प्रियांकाला युनिसेफच्या ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावरून हटवा, पाकिस्तानींची ऑनलाईन मोहीम
   दिनांक :03-Mar-2019
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाई कारवाईनंतर हवाई दलाचे कौतुक करणारी प्रियांका चोप्रा पाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. पाकिस्तानी युजर्सनी प्रियंकाला लक्ष्य करत एक ऑनलाईन मोहिम छेडली आहे. प्रियंकाला युनिसेफच्या ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावरून हटवा, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. २०१६ मध्ये युनिसेफने प्रियांकाची ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावर नियुक्ती केली होती.

 
 
हवाई दलाने केलेल्या एयर स्ट्राईक नंतर प्रियांकाने त्यांचे कौतुक करणारे ट्विट केले होते. पाकिस्तानी युजर्सनी तिच्या या ट्विटचा विरोध चालवला आहे. युनिसेफची सदिच्छादूत या नात्याने प्रियंकाने शांततेला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तिने असे न करता,भारतीय हवाई दलास युद्धासाठी प्रोत्साहित केले, असे पाकिस्तानी युजर्सचे म्हणणे आहे.
 
 
प्रियंकाचे भारतीय हवाई दलास चीअर करणारे ट्विट रिट्विट करत, पाकिस्तानी अभिनेत्री अरमीना खान हिने पीसीवर टीका केली आहे. ‘तुला युनिसेफची सदिच्छादूत मानायचे नाही का? सर्वांनी प्रियांकाच्या या ट्विटचे स्क्रीनशॉट्स घ्या आणि यानंतर ती कधी शांती व सद्भावनेबद्दल बोललीच तर तिचा दुटप्पीपणा उघडा पाडा,’ असे अरमीना खानने लिहिले आहे.