वारंवार फुगणारी 56 इंची छाती
   दिनांक :29-Mar-2019
 
भिकार्‍यांना कशाचीही निवड करता येत नाही अथवा कुठल्याही व्यक्ती, संस्था अथवा समाजाकडून कुठलीही अपेक्षा ठेवता येत नाही, अशा अर्थाची ‘बेगर्स हॅव नो चॉईस’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. तर शक्तिमान व्यक्तींना समाजात सर्वत्र उच्च स्थान दिले जाते, त्या व्यक्तीची वाहवा केली जाते, तिला मानमरातब दिला जातो आणि त्या व्यक्तीच्या शब्दालाही किंमत येते, अशा आशयाचीही म्हण अस्तित्वात आहे. या म्हणी जशा व्यक्तींना लागू पडतात, तशाच त्या पृथ्वीवरील भिन्न देशांनाही लागू पडतात. जे देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांनी कितीही आरडाओरड केली तरी त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात नाही. दुसरीकडे शक्तिमान राष्ट्रांनी केलेल्या कृतीला कुठलाही सशक्त देश सहसा आव्हान देत नाही. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताबाबतही असेच काहीसे वातावरण जगात होते. भारताने घेतलेले निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेस पात्र ठरत असत. संरक्षण खर्च वाढवण्याचा मुद्दा असो की शेतकर्‍यांना सबसिडी देण्याचा निर्णय, त्यावर आक्षेप घेतले जात. आपल्या स्वाभिमानाचे निर्णय इतरांसाठी खिल्लीचे होत राहिले. पण मोदींच्या राज्यात परिस्थिती बदलली आणि कितीतरी क्षेत्रात आपण जागतिक शक्तींच्या दबावाला न घाबरता निर्णय घेतले आणि कृतीदेखील केली. अटलजींच्या काळातही पोखरण अणुस्फोटाचा निर्णय घेऊन आपण जगाला स्तंभित करून टाकले होते. पण संपुआच्या काळातील धोरणलकव्याने आपण अनेक क्षेत्रात माघारलो. तो माघारलेपणा मोदींनी घालवला आणि भारताला सशक्त देशांच्या रांगेत बसवले.
 

 
 
 
अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात काल सकाळी केलेला सर्जिकल स्ट्राईक म्हणूनच भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवणारा ठरला आहे. सरकारच्या या कृतीमुळे भारताने चीन, रशिया आणि अमेरिका या महाशक्तींच्या रांगेत स्थान मिळविले आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत भारताच्या या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या यशस्वी चाचणीची म्हणूनच जगात वाहवा होत आहे. जगात भारताची मान उंचावणार्‍या या घटनेची माहिती पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर समस्त भारतीयांची छाती 56 इंचाची झाल्याशिवाय राहिली नाही. खरे तर आजकाल मोदी सरकार जी पावलं उचलत आहे, त्यामुळे 56 इंची छातीचे भारतीयांना वावडे राहिलेले नाही, असेच म्हणावेसे वाटते. भारतीयांची छाती अभिमानाने फुलल्याच्या अनेक घटना गेल्या साडेचार वर्षात घडल्या. आपण पटाणकोट, उरी, पुलवामाचा बदला घेतला, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना शिक्षा ठोठावल्या, नीरव मोदीला अटक करविली, विजय माल्ल्याच्या संपत्ती जप्त केल्या, नोटाबंदी लागू केली, देशभरात जीएसटी लागू केला, रस्त्यांची शृंखला बांधली, जलवाहतूक सुरू केली, नवे शस्त्र कारखाने सुरू केले, अनेक जुने कायदे रद्द केले, जेकेएलएफवरील बंदी, ईशान्येकडील आतंकवाद काबूत आणणारा करार, जम्मू काश्मीरातील दगडफेकीच्या घटना बंद केल्या, जनधन योजनेंतर्गत कोट्यवधींची खाती उघडली, उज्ज्वल गॅसमुळे अनेक गृहिणींची स्वयंपाकघरे धूरमुक्त केली या आणि अशाच अनेक कृतींमुळे भारतीयांची छाती वारंवार छप्पन्न इंच झाली. कालचा अंतराळातील सर्जिक स्ट्राईक म्हणूनच पुन्हा एकदा भारतीयांना उत्साहित करून गेला, त्यांचे मनोबल वाढवून गेला, त्यांना नवी ऊर्जा देऊन गेला. डीआरडीओच्या प्रमुखांनी या शक्तीविषयी माहिती देताना सांगितले, ‘‘या यशासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 100 शास्त्रज्ञ सातत्याने काम करत होते. तसेच या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेने वाटचाल करत होते. या मोहिमेची इत्यंभूत माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत होती.
 
