कापूसचे सरले, हापूसचे दिवस...
   दिनांक :03-Mar-2019
आता दिवस कसे नि केव्हा पालटतील याचा नेम नाही. कालपर्यंत थंडीनं कुणाला पाणी आण म्हटलं तर त्याला ‘बर्फ आण’ असं ऐकू जायचं. आता चार महिने बंद असलेले केवळ फॅनच सुरू झाले, असे नाही तर कुलर फिटींगची कामेही आता सुरू झाली आहे. ज्या घरी कामे सुरू झाली नाही त्या घरच्या बाईचा पारा चढला आहे. ‘तुम्हाला काय, तुम्ही दिवसभर मस्त ऑफीसमध्ये फुकटच्या एसीत बसून असता...’ पासून मुक्ताफळे गृहपुरुषाला पारा चढेल गृहलक्ष्मीकडून ऐकावी लागण्याचे दिवस आले आहे. यंदा कापूस अजूनही बराचसा वेचायचा शेतात कायम होता, तरीही कापसाची चर्चा होती. आता त्याची जागा हापूसने घेतली आहे. त्याच्या बातम्या यायला लागल्या आहेत. निवडणुका असल्याने लोक आपआपल्या पायरीनं वागू लागले असले तरीही हापूसवर चर्चा होणारच नि ती होते आहे. परवा टीव्हीवर बातमी होती. आजकाल टीव्हीवरची बातमी खरी असते, असे लोकांना वाटू लागले आहे. त्यात एका सत्याग्रही शो मध्ये (रीअलिटी) हापूसवर चर्चा रंगली होती.
 
 
 
लहानपणी, म्हणजे आमच्या लहानपणी... हा, काही संकल्पना व्यक्त करणारे शब्द फारच सवंग असतात. म्हणजे लहानपण म्हटले की ते कुणाचेही अन्‌ कधीचेही होऊ शकते. त्यातही आमच्या म्हणजे नेमक्या कुणाच्या, असा सवाल निर्माण होऊ शकतो. तर ते बालपण बालभारतीचे होते. तितके सोज्वळ आणि भाबडे होते. आताचे बालपण हे ‘रिअलिटी शो’वाले आहे. रिअलिटी काहीच नाही नुसताच ‘शो’ असतो अन्‌ आजच्या जमान्याचे सूत्र आहे, शो मस्ट बी गो ऑन...! आजकाल सगळेच कसे शो मन झालेले असतात. प्रत्येक जणच स्वत:ला ‘झळकविण्याचा’ प्रयत्न करत असतो. ज्याच्या त्याच्या कुवतीने हा झळकविण्याचा कार्यक्रम तो राबवीत असतो. म्हणजे कुणी ट्विटर, फेसबुक, व्हॉट्‌सअॅप... असे झळकविण्याचे सत्र आरंभलेले असते तर कुणी अलीकडचा सोपा उपाय म्हणजे ‘फ्लेक्सिबल’ झालेले असते. म्हणजे ‘भाऊं’च्या वाढदिवसापासून तर कुणाच्यातरी तेरव्यापर्यंत शुभेच्छा, सदिच्छा अन्‌ श्रद्धांजल्यांचे फ्लेक्स लावलेले असतात. कुणी वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन अन्‌ स्वत:च्या कर्तृत्वाचे लेख लिहवून घेऊन स्वझळकीचा कार्यक्रम राबवीत असतातच... अर्थात विषय हा नाही, तो जरा वेगळाच आहे; पण आजकाल विषय सोडून बोलण्याचे अन्‌ ताल सोडून वागण्याचा ट्रेंड आहे...
 
बघा हे असे होते, सांगायचे काही वेगळेच होते अन्‌ बालपणाहून रिअलिटी शो अन्‌ त्यावरून आत्म झळकविणे हा एकमेव कार्यक्रम जो सध्या राबविला जात आहे त्यावर आपली गाडी घसरली. याला म्हणायचं नमनालाच घडाभर तेल जाळणे. आजकाल तशीही मालिकांची संस्कृती आहे. त्यांचा संस्कार मनावर झालेला असतो. त्यामुळे स्त्रियांच्या परिवेशांत आणि पुरुषांच्या वागण्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे एखादी गोष्ट खूप आडवळणाने अन्‌ लांबवून लांबवून सांगण्याची सवय पडते आहे. माझ्या मित्राचे लग्न झाले तेव्हा सुरू झालेली एक मालिका त्याची पहिली मुलगी दहावीला गेली तेव्हा थांबली... कारण ते चॅनलच बंद पडले.
 
