रानडुकराकडून पट्टेदार वाघीणीची शिकार
   दिनांक :03-Mar-2019
-मेळघाट वन्यजीव विभागातील घटना
-विश्व वन्यजीव दिनी घटना उघडकीस
 
अकोट,
पश्चिम व पुर्व मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे विलीनीकरण करण्यात येऊन नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या मेळघाट वन्यजीव विभागात आज एका रानडुकराकडून धिप्पाड पट्टेदार वाघीणीची शिकार झाल्याची पाच दिवसांपूर्वीची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे आज विश्व वन्यजीव दिवस साजरा होत असताना एका धिप्पाड वाघीणीला मुकावे लागल्याचे बघावे लागल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
 
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्राम शहापूर जवळील दीड कि.मी.अंतरावरील धोंडाआखरच्या जंगलातील जितापूर नियतक्षेत्रातील वनखंड १ हजार ७७ मध्ये ग्रामस्थ व गस्तीवर असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकाला एक पट्टेदार धिप्पाड वाघ मृतावस्थेत दिसला. या वाघाजवळ दूर्गंधी पसरली असल्याने हा वाघ काही दिवसांपूर्वी मृत झाला असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. तदनंतर वन्यजीव विभागाला सुचना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी, व अन्य अधिकारी पथकासह घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे व वाघाचे निरिक्षण केले असता वाघ मादी असल्याचे निष्पन्न झाले. वाघीणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने तिचा मृत्यू सुमारे पाच ते सात दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
 
 
 
वनाधिकाऱ्यांना घटनास्थळाजवळच मृत रानडुकराची हाडे आढळली. त्यावरुन घटनेची संपूर्ण कहाणी वनाधिकाऱ्यांच्या नजरेसमोर आली. यानंतर अकोटचे पशुधन अधिकारी डॉ.पी.एम.खोडवे व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.वैभव हागोणे यांनी वाघीणीचे शवविच्छेदन केले. वाघीणीचे वय आठ ते दहा वर्ष असून तिचे दात, नखे व इतर अवयव शाबूत होते. तसेच पोटाचा भाग सडला होता. वाघीणीची रानडुकरासोबत झटापट झाली. यात तिने रानडुकराला फस्त केले. परंतू या संघर्षात वाघीण गंभीर जखमी झाली आणि त्यातच पाच दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. वैद्यकिय अधिकाऱ्यांनीही वाघीणीचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा दावा केला आहे.