भारत पाकिस्तान सामना होणारच, आयसीसीने बीसीसीआयला ठणकावले
   दिनांक :03-Mar-2019
मुंबई,
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी विश्वचषकात खेळू नये, अशी संपूर्ण देशवासियांची भावना होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)देखील आम्ही पाकिस्तानशी विश्वचषकात सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवले होते. पण आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत ठणकावले असून, भारताला पाकिस्तानबरोबर सामना खेळावाच लागेल, असे म्हटले आहे.
 
 
आयसीसीने याबाबत आपले मत मांडताना सांगितले की, " आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय सरकार घेऊ शकते. हे माहिती असतानाही बीसीसीआयने आम्हाला याबाबत विचारणा केली होती, पण हा निर्णय घेणे आमच्या हातात नाही."
 
पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळत असलेले सहकार्य आणि त्यामुळे भारतावर सतत होणारे हल्ले यामुळे शेजारील राष्ट्राविरोधात देशात संतापाचे वातावरण आहेच. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्या संतापात अधिक भर पडली. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, मग ते राजकीय असो, आर्थिक असो किंवा खेळाच्या मैदानावरील असो. पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना देशवासीयांत आहे.