डॉ. मुरलीमनोहर जोशी यांंचा राजकीय प्रवास
   दिनांक :29-Mar-2019
 
 
 श्यामकांत जहागीरदार
 
 
लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपातील अडवाणी, डॉ. जोशी युगाचा अंत झाल्याची चर्चा सुरू झाली. मुळात अशी चर्चा अनाठायी आहे. निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, म्हणून कोणाची राजकीय कारकीर्द संपत नाही.
भाजपाच्या विस्तारातील अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. या तीन तसेच अन्य अनेक नेत्यांच्या तसेच हजारोंच्या संख्येतील कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे भाजपाला सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचता आले, ही वस्तुस्थिती आहे.
 

 
 
 
कोणत्याही सरकारी खात्यात तुम्ही कितीही मोठ्या पदावर असा आणि कितीही चांगले काम करत असा, एक दिवस तुम्हाला तुमच्या नियत वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागते. राजकारणात मात्र निवृत्त होण्यासाठी अशी कोणतीच वयोमर्यादा नाही. त्यामुळे असे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे राजकारणात ज्याला काय बोलायचे यापेक्षा काय बोलायचे नाही, यासोबतच कधी थांबायचे ते समजते, तो यशस्वी होतो.
 
घर असो की दुकान, नवीन पिढीसाठी जुन्या पिढीला जागा रिकामी करायचीच असते, तरच जुन्या पिढीबद्दल नवीन पिढीत
आदराची भावना कायम राहते. आपल्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा उपयोग जुन्या पिढीतील लोकांनी नवीन पिढीला करून द्यायचा असतो. लालकृष्ण अडवाणी यांनी वयाची नव्वदी पार केली आहे, तर डॉ. मुरलीमनोहर जोशी 85 च्या घरात आहेत.
डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचा जन्म उत्तराखंडमधील अल्मोडा येथील. उत्तराखंडमध्येच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी एमएससी आणि नंतर पीएच.डी केली. नंतर रा. स्व. संघाचे सरसंघचालक झालेले प्रो. राजेंद्रिंसह उपाख्य रज्जूभय्या हे मुरलीमनोहर जोशी यांचे शिक्षक होते. 1953-54 मध्ये जोशी यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला.
 
संघ, जनसंघ, जनता पक्ष आणि भाजपा असा जोशी यांचा राजकीय प्रवास आहे. 1975 मध्ये आणिबाणीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. 1977 मध्ये डॉ. जोशी सर्वात प्रथम उत्तराखंडच्या अल्मोडा येथून लोकसभेवर निवडून आले. दोनदा त्यांनी अल्मोडाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. 1996 ते 2004 पर्यंत डॉ. जोशी आताच्या प्रयागराजचे म्हणजे अलाहाबादचे खासदार होते.
 
2004 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने डॉ. जोशी यांना राज्यसभेत पाठवले. याआधी 1992 ते 96 या काळातही ते राज्यसभेचे सदस्य होते. 2009 मध्ये डॉ. मुरलीमनोहर जोशी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्यामुळे डॉ. जोशी यांनी कानपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली.
 
डॉ. मुरलीमनोहर जोशी मानवसंसाधन मंत्री म्हणूनच ओळखले जातात. वाजपेयी यांच्या 1998 आणि 1999 अशा दोन सरकारमध्ये त्यांनी मानव संसाधन मंत्री म्हणून आपला ठसा उमटवला. 1996 मध्ये वाजपेयी यांच्या अल्पकाळाच्या सरकारमध्ये डॉ. जोशी गृहमंत्रीही होते. 1991 ते 93 याकाळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. राम मंदिर आणि काश्मीर आंदोलनासाठी डॉ. मुरलीमनोहर जोशी ओळखले जातात.
 
75 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना मंत्री करायचे नाही, या निकषामुळे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नाही. भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचे ते सदस्य होते. लोकसभेतील कोणत्याही कामकाजात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी लोकसभेत त्यांची उपस्थिती सातत्याने राहात होती. लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून त्यांनी चांगले काम केले. लोकलेखा समितीच्या आपल्या कार्यालयात तसेच संसदभवनाच्या कॉरिडॉरमध्ये डॉ. जोशी पत्रकारांशी बोलायचे. सूचकपणे सरकारबद्दलची आपली नाराजी व्यक्त करायचे.
 
पद्मविभूषण या दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डॉ. मुरलीमनोहर जोशी यांना सन्मानित करण्यात आले. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर कानपूर मतदारसंघातील मतदारांच्या नावे पाठवलेल्या पत्रामुळे डॉ. मुरलीमनोहर जोशी चर्चेत आले. पक्षाने मला कानपूरच नाही देशाच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मज्जाव केला, असे सांगत अप्रत्यक्षपणे डॉ. जोशी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
 
9881717817