दुसऱ्या टप्प्यातील मोनो आजपासून रुळावर
   दिनांक :03-Mar-2019
मुंबई :
 गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली दुसऱ्या टप्प्यातील मोनो अखेर आजपासून रुळावर येणार आहे. वडाळा ते सातरस्ता असा १२ किलोमीटरचा मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. वडाळा डेपो इथे मोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. फेब्रुवारी २०१४  मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला. मात्र, मोनोरेल्वेच्या या पहिल्या टप्प्यातच मोनो रेल्वे फेल गेली. पहिल्या टप्प्यातली स्थानकेही फारशी वर्दळीची नसल्याने मोनोला सुरुवातीपासूनच अपेक्षित प्रवासी संख्या मिळू शकली नाही. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

 
पहिल्या टप्प्यातील मोनोचा प्रवास हा तोट्यातच सुरू आहे. मोनोला दरमहा किमान 80 लाख ते एक कोटींचा तोटा होत आहे. आजच्या घडीला रोज जेमतेम 15 हजार प्रवासी मोनोने प्रवास करतात. तर, दिवसाला फक्त 18 ते 20 हजार रुपयांचा महसूल तिकीट विक्रीतून मिळतो. मात्र, हा पहिल्या टप्प्यात होणारा तोटा आता दुसऱ्या टप्प्यात भरुन निघण्याची आशा आहे.
 दुसरा टप्पा हा लोअर परळ, नायगाव, दादर, अँटॉप हिल, जीटीबीनगर या वर्दळीच्या भागातून जातो. त्यामुळे मोनो जास्त प्रवाशांना आकर्षिक करू शकते. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मोनोची प्रवासी संख्या दिवसाला एक लाख असेल, अशी अपेक्षा आहे. म्हणजे सध्याच्या सातपट प्रवासी संख्या असेल. तसंच, तिकीट दर सुद्धा मोनोला फायदा मिळवून देणारा असेल. वडाळा ते जेकब सर्कल या सलग टप्प्यात हाच दर १०, २०, ३० आणि ४० रुपये असा असेल.
दुसऱ्या टप्प्यातील स्थानके
 
संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अँटॉप हिल आणि जीटीबीनगर.