बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांचा राजीनामा
   दिनांक :03-Mar-2019
भारतीय बॅडमिंटन संघाच्या दुहेरीचे प्रशिक्षक टॅन किम हर यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
२०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत टॅन यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी होता. मात्र, दीड वर्षाअगोदरच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. ‘‘टॅन यांना काही कौटुंबिक समस्या असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे,’’ असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव ओमर रशिद यांनी सांगितले.
 
 
टॅन हे जपानच्या निप्पॉन बॅडमिंटन संघटनेकडे जाणार असल्याच्या चर्चेबाबत कोणतेही भाष्य करण्यास रशिद यांनी नकार दिला. टॅन यांनी यापूर्वी मलेशिया, इंग्लंड, दक्षिण कोरिया या देशांच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. टॅनच्या मार्गदर्शनाखालीच भारताचे चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रॅँकिरेड्डी ही जोडी विशेषत्वे उदयाला आली. या जोडीने भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवून दिले होते. महिलांमध्ये अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीनेदेखील दमदार कामगिरी नोंदवली असून त्यांनी राष्ट्रकुलमध्ये कांस्यपदक मिळवले होते.