दहशतवाद नष्ट करण्यासाठी पाकिस्तानची मदत करण्यास तयार - राजनाथ सिंह
   दिनांक :03-Mar-2019
चंदौली:
 केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी. भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल. आम्ही दहशतवाद नष्ट करू' असे आवाहन पाकिस्तानला केले आहे. 'दहशतवाद नष्ट करण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. दहशतवाद्यांविरोधात निर्णायक युद्ध व्हायला हवे. पाकिस्तानमधील दहशतवादाचा समूळ नाश करायला हवा यासाठी आमच्या सरकारने तयारी केली आहे' असे राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे.

 
जगभरातले अनेक देश दहशतवादाशी लढत आहेत. भारताने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी पावलं उचलली आहेत. या कामात भारताला जगभरातील अनेक देशांकडून समर्थन मिळत आहे. या कामात जगभरातील अनेक देश भारताच्या पाठिशी उभे आहेत. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पावलं उचलली, तर भारत पाकिस्तानाला सहकार्य करेल असेही त्यांनी म्हटले आहे.