तसेच डोवाल ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत होते.’’ पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांचे केलेले अभिनंदन एका देशाचा प्रमुख म्हणून योग्यच आहे. डीआरडीओ आणि इस्रोचे शास्त्रज्ञ परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि आचारसंहिता सुरू असल्याने त्यांचे अभिनंदन केले नसते तर वरातीमागून घोडे आल्यासारखी आपली परिस्थिती झाली असती. जगातील सारे देश आज भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यात पुढे सरसावले असताना भारतीय पंतप्रधानांनी तद्नंतर केलेले अभिनंदन सरकारच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन ठरले असते. पण मोदींनी आचारसंहितेचा बाऊ न करता िंकवा निवडणूक आयोग कुठली कारवाई करू शकतो, याचा विचार न करता देशातील शास्त्रज्ञांच्या प्रामाणिक आणि अथक परिश्रमांची दखल घेतली आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची मोहर उमटविली. भारताच्या कामगिरीची दखल चीननेही घेतली. आपल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर चीन प्रारंभी हबकला नसता तरच नवल. पण नंतर त्याने स्वतःला सावरले आणि भारताचे अभिनंदन करताना हा देश अंतराळात शांतता कायम ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चीन 2007 सालीच या रांगेत येऊन बसला होता आता भारतदेखील त्या रांगेत बसला आहे. अंतराळात 300 किलोमीटरवर स्थापित एक जिवंत उपग्रह भारताने काल सकाळी 11 वाजून 16 मिनिटांनी स्वदेशी बनावटीच्या ए-सॅटचा वापर करीत केवल तीन मिनिटात पाडला. या कृतीमुळे भारताने एक अभूतपूर्व सिद्धता प्राप्त केली आहे. भारताने ही चाचणी केल्यानंतर लगेच जी प्रतिक्रिया दिली, त्यानुसार िंहदीतील ज्येष्ठ कवी दुष्यंतकुमार यांच्या ‘सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
 
लेकिन आग जलनी चाहिए।, या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली भारताने 10 वर्षांपूर्वीच विकसित केली होती. मात्र आजवर राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच जगापुढे आपले कर्तृत्व येऊ शकले नाही, ही इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. म्हणजे आपणसुद्धा 2007 सालीच या तंत्रज्ञानाने युक्त असल्याचे सिद्ध करू शकलो असतो. पण ते होणे नव्हते. त्यासाठी कठोर, कणखर निर्णय घेण्याची पात्रता असणारा मोदींसारखा नेता राजकीय पटलावर उदयास यायचा होता. पाकिस्तान या सार्‍या प्रकारामुळे गरळ ओकता झाला आहे. त्याने खुल्या दिलाने भारताचे अभिनंदन करायचे सोडून भारताने अंतराळाची युद्धभूमी करू नये असा सल्ला देऊन आपण शांततेचे किती पालनकर्ते आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण सार्‍या जगाला पाकिस्तानचे खायचे आणि दाखवायचे दात निरनिराळे आहेत, हे माहीत झालेले आहे. भारतही एकेका शक्तीने युक्त होत असताना त्याला जगातील कुठल्याही देशावर हल्ला करायचा नाही, हे न चुकता जाहीर करीत आहे. आम्ही पहिला वार करणार नाही, आम्ही पहिले अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, हीच भूमिका भारताची राहिलेली आहे. पण कुणी आगळिक केली तर चूपही बसणार नाही, हे बालाकोट घटनेने जगाला दाखवून दिले. भारत आता 2019 मध्ये प्रवेश करून सार्‍या क्षेत्रात स्वतःच्या 56 इंची छातीचे धिटाईने प्रदर्शन करीत आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ, क्रीडा, कृषी, ऑटोमोबाईल, शिक्षण आदी कितीतरी विषयांमध्ये आम्ही केलेली क्रांती जगाला अंचबित करून टाकत आहे. भारतीय विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या नवनव्या प्रयोगातून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला एका नवी दिशा देण्यास सिद्ध झालेले आहे. कालच्या घटनेने पुन्हा एकदा आमची छाती अभिमानाने फुलून 56 इंची झाली आहे, त्या अभिमानास आणि राज्यकर्त्यांच्या कृतीला सादर प्रणाम.