बाबा फरीद टेकडीवर वाहन उलटले
   दिनांक :03-Mar-2019
-१३ भाविक जखमी, २५  बचावले
गिरड,
येथिल बाबा फरीद दर्गा टेकडीवर दर्शनाकरीता जात असलेले वाहन उलटल्याने झालेल्या अपघातात १३ प्रवाशी जखमी झाले असून १२ जण बचावले आहे. ही घटना आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. सर्व जखमी भाविकांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
 
चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा येथिल चिंचोलकर कुटुंबीय बाबा फरीद दर्गात दर्शनाकरीता जात होते. टेकडीवरील मध्यवर्ती रस्त्याच्या वळणावर टेकडीवर जात असताना, वाहन चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन जागीच पलटी झाले. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये राजु विठ्ठल चिंचोळकर, रंजनी संजय चिंचोळकर, प्राजकता राजु चिंचोळकर, छाया राजु चिंचोळकर, भाग्यश्री नेहरू क्षिरसागर, नेहरू शामराव क्षिरसागर, रेखा मारोती जगनाळे, सुभाष हरीदास कुरसाडे, शांताबाई महादेव चिंचोले, धनक्षी भारत चिंचोळकर,  लताबाई नेहरू क्षिरसागर, सजंय विठ्ठल चिंचोळकर, कार्तिक शंकर चिंचोळकर सर्व राहणार वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा समावेश आहे.
 
 
 
अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळावरून सर्व जखमी भाविकांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ नरैंद्र वानखेडे व त्याच्या सहकाऱ्यांनी जखमीवर तातडीने प्राथमिक उपाचार केला. तर गंभीर जखमी राजु विठ्ठल चिंचोळकर यांना पुढिल उपचारा करीता समुद्रपुर उपग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आले. या आधी १८ जानेवारीला अशाप्रकारच्या अपघातात १३ भाविक जखमी झाले होते.
 
बाबा फरीद दरगावर दिवसें-दिवस भाविकांच्या वाढत्या वाहनाच्या संख्या पाहता हा अरुंद रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे . गुरुवार, शुक्रवार, रविवार या दिवशी टेकडीवर हजारो संख्येने वाहनाची वर्दळ असते, त्यामुळे प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 
 
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी केंद्र सरकारकडून २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वन संवर्धन कायदा १९८० कलम ३(२) अन्वये वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्ता निर्मितीसाठी एक हेक्टर जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद नियमात आहे. मात्र, शासकीय तांत्रिक अडचणीमुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. याकडे जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत तथा संबधीत विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. टेकडीवर येणाऱ्या वाहन कराच्या माध्यमातुन ग्रामपंचायतला ८ ते १० लाख रुपयाचे वार्षीक उत्पन्न होते. मात्र, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाय योजना केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप  आहे.