बच्चे, मनके सच्चे!
   दिनांक :29-Mar-2019
 
 
ही तो रश्रींची इच्छा!
 
र. श्री. फडनाईक 
 
परवा मेनका काकूंनी आपल्या पुतण्याला शेख चिल्लीची उपमा दिल्याचे मीडियाच्या वृत्तावरून कळले. याबाबत, आमचा मीडियावर आक्षेप आहे : हे लोक घरगुती बाबी कशाला जाहीर करतात हो! आता काकू आपल्या पुतण्याला काय म्हणते याचेशी लोकांना काय कर्तव्य! पण त्यांनी ती गोष्ट जाहीर केली! वृत्त कळल्यावर आम्ही, हा शेख चिल्ली कोण आणि त्याच्यात आणि या पुतण्यात काय साधर्म्य आहे, याचा शोध घेत बसलो. कळलं ते एवढंच, की हे एक काल्पनिक पात्र आहे, आणि हे पात्र आपल्या वरवरच्या विचित्र वागणुकीसाठी प्रसिद्ध झालं आहे. प्रत्यक्षात शेख चिल्ली अत्यंत शहाणा असतो, हे, तो पात्र असलेल्या कथेच्या शेवटी लक्षात येते.
 

 
 
शेख चिल्लीच्या नावावर अनेक किस्से खपविले जातात! वैचित्र्य व गोंधळ ही शेख चिल्लीची वैशिष्ट्ये होती, असे त्याच्या नावावर लिहिल्या गेलेल्या कथांतून बिंबविण्याचा प्रयत्न झालेला दिसतो!
आता मेनका काकूंनी कोणत्या अर्थाने आपल्या पुतण्याला शेख चिल्लीचे विशेषण दिले, कळायला मार्ग नाही. पण त्यांनी तसे म्हणायला नको होते! शेख चिल्लीला कोणी कितीही विचित्र म्हटलं, तरी तो हुशार होता, यात शंका नाही! परंतु लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी, आणि त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तो वेगवेगळ्या करामती करीत होता. काकूंना नेमकं काय म्हणायचं आहे आपल्या पुतण्याबद्दल हे स्पष्ट होत नसलं, तरी पुतण्याची उणीव दाखवून, त्यात त्याने सुधारणा करावी, अशीच त्यांची सदिच्छा असावी! शेवटी घरचीच व्यक्ती आहे ना ती! भाजपाने, काकूंचा हा सकारात्मक दृष्टिकोन ध्यानात घ्यावा, उगाच त्याचा शेख चिल्ली, शेख चिल्ली असा उपहास करू नये!
 
एकीकडे काकूंचा हा अभिप्राय, तर दुसरीकडे ममता आत्याचे, ‘बाळा तू अजून लहान आहेस’, अशा आशयाचे थोपटणे!
एवढ्यातीलच गोष्ट आहे; प. बंगालमध्ये जाऊन कॉंग्रेसाध्यक्षांनी तेथील ममता दीदी सरकारवर झोड उठविली. त्यांच्या सरकारात एकाधिकारशाही आहे, अशा अर्थाचा आरोप केला. त्यावर दीदींची प्रतिक्रिया विचारली असता, त्या म्हणाल्या, तो बच्चा आहे, त्याच्या (विधानां)वर काय बोलायचे!
 
खरं आहे, की दीदी वयाने आणि राजकीय अनुभवाने कॉंग्रेसाध्यक्षांपेक्षा मोठ्या आहेत. तरी पण त्यांनी त्याला बच्चा (किड- घळव) म्हणायला नको होते! सुमारे 135 वर्षे जुन्या पक्षाचा सर्वसंमतीने अध्यक्ष झालेल्या या युवा नेत्याची अशी संभावना करायला नको होती दीदींनी! आपल्या भाच्याला असे नाउमेद करायला नको होते! त्यापेक्षा, त्याला जवळ बोलवायचे! म्हणायचे, असं बोलू नये ज्येष्ठांबद्दल! त्यांचा आदर करावा! कधी तरी पाच वर्षांतून एकदा आपल्या आत्याच्या गावी येतो, अन्‌ तिला न भेटताच परत जातो! विसरलास का, मी तुझी शत्रू नाही! आपण सर्वांनी एकत्र यायचे आहे, आपल्या खर्‍या शत्रूला परास्त करायचे आहे. तो देशाचा मित्र असेल, पण आपला शत्रू नंबर एक आहे. तू राजकारणात अजून लहान आहेस! पहिले गृहस्थाश्रमाचे बािंशग बांध, नंतर राजकारणाच्या बोहल्याचा विचार कर! सध्या दिल्लीच्या आसनाचे स्वप्न मला एकटीलाच पाहू दे!
दीदीकडून अशा समजूतदारीची अपेक्षा होती. त्याऐवजी त्यांनी जाहीरपणे आपल्या भाच्याला फटकारले. बच्चा झाला म्हणून काय झाले, मनका सच्चा आहे! कारण स्पष्टच आहे, बच्चे मनके सच्चे! खोटं बोलतात का कधी बच्चे!