पूँछ, राजौरी जिल्ह्यात 400 अतिरिक्त बंकर
   दिनांक :03-Mar-2019
पाकच्या गोळीबारीपासून बचाव करण्यासाठी व्यवस्था
  
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात अतिरिक्त बंकर उभारण्यास परवानगी दिली आहे. 
 
 
 
पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 200 बंकर बांधण्यात येणार आहेत. यामुळे पाकिस्तानकडून ज्यावेळी गोळीबार करण्यात येईल, त्यावेळी येथील स्थानिक नागरिकांना त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या बंकरचा मोठा उपयोग होणार आहे.
  
दरम्यान, ग्रामविकास विभागाच्या उपायुक्तांकडे या बंकर उभारणीसाठी लागणारा निधी सुपूर्द करण्यात येणार आहे. हे बंकर लवकरात लवकर बांधण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, येत्या महिनाभरात दोन्ही जिल्ह्यांतील 400 बंकर बांधून तयार होतील, अशी माहिती येथील अधिकार्‍यांनी दिली आहे.