परमेश्वरप्राप्तीसाठी...
   दिनांक :03-Mar-2019
तुम्ही-आम्ही, आपण प्रत्येक जण विचार करणारे जीव आहोत. पण, फक्त विचारांनी काहीही साध्य होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विशेष मेहनत घ्यावी लागते. आपण देवाविषयी विचार करतो. परमेश्वर कुठे आहे, तो आपल्याला कधी भेटेल का, तो आहे किंवा  नाही असे विचार आपल्या मनात येत असतात. याच विचारांना आपण परमेश्वरप्राप्ती मानू लागतो. पण, प्रत्यक्षात तसं नसतं. केवळ विचार केल्याने परमेश्वरप्राप्ती होते असं नाही. कथा ऐकल्याने मोक्ष मिळत नाही. फक्त ऐकल्याने अनुभवाची अनुभूती होत नाही. परमेेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी आपण काही उदाहरणं बघू. आपल्याला प्रचंड भूक लागली आहे. पण, आधी जेवण बनवावं लागणार आहे. यासाठी आपण स्वत: मेहनत केली पाहिजे. फक्त विचार केल्याने आापलं पोट भरणार नाही. जेवण आपल्यासमोर येणार नाही.

 
 
जेवण बाहेरून आणावं लागेल किंवा ते बनवावं लागेल. समुद्राचं पाणी खारं आहे. अनेकांनी हे सांगितलंय. पण, प्रत्यक्षात आपण त्याची चव बघत नाही तोपर्यंत काहीही कळू शकत नाही. त्याचा खारेपणा आपण अनुभवू शकणार नाही. इतरांच्या सांगण्यावरून समुद्राच्या पाण्याचा खारेपणा आपल्याला जाणवणार नाही. या अनुभवासाठी समुद्राचं पाणी स्वत: प्यावं लागेल. देवाचंही असंच आहे. देव अनुभवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. देवाचं नाव घ्यावं लागेल. आराधना करावी लागेल. देवाची सेवा करावी लागेल. फक्त विचारांनी हे साध्य होऊ शकत नाही. प्रेमाचंच बघा. प्रेमाचा विचार करून काहीही मिळणार नाही. प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला त्यात बुडून जावं लागतं. म्हणजेच विचारांच्या दिशेने मार्गक्रमण केलं पाहिजे. पुढे गेलं पाहिजे. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असं होऊ शकत नाही. हरीला प्राप्त करण्यासाठी झुकायला हवं. तेव्हाच त्याची प्राप्ती होते.