जेलमध्ये टायिंपगची कामे करत. त्यातून मिळणारे पैसे भेटीला गेलो की मिळायचे. मला अवघा ३५ रु. पगार मिळायचा आणि ऑफिसमधून थोडी मदत व्हायची. तेव्हा कुठे जरा बरे चालायचे. निभले तेही दिवस.
 
अखेर आणिबाणीचा शेवट झाला. मी ज्या बालकमंदिरात शिकवत होते तिथे एक जण सांगायला आला, वहिनी, भाऊ आज सुटणार आहेत, लवकर घरी चला. मला काही सुचेना. मुलाला घेऊन आम्ही सर्व जेलकडे धावलो. वाट पाहात पाहात संध्याकाळ झाली आणि जेलची दारे उघडली. पण, आपला नवरा कधी बाहेर येतो, याची प्रत्येक स्त्री डोळ्यात प्राण आणून वाट बघत होती... आणि शेवट गोड झाला! म्हणून आम्ही आज सर्व सुखात आहोत. व्याधी सुटत नाही, संकट पाठ सोडत नाही, पण त्यावर मात करणे हे महत्त्वाचे आहे.