म्हणून सांगायचे आहे रसाईबद्दल, आंब्याबद्दल अन्‌ सुरुवात बालभारतीपासून झाली. आता बालभारती यासाठी आठवली की, त्या काळात प्राथमिक वर्गाला एक कविता होती, सुगी नावाची.
दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल माजले 
ढुम पट, पट ढुमऽऽ लेझीम चाले जोरातऽऽ
लेझीम ढुम पट ढुम कसे चालते ते आम्हाला आजवर कळलेले नाही, मात्र आता आंब्याच्या सिझनवरून एक कविता मात्र याच कवितेवर सुचली आहे -
दिवस रसाईचे सुरू जाहले, सुट्या लागुनी पाहुणे आले
लंगडा, पायरी, हापूस, गावरान... रसाई चाले जोरात
आता रसाईचे दिवस सुरू होतील. इकडे कैर्‍या कच्याच आहेत. (कैर्‍या कच्याच असतात) पण ऐन हिवाळ्यातही कैर्‍या मिळू लागल्या आहेत आजकाल. त्यामुळे गावरान आंबे पिकण्याच्या आधीच बेगमपल्ली आंबे बाजारात दाखल होतील. बेगमपल्लीपासून सुरुवात करत करत माणसं आपली औकात ताणतात आणि मग पायरी पायरीने वर चढत केसर, लंगडा असे करत हापूसपर्यंत एका सिझनमध्ये तर तो नक्कीच पोहोचतो. आता गावरान काही हाताला लागत नाही. जे जेव्हा असतं तेव्हा त्याची काही िंकमत नसते, मात्र ते दुर्मिळ झाले की मग मात्र तेच हवे असते. आता बघाना प्लॅटिनम नावाचा धातू आहे. तो सगळ्यात महाग आहे... आता त्यात महाग असण्यासारखे काय असते? केवळ तो दुर्मिळ आहे इतकेच काय ते; पण त्यासाठी तो मौल्यवान झाला आहे. तसेच हापूसचे असते का? एखादी गोष्ट ब्रँड झाली की मग त्यावर कुणी शंका घेतच नाही. ते उत्तमच असते. तर आता गावरानचेही तसेच झाले आहे. जो उठला तो अंड्यापासून भाज्यांपर्यंत अन्‌ कोंबडीपासून आंब्यापर्यंत सार्‍यांनाच गावरानच लागत असते.
 
पूर्वी गावरान उपलब्ध होते तेव्हा लोकांना इम्पोर्टेडचा जमाना हवा होता. सार्‍यांना जे काय ते इम्पोर्टेडच लागत होते. आता सार्‍यांना सारेच कसे गावरान हवे असते. गावरान म्हटले की लोक आजकाल डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे गावरान आंबे सगळ्यांनाच हवे असतात. कुठलाही िंलबूिंटबू आंबा गावरान म्हणून पेश केला जातो. पूर्वीच्या काळी गावरान आंब्याच्या जातीही विकसित केल्या जायच्या. त्यातला केसर, संत्रा, खोबर्‍या, साखर्‍या... अशा काही जाती आठवतात. शेतकरी त्याची कलमं करायचे. नवा आंबा विकसित करायचे. त्याचा आकार, कोयीचा आकार, मगज... असे सारेच पाहिले जायचे. तेव्हा शेतकरी बियाणं आणि इतर बाबींच्याही वाणांवर संशोधन करायचे. काही प्रयोग करायचे. आता सार्‍याच क्षेत्रांत आणि सगळ्यांनाच रेडिमेडची सवय लावण्यात आली आहे.
 
रसाईला बहीण यायची, जावई यायचा अन्‌ साडीचोळीदेखील केली जायची. कधी कधी मग नवा व्याही अन्‌ विहीणही यायची. मुलीचा बाप अन्‌ मुलाची आई म्हणजे व्याही-विहीण यांच्या नात्याला एक हळुवार नाजूकपणाची डूब असायची. अर्थात मिश्कीलपणे ती त्याची मस्करी केली जायची. म्हणजे आंब्याच्या रसासोबतच त्या रसासारखेच आंबट-गोड असे मधुर नाते अन्‌ त्यांचा एक पटही उलगडायचा. नवे लग्न झालेली लेक नव्या जोडीदाराला तिच्या हक्काच्या आंब्याच्या झाडाखाली नेऊन सांगायची, ‘‘ह्या आंब्याची चव इतकी गोड हाय ना तुमी कल्पनाही नाही करू सकत!’’ तेव्हा तो म्हणायचा, ‘‘ह्या आंबा खावून तू इतली गोड झाली, तेच्यावरून आलं ना ध्यानात!’’ तेव्हा ती झक्क लाजायची... रसाईच्या दिवसांना अशी गोड नात्यांची किनार असायची. आता त्यावर हिस्से वाटण्याच्या कोर्ट-कज्जांची काजळी धरली आहे. कोर्टात पन्नास पन्नास वर्षे केसेस सुरू असतात... आमच्या गावच्या पाटलांकडे असलेल्या या प्रकारच्या भांडणाच्या केसचा निकाल या रसाईच्या दिवसांत लागला. पंचावन्न वर्षे केस सुरू होती. आता आमराई नाही अन्‌ ज्यांनी केस टाकली ते चुलत घराणेही नाही... कुणी कुणाला अन्‌ कसले काम्पेन्सेशन द्यायचे? अकारणच्या भाऊबंदकीत तोंड आंबट झाले अनेक पिढ्यांचे. आता गावच्या पाटलांनाही शहरातून आंबे विकत आणावे लागतात अन्‌ रसाई करावी लागते. कधीकाळी माज केल्याने घरी पडणारा आंब्याचा माच संपला आहे... आत ओला चाराही नाही अन्‌ माजणारे बैलही नाहीत!