'जैश' ने मानले; भारताची 'एअर स्ट्राईक' होती दमदार
   दिनांक :03-Mar-2019

नवी दिल्ली,

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने याविरोधात पाकच्या हद्दीत घुसून 'बालाकोट' येथील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या सर्वात मोठया तळासह अन्य दोन ठिकाणी 'एअर स्ट्राईक' केली होती. या कारवाईत पाकिस्तान सरकार किंवा लष्काराचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र यात 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे खुद्द संघटनेने मानले आहे.

 

जैशचा प्रमुख मसूद अझहर याचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. मौलाना अम्मार याची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात त्याने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमधील तळ उद्धवस्त केल्याचे स्वीकारले आहे.

हा ऑडिओ क्लिप भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी पाकमधील पेशावर येथे एका सभेला संबोधित करताना चा आहे. भारतीय हवाई दलाने 'मर्काज' (धार्मिक शिक्षा केंद्र) वरही बॉम्ब फेकल्याचे त्याने सांगितले असून याबाबत नाराजी व्यक्त करत शत्रूंनी युद्ध पुकारल्याची बडबड त्याने केली आहे.
 
याचबरोबर, भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य केले नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. काश्मीरमधील मुस्लिमांच्या मदतीसाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला आहे, असेही मौलाना अम्मार याने म्हटले आहे.